‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. बॉलीवूडचा कोणताही नवा सिनेमा येणार म्हटल्यावर त्या सिनेमाची टीम कपिलच्या शोमध्ये प्रमोशनसाठी नाही गेली, तर नवल. मस्करीत तर असंही म्हंटलं जातं की, कपिलच्या शोमध्ये जाण्यासाठी दिग्दर्शक, निर्माते सिनेमा बनवतात. गंमतीचा भाग बाजूला ठेवू, पण फक्त प्रेक्षकच नाहीत, तर दिग्गज कलाकार मंडळीही कपिलचा कॉमेडी शो आवर्जून पाहतातच.
‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा असलेला कपिल शर्मा हा मुळचा स्टँड-अप कॉमेडीयन. एका रिअलिटी शोमधून वर आलेला विनोदवीर. आज हिंदीमध्ये त्याच्यासारखं गुळ लावणारं रोस्टिंग कोणीही करत नाही. याच कपिल शर्माला नेटफ्लिक्स वाल्यांनीही आमंत्रण दिलं, ते ही स्टँड-अपसाठी.
कपिलने स्टँड-अप कॉमेडी ऐकण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना असाच एक गमतीशीर किस्सा सांगितला. तो किस्सा होता त्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. “एकदा मी माझ्या घरी मद्यपान करत होतो. मद्यपान करता करता माझे ३ पेग पिऊन झाले आणि मी विचार केला की, आता मी माझ्या बॉसला मेसेज करतो”, असं म्हणत कपिलनं तो किस्सा सांगायला सुरुवात केली.
इथे कपिलनं ज्यांचा बॉस म्हणून उल्लेख केला ते बॉस होते पंतप्रधान मोदी. कपिलनं फोन घेतला हातात आणि लागला ट्विट करायला. ‘मी गेल्या ५ वर्षांत १५ कोटींचा इंन्कम टॅक्स भरला आहे, तरीही मला माझं ऑफिस बनवण्यासाठी बीएमसी कर्मचाऱ्यांना ५ लाखांची लाच द्यावी लागतेय. हे आहेत का तुमचे अच्छे दिन?’ असं म्हणत कपिलनं सकाळी ५ वाजता पंतप्रधान मोदींना टॅग करत ट्विट केलं.
भारतातील प्रत्येक नागरीक हा कोणत्याच सरकारच्या काळात १०० टक्के संतुष्ट नव्हता. त्यात कलाकार मंडळींचा कधीच कोणत्याही लाभार्थी योजनांमध्ये किंवा बजेटमध्ये विचार केला जात नाही, अशी कायम सिनेसृष्टीची तक्रार असते. त्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे लाखोंमध्ये काही कोटींमध्ये टॅक्स भरतात. असं असूनही सरकार कधीच त्यांना विचार करत नाही अशी कलाकारांची कायम तक्रार असते.
मद्यधुंद अवस्थेत कपिलनं थेट त्याच्या डोक्यातील फ्रस्ट्रेशन मोदींना टॅग करत ट्विट केलं. नेटफ्लिक्सवरील ‘द कपिल शर्मा आय ॲम नॉट डन येट’ हा कार्यक्रम प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवतोय. अनेकांनी ट्विट करत कार्यक्रम आवडल्याच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. याच कार्यक्रमात कपिलनं हा किस्सा अगदी हलक्या फुलक्या अंदाजात कोणाच्याही भावना न दुखावता शेअर केला. चेहऱ्यावर हसू आणत आपलं म्हणनं कसं मांडायचं हे काम एका कॉमेडीयनलाच जमू शकतं.
– वेदश्री ताम्हणे