Home » बर्फवृष्टीमुळे झालेल्या ट्रॅफिक जॅममध्ये जेव्हा अध्यक्ष ‘जो बायडन (Joe Biden)’ अडकून पडतात तेव्हा…

बर्फवृष्टीमुळे झालेल्या ट्रॅफिक जॅममध्ये जेव्हा अध्यक्ष ‘जो बायडन (Joe Biden)’ अडकून पडतात तेव्हा…

by Team Gajawaja
0 comment
जो बायडन Joe Biden
Share

दोन दिवसापूर्वी अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतात अतिबर्फवृष्टीमुळे चक्क ५० मैलांच्या पट्ट्यात असलेल्या इंटर-स्टेट ९५ (हे तिथल्या हायवेचं नाव) या महामार्गावर ट्रॅफिक जाम झाले होते. हे ट्रॅफिक जाम इतके प्रचंड होते की, लोक अक्षरशः २५ -३० तासांसाठी आपल्या गाड्यांमध्ये अडकले होते. याचा फटका अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनाही बसलाच.

अमेरिकेत साधारणतः डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात बर्‍याच शहरांमध्ये बर्फवृष्टी होते. आपल्याकडे भारतात फक्त हिमाचल प्रदेश, उत्तराखंड किंवा काश्मीर खोर्‍यातच बर्फवृष्टी अनुभवता येते. अमेरिकेत बर्फवृष्टी होणं नवीन नाही, परंतु प्रमाणाबाहेर बर्फ पडणं हे मात्र जनजीवन विस्कळीत होण्याचं कारण ठरू शकतं. यावेळीही तसंच घडलं. 

आपल्या इथेही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटल्यामुळे किंवा कुठला अपघात झाल्यामुळे ट्रॅफिक जाम होऊ शकतं. पण आजूबाजूचं हवामान चांगलं असेल, तर आपण गाडीच्या बाहेर पडून पाय मोकळे करू शकतो. पण ‘आय ९५’ या महामार्गावर प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे, रस्त्यावर प्रचंड प्रमाणात बर्फ साठला होता. त्यामुळे मोठे ट्रक, छोट्या गाड्या असं सगळंच ठप्प झालं होतं. आपत्कालीन पथक व अग्निशामक दलाला मदतकार्यात अनेक अडथळे येत होते. 

Virginia's snowy I-95 traffic jam invites call for better preparedness for  the unexpected | Fox Business

अमेरिकेतल्या सामान्य नागरिकांना या बर्फावृष्टीमुळे स्वत:च्या वाहनातच बसावं लागलं होतंच, पण सामान्य नागरिकांप्रमाणे अमेरिकेतील ‘व्ही आय पी’ व्यक्तींनाही या ट्रॅफिक जाममुळे त्रास सहन करावा लागला.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना जवळजवळ १ तास त्यांच्या ‘एअर फोर्स वन’ या खास विमानातच थांबून राहावं लागलं. याचं कारण विमानाच्या धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे विमान जमिनीवर उतरवणार तरी कसं? विमानाला १ तास आकाशातच घिरट्या घालाव्या लागल्या. मग चक्क बर्फ हटवणार्‍या गाड्यांना पाचारण करण्यात आलं आणि शेवटी बायडेन सुखरूपपणे त्यांच्या आलीशान ‘क्याडीलक’ या खास गाडीत बसून, त्यांचा ताफ्यासह पुढच्या ठिकाणाकडे रवाना झाले. 

ही झाली अध्यक्षांच्या बाबतीतली गोष्ट. पण अमेरिकेचे एक सिनेटर (खासदार) डेमोक्रटिक पक्षाचे टिम केन हे सुद्धा चक्क २६ तास त्यांच्याच गाडीत बसून होते आणि ट्रॅफिक सुरळीत झाल्यानंतर ते कॅपिटोल (अमेरिकी कॉंग्रेसचं सभागृह) या त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले. 

आपल्याला वाचताना खरं तर हा रोमांचित करणारा अनुभव वाटेल, पण २५- ३० तास फक्त एकाच जागी बसून वेळ घालवणं किती अवघड आहे, हे ज्यांनी अनुभवलं त्यांनाच कळू शकतं. अन्न -पाणी, मोकळी जागा, थंडीपासून बचाव करण्यासाठीचे खास कपडे, प्रथमोपचार साहित्य हे सारं नसेल, तर होणाऱ्या अवस्थेची कल्पनाही अंगावर शहारा आणते. 

अतिप्रगत असणार्‍या अमेरिकेमध्ये अशी परिस्थिती? पण निसर्ग अमेरिका – भारत किंवा गरीब – श्रीमंत, असा भेदभाव जाणत नाही. त्याच्या रौद्र रूपासमोर मानवाची ताकद शून्य आहे. अशावेळी परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडण्याची सकारात्मक इच्छाशक्तीच मानवाला तारून नेऊ शकते.

व्हर्जिनियातील या ट्रॅफिक जाममध्ये बर्फासोबतच पाऊसही पडत होता. अचानक कोसळलेल्या या आपत्तीत कोणाकडे अन्न शिल्लक नव्हतं, तर कोणाच्या गाडीतलं इंधन संपलं होतं. काहींनी सांगितलं की हा त्यांच्या आयुष्यातला ‘न भूतो न भविष्यती’ वाटावा, असा अनुभव होता. परंतु, आसपासच्या लोकांनी ट्रॅफिक जाम मधील अडकलेल्या लोकांना मदत केली. 

Local Bakery Truck Gives Out Bread to Stranded Drivers in I-95 Traffic Jam

या ट्रॅफिक जाम मध्ये एका गाडीत पती -पत्नी अडकले होते. त्यांना पुढेच एका ब्रेड ब्रेकिंग कंपनीचा ट्रक दिसला. त्यांनी लगेच त्या कंपनीच्या ग्राहक सुविधा केंद्राला फोन करून, या ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या लोकांना ब्रेड आणि काही खाण्याचे पदार्थ पुरवता येतील का, अशी विचारणा केली. याची त्वरित दखल घेऊन कंपनीच्या लोकांनी ट्रक ड्रायव्हरला फोन केला आणि त्याने ट्रक उघडून आतले सामान आणि पदार्थांचं तिथल्या लोकांना वाटप केलं. संकटातल्या लोकांना एका कॉल वर मदत मिळाली होती. या सर्व प्रकारामध्ये माणुसकीचं दर्शन, ही यामध्ये मोठी दिलासादायक बाब होती.  

हे देखील वाचा: भारतातील ‘या’ ५ मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश नाही

‘या’ माणसाने फक्त व्यवसायासाठी ‘हिंदू’ धर्म बदलून इस्लाम स्वीकारला आणि पाकिस्तानात गेला

हे नैसर्गिक संकट होतं. पण डिझास्टर मॅनेजमेंटचं काय? एवढ्या मजबूत पायाभूत सुविधा असूनही इतका वेळ ट्रॅफिक जाम झालेच. त्यामानाने आपल्याकडील ‘डिझास्टर मॅनेजमेंटचं’ कौतुक करावं तेवढं कमी आहे. गेल्या काही वर्षात भारतीयांना अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. परंतु, प्राप्त साधन सामग्रीच्या आधारे जीवाची बाजी लावून नागरिकांना या आपत्तीमधून बाहेर काढणाऱ्या जवानांना आणि निस्वार्थ भावनेनं मदत करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या कार्याला सलाम!

– निखिल कासखेडीकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.