Home » भाजपाचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखर यांना ममता बॅनर्जी यांनी केले होते ब्लॉक .. 

भाजपाचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखर यांना ममता बॅनर्जी यांनी केले होते ब्लॉक .. 

by Team Gajawaja
0 comment
Jagdeep Dhankhar
Share

इतके दिवस पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारला सतत अडचणीत आणणारे राज्यपाल म्हणून ओळखले जाणारे जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) भाजपाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरवल्यानंतर संपूर्ण देशाच्या चर्चेचा विषय बनले आहेत.

शिक्षण आणि व्यवसायाने वकील, गेल्या ३ दशकांपासून राजकारणात सक्रिय, जाट नेते म्हणून लोकप्रिय आणि आता ‘किसान पुत्र’ म्हणत भाजपानं उपराष्ट्रपतीपदासाठी दिलेला उमेदवार अशी जगदीप धनखर यांची थोडक्यात ओळख सांगता येईल. 

१९५१ मध्ये राजस्थानच्या झुनझुनु जिल्ह्यातल्या खिताना गावात जन्मलेले जगदीप धनखर राजकारणात आले तेव्हा खरंतर त्यांना या क्षेत्रात फारसा रसही नव्हता, पण आज ते थेट उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरलेले आहेत. यामागे त्यांचं कौशल्य किंवा राजकारणातल्या अनुभवापेक्षा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारला त्यांनी सतत भंडावून सोडल्याचं फळ किंवा त्यांच्या अनुषंगाने जाट समाजातलं पक्षाचं स्थान आणखी बळकट करण्याचा भाजपाचा हेतू असल्याची चर्चा आहे. कारण काहीही असलं, तरी या पदाच्या दुसऱ्या दावेदार मार्गारेट अल्वा आणि धनखर यांची लढत रंगणार असल्याची चिन्हं आहेत.(Jagdeep Dhankhar)

जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) – वकिली ते राजकारण

खितानाच्या सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण आणि नंतर चित्तोडगढमध्ये सैनिकी शाळेत पूर्ण शिष्यवृत्तीवर शिक्षण घेतल्यानंतर जगदीप धनखर यांनी जयपूर विद्यापीठातून १९७८-७९ मध्ये वकिलीची पदवी घेतली व नंतर लगेचच राजस्थानच्या बार कौन्सिलमध्ये प्रवेश मिळवला. दहा वर्षांत त्यांनी राजस्थान हाय कोर्ट असोसिएशन, जयपूरचे अध्यक्ष होण्यापर्यंत मजल मारली. 

१९९० चं वर्ष जगदीप धनखर यांच्यासाठी महत्त्वाचं ठरलं. याच वर्षात ते राजस्थान उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकील नियुक्त झाले. दरम्यान त्यांनी झुनझुनमधून राजकारणात प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा. १९९० चं वर्ष संपायच्या आत ते केंद्रीय मंत्री झाले. पुढे त्यांनी संसदीय कामकाजाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. १९९३ ते १९९८ पर्यंत राजस्थान विधानसभेचेचे ते सदस्यही होते.  (Jagdeep Dhankhar)

====

हे देखील वाचा – २९ वर्ष काँग्रेस खासदार नंतर सोनिया गांधीसोबत वाद, कोण आहेत मार्गरेट अल्वा?

====

१० वर्षांचा ब्रेक

पीव्ही नरसिंह राव पंतप्रधान झाले तोपर्यंत जनता दलाशी एकनिष्ठ असलेल्या धनखर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सर्वांना धक्का दिला, पण काहीच काळात राजस्थानच्या राजकारणात अशोक गेहलोत यांचं प्रस्थ वाढल्याचं पाहून त्यांनी भाजपामध्ये उडी मारली. त्या काळात ते वसुंधरा राजे यांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जात होते… असं असताना त्यांनी अचानक आपल्या राजकीय करियरमध्ये थोडाथोडका नाही, तर तब्बल १० वर्षांचा ब्रेक घेतला आणि आपल्या वकिलीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं. दशकभराच्या मोठ्या कालावधीनंतर धनखर यांना राजकारण परत खुणावू लागलं आणि २०१९ मध्ये त्यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.

जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) उपराष्ट्रपती होणार का?

तेव्हापासून सातत्याने आणि बहुतेक वेळेला जाहीरपणे ममता बॅनर्जींच्या कामकाजावरून प्रश्न विचारून अडचणीत आणण्यासाठी ते प्रसिद्ध झाले आहेत. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांना काहीच महिन्यांपूर्वी ट्विटरवर चक्क ब्लॉक केलं. धनखर आपल्या सरकारसाठी, आपल्या अधिकाऱ्यांसाठी असंसदीय आणि अनीतीपूर्ण भाषा वापरतात आणि त्याला कंटाळून आपण हे पाऊल उचलल्याचं ममता यांनी सांगितलं होतं. धनखर यांच्या टीकेमुळे ममतांचं सरकार त्यांच्यावर, “ते राज्यपाल कमी आणि भाजपाचे एजंट म्हणून जास्त काम करत आहेत”, असा आरोपही करत असत. (Jagdeep Dhankhar)

विशेष म्हणजे, उपराष्ट्रपतीपदासाठी धनखर यांचं नाव जाहीर झाल्यानंतर ममता बॅनर्जी आणि त्यांच्या मंत्र्यांनी सुटकेचा निश्वास टाकल्याची चर्चा आहे. सध्या धनखर यांचं पारडं जड मानलं जात असलं, तरी असं होणार की, ममतांची डोकेदुखी कायम राहाणार हे येत्या सहा ऑगस्ट रोजी होत असलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत समजेल. (Jagdeep Dhankhar)

कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.