अंटार्क्टिका हा पृथ्वीचा सर्वात दक्षिणेकडील खंड आहे. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेनंतर हा पृथ्वीचा पाचवा सर्वात मोठा खंड आहे. अंटार्क्टिकाचा 98% भाग सरासरी 1.6 किलोमीटर बर्फाने व्यापलेला आहे. याच अंटार्क्टिकाला आता बदलत्या हवामानाचा फटका बसत चालला आहे. यातूनच अंटार्क्टिकेच्या काही भागातील मोठे हिमखंड तुटत चालले आहेत. हा मोठा धोका असून यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू शकते. तसेच याचा समुद्रातील जीवांना धोका होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे, समुद्रातील जहाजांनाही या हिमखंडाचा धोका असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. कारण हा हिमखंड काही छोटा-मोठा हिमखंड नसून ग्रेटर लंडनएवढ्या आकारचा हा हिमखंड आहे. त्यामुळे त्याचे काय परिणाम होणार आहेत, याच्यावर शास्त्रज्ञ नजर ठेऊन आहेत.
ग्रेटर लंडनच्या आकारमानाचा एक मोठा हिमखंड अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या कड्यापासून तुटल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशाप्रकारचा हिमखंड तुटण्याची गेल्या दोन वर्षांतील ही दुसरी घटना आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा हिमखंड तुटल्यानं त्याचे परिणाम नक्की होणार अशी भीती तज्ञ व्यक्त करीत आहेत. ग्रेटर लंडनच्या आकाराचा हा महाकाय हिमखंड अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या कड्यापासून तुटल्यावर त्याचा काल्पनिक फोटो आणि व्हिडिओ संशोधकांनी प्रसिद्ध केला आहे. हा हिमखंड त्याच्या मूळ शेल्फ अंटार्क्टिकापासून तरंगत दूर गेला आहे, आणि शास्त्रज्ञ त्यावर नजर ठेऊन आहेत.
या हिमखंडावर नजर ठेऊन असलेल्या संशोधकांच्या मते, A81 नावाचा हा हिमखंड त्याच्या मुळ स्थानापासून सुमारे 150 किमीवर तरंगत आहे. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, हिमखंडाचा वास्तविक आकार 1550 चौरस किलोमीटर आहे. ते जवळजवळ ग्रेटर लंडनच्या आकाराएवढे आहे. तो वेडेल समुद्रात तरंगत जाईल असा अंदाज आहे, कारण हा हिमखंड या समुद्राच्या जोरदार प्रवाहाबरोबर पुढे जात आहे. अंटार्क्टिका मध्ये संशोधन करणा-या हॅली रिसर्च स्टेशनमधून बर्फाच्या शेल्फवर परत येताना हा व्हिडिओ ब्रिटिश अंटार्क्टिका सर्व्हेने शूट केला आहे. ध्रुवीय संशोधन संस्थेच्या अहवावानुसार, हिमखंड ए81 पासून तुटलेल्या लहान हिमखंडांनी वेढलेला आहे. संशोधकांनी सांगितले की, A81 हिमखंड गेल्या दोन वर्षांत अंटार्क्टिकाच्या Chasm-1 पासून तुटलेला दुसरा सर्वात मोठा हिमखंड आहे.
=========
हे देखील वाचा : पुतिन यांच्या विरोधात इंटरनॅशनल कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
=========
ग्लेशियोलॉजिस्ट डॉ. ऑलिव्हर मार्श यांनी हिमनद्याच्या या तुकड्याबाबत आमच्याकडे माहिती होती, असे स्पष्ट केले आहे. गेल्या काही वर्षापासून हॅली रिसर्च स्टेशनमधून याबाबत संशोधन होत आहे. हिमनद्यशास्त्रज्ञांनी 2012 मध्ये प्रथम Chasm-1 चे रुंदीकरण पाहिले आहे. तेव्हापासूनच हा हिमखंड तुटण्याची शक्यता सांगण्यात आली होती. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा बर्फाचे खडक खूप जाड होतात तेव्हा ते मुळ स्थानापासून अलग होतात. आता हा हिमखंड वेगळा झाल्यामुळे त्याचे काय परिणाम होणार याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या आकाराचा हिमखंड वितळल्याने समुद्रात पाण्याची पातळी वाढण्याचीही शक्यता आहे. या सर्वांचा सागरी जीवांवरही परिणाम होऊ शकतो. यातील चिंता व्यक्त करणारी गोष्ट म्हणजे, हिमखंड तुटण्याची ही दोन वर्षांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये देखील असाच भव्य हिमखंड वेगळा झाला होता. तेव्हा A74 नावाचा हिमखंड खडकापासून तुटला होता. त्याचा आकार 1,270 चौरस किमी होता. ही परिस्थिती म्हणजे, अंटार्क्टिकाची मोठी हिमनदी वेगाने वितळत असल्याची सूचना असल्याचे शास्त्रज्ञ मानतात. यामुळे जगावर मोठी आपत्ती येऊ शकते, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. या हिमखंडामुळे समुद्रातील मोठ्या जहाजांना धोका निर्माण होऊ शकतो. टायटानिक नावाचे भव्य जहाज हिमखंडाची टक्कर लागल्यामुळे समुद्रात बुडाले होते. अशाच प्रकारची दुर्घटना होऊ नये, म्हणून संशोधक या हिमखंडाला चोवीस तास ट्रॅक करीत आहेत.
सई बने