5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री (CM) म्हणून शपथ घेतली, परंतु दोन महिने झाले तरी त्यांनी अद्याप आपला मुक्काम ‘वर्षा’वर हलविलेला नाही. त्यामागे तंत्र-मंत्र व काळ्या जादूची भानगड असल्याची पुडी शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोडली होती. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंगला सोडण्यापूर्वी कामाख्या देवीच्या मंदिरात बळी दिलेल्या गेंड्याची शिंगे या बंगल्यात पुरली आहेत. आपल्याशिवाय अन्य कोणीही मुख्यमंत्री टिकू नये, यासाठी त्यांनी ही भानामती केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस ‘वर्षा’ येथे राहत नाहीत. इतकेच नाही, तर ते आत पाऊल ठेवण्यास घाबरत आहेत. ‘वर्षा’ पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे, असं राऊत म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “माझी मुलगी दिविजा दहावीत आहे आणि या महिन्यात बोर्डाच्या परीक्षा आहेत. तिने तिच्या परीक्षेनंतर आम्हाला नवीन घरात स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला. म्हणून आम्ही तिच्या परीक्षेनंतर ‘वर्षा’ येथे राहायला जाण्याचा निर्णय घेतला. इतके सोपे कारण आहे. पण मी ‘वर्षा’ येथे का स्थलांतरित झालो नाही याबद्दल हास्यास्पद आणि निराधार अटकळी लावण्यात येत आहेत,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. जरी राऊत यांच्या या दाव्याला कुठलाही आधार किंवा पुरावा नसला. तरी राजकारण्यांचे एकूण वर्तन आणि मागचा अनुभव पाहिला तर ते अगदीच अनाठायी बोलले नव्हते. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आणि कर्मकांड करणे हा अनेक राजकारण्यांचा आवडता छंद असतो. त्यांच्या या आरोपामुळे अशा अनके किस्स्यांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्याबद्दलच जाणून घेऊ.(Political Tales)
‘वर्षा’ बंगल्याबाबतच बोलायच झालं तर सध्या खासदार असलेले व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात हा बंगला चर्चेत आला होता. अशोकरावांचे दिवंगत पिताश्री, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण हे स्वतः सत्य साईबाबांचे भक्त होते. अशोक चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हा नोव्हेंबर 2009 मध्ये त्यांनी बाबांना ‘वर्षा’ बंगल्यावर आमंत्रित केलं होतं. भगव्या वस्त्रात, व्हीलचेअरवर बसलेल्या सत्य साईबाबांनी ‘वर्षा’वर अनेक तास घालविले. तिथे त्यांची विशेष पूजा झाली. त्यांच्या अनुयायांनी त्यांना या विस्तीर्ण बंगल्यात प्रत्येक खोलीत फिरविले. दिवंगत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री विलासराव देशमुख हेही बाबांचे भक्त होते. सत्य साईबाबांचे पाय धुतानाचा मुख्यमंत्री चव्हाणांचा फोटो त्यावेळी खूप गाजला होता. त्यावर बरीच टीकाही झाली होती.(Political News)
याच ‘वर्षा’ बंगल्यावरची आणखी एक गंमत गणपतीच्या दूध पिण्याची. सुमारे तीस वर्षांपूर्वी, म्हणजे 21 सप्टेंबर 1995 रोजी अचानक गणपती दूध पित असल्याची अफवा सगळीकडे पसरली होती. व्हॉट्सअॅप, इंटरनेट किंवा मोबाईल नसतानाच्या त्या काळात या अफवेने आबालवृद्धांचा ताबा घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. त्यांना या अफवेबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनीही हे खरे असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर आपल्या घरच्या गणपतीनेही दूध पिल्याचे जाहीर केलं. परंतु त्यांचे उपमुख्यमंत्री असलेल्या गोपिनाथ मुंडे यांनी ही केवळ अफवा असल्याची शास्त्रीय भूमिका घेतली होती. (Political Tales)
श्रद्धा असो की अंधश्रद्धा, त्या काही विशिष्ट पक्षाच्या नेत्यांपुरत्या मर्यादित नसतात. विवेकवादी व नास्तिक नेते म्हणून माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची ओळख आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं, तेव्हा एका कार्यक्रमात पवार यांनी मी सर्व देवांचा बाप आहे, ही कविता म्हणून वाद ओढवून घेतला होता. परंतु हेच शरद पवार आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचाराचा नारळ बारामती तालुक्यातील कण्हेरीच्या मारुती मंदिरातच फोडतात. हे मारुतीचं मंदिर पवार कुटुंबियांचं श्रद्धास्थान आहे. पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ याच मंदिरातून फुटला होता. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार या नणंद-भावजयीचा सामना झाला होता. त्यावेळी या दोघींच्याही प्रचाराचा नारळ याच कण्हेरीच्या मारुती मंदिरात फुटला होता. (Political Tales)
याच्या उलट प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरे यांची ओळख असली तरी अशा कोणत्याही प्रथा किंवा अंधश्रद्धा त्यांनी पाळल्या नाहीत. उलट अनेक प्रथांवर त्यांनी टीका केली होती. अंधश्रद्धा पाळण्यासाठी अमुक विचाराचेच असले पाहिजे असे काही नाही. बिहारमधील लालू प्रसाद यादव हे स्वतःला समाजवादी आणि तर्कवादी विचारसरणीचे मसीहा मानतात. पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाल्यावर 1990 साली त्यांनी स्वतःच्या समर्थकांना धार्मिक ग्रंथ फाडण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्ता जाताच त्यांचे वर्तनही बदलले. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील तांत्रिक विभूति नारायण यांच्या आश्रमात पूजा करताना ते आढळले. ही पूजा लालूंनी चारा घोटाळा प्रकरणात मनासारखा निर्णय यावा, म्हणून केली होती. मात्र सीबीआयने त्यांना अडकावयचे ते अडकवलेचं. मुख्यमंत्र्यांचा बंगला सोडल्यानंतर लालूंनी स्वतःच्या खासगी बंगल्यात स्वीमिंग पूल बांधायला घेतला. राबडी देवींना छठपूजा करता यावी, हा त्या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले होतं. मात्र त्यांच्या वास्तुतज्ज्ञ सल्लागाराने त्यांना सांगितले, की दक्षिणेकडे असलेल्या या स्वीमिंग पूलमळे त्यांना अडचणी येत आहेत, म्हणून त्यांनी तो बुजवून दुसऱ्या दिशेने करायला घेतला.(Political News)
ग्रह-ताऱ्यांची शांती करण्यावर राजकारण्यांचा विश्वास असा, की कोणताही पक्ष किंवा कुठल्याही धर्माच्या नेत्याची त्यातून सुटका नाही. केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील राज्याला रोमराज्य म्हणून भाजपची मंडळी खिजवत असतं. परंतु त्याच सोनिया गांधी नेहमी रायबरेलीतून अर्ज भरण्याआधी दिवंगत काँग्रेस नेते गयाप्रसाद शुक्ला यांच्या गुरु भवन या निवासस्थानी जाऊन पूजा करतात. गांधी कुटुंबाची ही 55 वर्षांची परंपरा आहे म्हणे!
तमिळनाडूतील द्राविड मुन्नेट्र कळगमचे नेते करुणानिधी हे स्वतःला द्राविड चळवळीचे ढुढ्ढाचार्य समजत. त्यामुळे कट्टर नास्तिक असल्याचेही ते जाहीरपणे सांगत. परंतु एक हिरवी शाल कायम त्यांच्या खांद्यावर असे. ती त्यांच्यासाठी शुभ असल्याचा त्यांचा समज होता. तसेच विविध ज्योतिष्यांकडे जाऊन भविष्य अजमावयाचा हाही त्यांचा छंद होता.(Political Tales)
काही राज्यांमध्ये काही शहरं अशी आहेत जिथे त्या राज्याचे नेते जात नाहीत. उत्तर प्रदेशातील नोएडा आणि मध्य प्रदेशातील अशोकनगर आणि इछावर ही अशी शहरं आहेत. जे मुख्यमंत्री या ठिकाणी पाऊल ठेवतात त्यांची सत्ता जाते, असं मानलं जातं. म्हणून उत्तर प्रदेशचा कोणताही सत्तासीन मुख्यमंत्री नोएडाला भेट देत नाही. माजी मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग यांच्यापासून या अंधश्रद्धेची सुरुवात झाली. तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने जून 1988 मध्ये त्यांना केंद्रीय पद सोडण्यास सांगितले होतं. त्यानंतर मुलायम सिंह यादव, कल्याण सिंह आणि राजनाथ सिंह अशा सर्वपक्षीय मुख्यमंत्र्यांनीही नोएडाला जाणं नेहमीच टाळलं. मात्र बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती मुख्यमंत्री असताना नोएडामध्ये आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावली. पुढच्याच निवडणुकीत 2012 मध्ये बसपाची सत्ता गेली आणि नोएडाची अंधश्रद्धा पुन्हा चर्चेत आली.
===============
हे देखील वाचा : डबल चीनची समस्या होईल दूर, डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल
===============
त्यांच्यानंतर अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना मे 2013 मध्ये आशियाई विकास बँकेची शिखर परिषद नोएडात झाली. परंतु ते या शिखर परिषदेत सहभागी झाले नाहीत. नोएडातील सहा पदरी यमुना एक्सप्रेसवेचे उद्घाटन झाले तेव्हा त्यांनी ते लखनौहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. अगदी दादरी हत्याकांडाच्या निमित्ताने मोदी सरकारवर राळ उठवित असताना त्यांनी या घटनेतील पीडित मोहम्मद अखलाकच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी लखनौला बोलावून घेतले होतं.
उत्तर प्रदेशाचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या विश्वासाला एकमेव अपवाद. ही अंधश्रद्धा न जुमानता त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाईनचे उद्घाटन करण्यासाठी नोएडाला भेट दिली. अवघ्या तीन महिन्यांनंतर, गोरखपूर आणि फुलपूर येथील महत्त्वाच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला. मात्र पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला पुन्हा दणदणीत विजय मिळवून दिला. (Political Tales)
एकंदरीत पाहता राजकारणात आणि चित्रपट क्षेत्रात बेभरवशाचे वातावरण असतं. आज आहे ते उद्या असेल की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक जण काही ना काही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा बाळगून असतो. राजकीय नेत्यांच्या कोडगेपणाला नेहमी गेंड्याच्या कातडीची उपमा दिली जाते. आता थेट गेंड्याच्या शिंगांचा उल्लेख करून संजय राऊत यांनी पुढची पातळी गाठली आहे. असं बोललं जात आहे. ज्या निबरपणाने राजकीय नेते आपली अंधश्रद्धा मिरवतात, त्यावरून खरं तर राजकारण्यांची कातडी असा वाक्प्रयोग रूढ झाला पाहिजे!