Home » ही ‘चिखलफेक’ थांबणार तरी कधी ?

ही ‘चिखलफेक’ थांबणार तरी कधी ?

by Correspondent
0 comment
K Facts
Share

क्रूझ वरील ड्रग्जच्या पार्टीत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यापासून महाराष्ट्रात सुरू झालेली आरोप-प्रत्यारोपाची ‘चिखलफेक’ थांबता थांबत नाही. उलट या चिखलफेकीचे ‘टार्गेट’ च आता बदलण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्यामुळे प्रत्यक्षात ही ‘चिखलफेक’ सुरू झाली ते आर्यन खान आणि समीर वानखेडे आता या चिखलफेकीपासून बाजूला पडले असून या ‘चिखलफेकी’तील एक प्रमुख नबाब मलिक यांनी आता माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच ‘लक्ष्य’ करण्यास सुरुवात केली आहे.

दिवाळी संपून गेली तरी आरोप-प्रत्यारोपाचे हे ‘फटाके-बॉम्ब-हायड्रोजन बॉम्ब रोज फुटतच आहेत. महाराष्ट्रात जणू काही दुसरे काहीच घडतच नाही असे वाटावे अशीच सध्याची परिस्थिती आहे. एसटी संपासारख्या अतिशय महत्वाच्या आणि स्फोटक प्रश्नाला, ड्रग्ज प्रकरणी नित्यनियमाने होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाच्या चिखलफेकीमुळे नगण्य स्थान प्राप्त झाले आहे यासारखे दुर्देव ते कोणते असेल.

वास्तविक राज्याची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीच्या गेल्या पंधरा दिवसापासून चाललेल्या संपामुळे सामान्य लोकांना इतक्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असताना हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याऐवजी सत्तारूढ आणि विरोधकही या ‘चिखलफेकीत’ मश्गुल झाल्याचे दिसून येते. कारण एसटी संपावरूनही सत्तारूढ आणि विरोधी पक्षात कलगी-तुरा रंगला आहे.

थोडक्यात सामान्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्याअनुषंगाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन एकमेंकावर नुसती ‘चिखलफेक’च करायची आणि दिवाळीतही ‘शिमगा’ साजरा करायचा हेच राज्यातील सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी ठरविलेले दिसते. मात्र त्यामुळे सामान्य जनतेच्या हालअपेष्टात भरच पडत चालली आहे. पण हे राजकीय नेत्यांच्या लक्षात येत नाही ही खरोखरच चिंताजनक बाब आहे.

आपल्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनीच हेतुपुरस्सर अडकवले असे वाटल्यामुळे क्रोधीत झालेल्या नबाब मलिक यांनी, सुरूवातीला समीर वानखेडे यांच्याविरोधात रोज एक पुराव्यानिशी आरोप करायला सुरूवात केली. त्यानंतर आर्यन खान याचे ड्रग्ज-प्रकरण घडले तेही खंडणी वसुलीसाठीच घडविण्यात आले असा नबाब मलिक (Nawab Malik) यांचा आरोप आहे. या ‘वसुली’ला फडणवीस यांचा आशीर्वाद होता असा मलिक यांचा दावा आहे.

Aryan Khan Drug Case

आदल्या दिवशी नबाब मलिक यांनी आरोप करायचे आणि दुसऱ्या दिवशी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी त्याला प्रत्युत्तर देतांना मलिक यांच्यावर पुन्हा आरोप करायचे असे चक्रच मग सुरू झाले. नबाब मलिक यांचे हे आरोप नंतर इतके वाढत गेले की, केंद्रालाच त्याची दखल घ्यावी लागली आणि या आरोपांमुळे ‘बदनाम’ झालेल्या समीर वानखेडे यांनाच आर्यन खान आणि इतरांच्या चौकशीपासून दूर करण्यात आले. त्यामुळे आपला फार मोठा विजय झाला अशा थाटात नबाब मलिक यांनी आपले रोजचे आरोप-पत्र चालूच ठेवले. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, मलिक यांच्यावर ‘बॉम्ब’ टाकतांना त्यांचे ‘अंडरवर्ल्ड’शी कसे संबध आहेत हे पुराव्यानिशी दाखविण्याच्या प्रयत्न केला. हे पुरावे आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देणार आहोत असेही त्यांनी जाहीर केले.

वास्तविक हे पुरावे शरद पवार (Sharad Pawar) यांना मिळताच ते त्याची गंभीर दखल घेऊन मलिक यांच्याविरूद्ध तातडीने कारवाई करतील (किमान मंत्रिमंडळातून डच्चू तरी देतील) अशी त्यांची भाबडी अपेक्षा असावी. मात्र शरद पवार यांचे ‘आशीर्वाद’ असल्याशिवाय नबाब मलिक रोज पत्रकारपरिषद घेऊन नव्या नव्या आरोपांचे बॉम्ब फोडणार नाहीत ही साधी गोष्टही श्री फडणवीस यांना माहित नसावी याचेच आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हे पुरावे श्री शरद पवार यांच्याकडे देऊन काहीच उपयोग होणार नाही हे उघड सत्य आहे.

आपल्यावर ‘अंडरवर्ल्ड’शी संबंध असल्याचा आरोप होताच मलिक यांनी फडणवीस यांचा डाव त्यांच्यावरच उलटविण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांच्या कार्यकाळातच बनावट नोटा प्रकरणाला कसे संरक्षण देण्यात आले तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना महामंडळाच्या अध्यक्षपदी कसे बसविण्यात आले असा मलिक यांनी प्रतिआरोप केला. याशिवाय फडणवीस यांची आणखी काही प्रकरणे आपण विधानसभा अधिवेशनात सादर करू असा सूचक इशाराही दिला आहे त्यावरूनही पुन्हा आरोप-प्रत्यारोपाची राळ उडाली. नजीकच्या काळात आणखी काही आरोप-प्रत्यारोपांचे बॉम्ब उडण्याची शक्यता आहे.

दररोज ठरवून होणाऱ्या या आरोप-प्रत्यारोपाच्या ‘चिखलफेकी’मुळे साध्य मात्र काहीच होणार नाही हे आता राज्यातील सामान्य जनतेबरोबरच या नेत्यांनाही कळू लागले आहे असे दिसते त्यामुळेच की काय, देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक सूचक ट्विट केले आहे. सुप्रसिद्ध विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे एक प्रसिद्ध वचन उद्धृत करताना त्यांनी म्हटले आहे की, ”डुकरांबरोबर तुम्हाला कुस्ती खेळायची असेल तर तुमचे अंग घाण होणारच”

देवेंद्र फडणवीस यांना उशिरा का होईना हे ‘वचन’ आठवले हे फार बरे झाले. त्यामुळे आता तरी आरोप-प्रत्यारोपाची गलिच्छ राळ उडविणे कमी होईल अशी शक्यता बाळगायला हरकत नाही. परंतु सध्याचे बदलते राजकारण पाहता अशी ‘घाण’ लागणारच याचीच तयारी करून राजकीय नेतेमंडळी राजकारण करू लागली आहेत असे दिसते. त्यामुळे आज जॉर्ज बर्नार्ड शॉ असते तर राजकारणातील या ‘घाणी’ बाबत  त्याने नवीन ‘वचन’ तयार केले असते. अर्थात राजकीय नेत्यांनी देखील त्यापासून फारसा बोध न घेता त्याचा कधीतरी ‘ट्विट’ साठीच वापर केला असता हे मात्र नक्की.

– श्रीकांत नारायण
 (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.

=====

हे देखील वाचा: भाजपविरोधात शरद पवार थेट मैदानात

=====

हे देखील वाचा: ड्रग्ज प्रकरणाला ‘क्रांती’कारी वळण…आरोपी बाहेर आणि फिर्यादी पिंजऱ्यात


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.