अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची धूरा हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी कामाचा धडाकाच लावला आहे. सोबत ट्रम्प यांनी अशा अनेक योजना जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे मोठे वादही निर्माण झाले आहेत. आता यात आणखी एक योजनेची आणि वादाची भर पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझापट्टीला रिसॉर्ट सिटी करण्याची घोषणा केली आहे. इस्रायली सैन्यानं गाझा शहराला पार उद्ध्वस्त केलं आहे. आता याच गाझाला पूर्णपणे ताब्यात घेण्याची इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. ट्रम्प यांनी आपली ही इच्छा जगजाहीर केली नाही तर नवलच. ट्रम्प यांच्या योजनेनुसार गाझा शहराचा पूर्णपणे ताबा अमेरिका घेणार. यानंतर येथील सर्व जमिन समतोल करण्यात येणार आहे. त्यासाठी गाझामधील सर्व पडक्या इमारती पूर्णपणे पाडून टाकण्यात येतील. मग या रिकाम्या झालेल्या गाझामध्ये मोठी रिसॉर्ट सिटी उभारण्यात येईल. शिवाय येथील पायाभूत सुविधा अधिक विकसित करण्यात येणार आहेत. (Donald Trump)
ट्रम्प यांनी गाझाबाबतची आपली ही योजना जाहीर केली आणि एकच खळबळ उडाली. मिडलइस्टमध्ये याबाबत नाराजीचा सूर उमटला. गाझामध्ये जे नागरिक आता परत येऊ लागले आहेत, त्यांनीही ट्रम्प कधीही गाझाचा ताबा घेऊ शकणार नाहीत, असे सांगितले आहे. अर्थात ट्रम्प यांनी गाझाच्या विकासाची योजना जाहीर केली असली तरी सध्या गाझाची परिस्थिती दारुण आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार गाझामध्ये सुमारे 50 दशलक्ष टन कचरा असून तो साफ करण्यासाठी 21वर्षे लागण्याची शक्यता आहे. या सर्वांसाठी अमेरिकेला अरबो डॉलर्स खर्च करावे लागणार आहेत. ट्रम्प यांना या सर्वांची जाणीव आहे. पण त्यांनी त्यांच्या सवयीनुसार एक योजना पुढे केली आहे. आता जगभर त्यावर चर्चा होत राहणार, आणि ट्रम्प या योजनेमागची आपली दुसरी योजना कार्यान्वित करणार, असा कयास लावण्यात येत आहे. (International News)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत गाझा पट्टी अमेरिका ताब्यात घेणार असल्याचे जाहीर केले. या भागाचा विकास करुन तेथे एक रिसॉर्ट सिटी बांधली जाईल. यातून हा भाग पश्चिम आशियासाठी रोजगार आणि पर्यटनाचे केंद्र बनवण्यात येईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. शिवाय गाझामध्ये रहाणा-या 23 लाख नागरिकांना इजिप्त आणि जॉर्डनसारख्या देशांमध्ये स्थायिक करण्यात येईल, असा तोडगाही ट्रम्प यांनी सुचवला आहे. सौदी अरेबिया, जॉर्डन, तुर्की या देशांनी ट्रम्प यांच्या विधानाचा निषेध केला आहे. शिवाय गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांनीही ट्रम्पच्या या वक्तव्याचा निषेध करत गाझा सोडण्यास नकार दिला आहे. (Donald Trump)
ट्रम्प यांनी गाझाच्या विकासाचा आपला आराखडा सादर केला असला तरी सध्या गाझाची परिस्थिती काय आहे, हे ही जाणून घेतले पाहिजे. गेली अनेक वर्ष गाझा हा हमासचा गड म्हणून ओळखला जात होता. हमासनं गाझाच्या प्रत्येक कानाकोप-यात भूसुरुंग आणि दहशतवाद्यांना लपण्यासाठी गुहा तयार केल्या आहेत. इस्रायलच्या सैन्यानं यापैकी अनेक गुहा शोधून काढल्या असल्या तरी गाझाच्या भूमित अशा अनेक गुहा अद्यापही आहेत. या गुहांमध्ये हमासनं मोठा शस्त्रसाठा लपवल्याचीही माहितीही आहे. आता गाझाचा विकास करतांना हा शस्त्रसाठा आधी बाहेर काढणे गरजेचे आहे. शिवाय इस्रायलच्या तोफखान्याच्या मा-यानं गाझापट्टी म्हणजे एक मोठा दगड,माती, सिमेंटचा ढिगारा झाला आहे. येथे आता एकही इमारत शिल्लक राहिलेली नाही. ट्रम्पच्या म्हणण्यानुसार गाझापट्टीचा ताबा अमेरिकेनं घेतला तर हा ढिगारा साफ कऱण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे रहाणार आहे. (International News)
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Narendra Modi : चर्चा फक्त JFK’s Forgotten Crisis पुस्तकाचीच
===============
गाझामधील विध्वंसाची व्याप्ती पाहता, पुनर्बांधणीसाठी किमान 20 वर्षे लागतील असा अंदाज आहे. मुळात गाझाचा विकास करतांना येथील लाखो टन कचरा कुठे टाकणार हा प्रश्न मोठा आहे. त्यामुळेच काही तज्ञ गाझाचा विकास ही योजना स्वप्नवत असल्यासारखी मानतात. त्यांच्या मते किमान एक दशक तरी यासाठी लागणार आहे. यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च होणार आहेत. हा पैसा अमेरिका कशापद्धतीनं उभारणार हा सुद्धा मुद्दा प्रमुख आहे. कारण गाझामधील 50 दशलक्ष टन कचरा साफ करण्यासाठीच 1.2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च येईल, असे संयुक्त राष्ट्रांना सांगितले आहे. या सर्वात येथील नागरिकांचा प्रश्नही आहेच. आता गाझापट्टीमध्ये सर्वत्र तंबू बांधलेले दिसून येत आहेत. येथे राहण्यायोग्य एकही घर शाबूत राहिलेले नाही. तरीही येथील नागरिक गाझापट्टी सोडून अन्यत्र रहाण्यास तयार नाहीत. अशा 23 लाख नागरिकांचे काय करायचे हा प्रश्न आधी अमेरिकेला सोडवावा लागणार आहे. गाझा पट्टीला “मध्य पूर्वेचा रिव्हिएरा” करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची योजना आहे. मात्र प्रत्यक्षात ही योजना स्वप्नवतच अधिक वाटत आहे. (Donald Trump)
सई बने