Home » राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ‘कैफियत’

राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ‘कैफियत’

by Correspondent
0 comment
Raj Thackeray
Share

— श्रीकांत नारायण

राजकारणी नेते तसेच कार्यकर्ते सामान्य जनतेविषयी वरकरणी का होईना, पण नेहमीच आपला कळवळा दाखवितात. किंबहूना त्यांना तो दाखवावाच लागतो. कारण जनता-जनार्दनाच्या पाठिंब्यावरच त्यांचे ‘राजकारण’ ( … आणि पोटपाणी) अवलंबून असते. निवडणुका आल्या तर हा ‘कळवळा’ आणखीनच वाढत जातो.  निवडणुकीचा निकाल विरोधात गेला तरीही ‘जनतेचा निर्णय मला मान्य आहे’, असे म्हणावेच लागते. थोडक्यात सांगायचे तर, राजकारणात टिकून राहायचे असेल जनतेला केव्हाही खुष ठेवायचेच असते.  सहसा जनतेविरुद्ध बोलायचे नसते हाच ‘मंत्र’ राजकारण करणाऱ्यांनी सदैव मनी बाळगलेला असतो. परंतु, मनसे नेते राज ठाकरे त्याला अपवाद असावेत असे दिसते. 

सध्या नाशिक आणि पुणे दौऱ्यावर असलेले राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जनतेविषयी आपली आगळीवेगळी कैफियत सादर केली आहे. “जनतेला मुळी विकास आवडतच नसावा, नाहीतर आमचा नाशिकच्या महापालिका निवडणुकीत पराभव झालाच नसता”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, जनतेमुळे माझी राजकारणातील काही वर्षे ‘फुकट’ गेली अशीही त्यांची तक्रार आहे. थोडक्यात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अपयशाबद्दल जनतेला दोष दिला आहे.

राजकारणात राहूनही कोणत्याही विषयांबाबत अतिशय स्पष्ट आणि परखड मत व्यक्त करणारे म्हणू राज ठाकरे यांचा नावलौकिक आहे. तेच त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानुसार त्यांनी आपले हे परखड मत व्यक्त केले असावे. हा विशेष गुण राज ठाकरे यांनी त्यांचे काका दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उचलला आहे, हेही महाराष्ट्रातील ‘तमाम मराठी जनतेला’ ठाऊक आहे.  

Raj Thackeray | Bal Thackeray | Maharashtra | Shiv Sena | MNS - Oneindia  News

मराठी जनता श्री. राज ठाकरे यांना बाळासाहेबांच्या रूपात पाहते हेही तेवढेच खरे आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारण करीत असताना जनतेबद्दल अशी कैफियत मांडल्याचे कधी ऐकिवात नाही.  पण मग बाळासाहेबांचेच ‘गुण’ आणि (भाषणाची) ‘स्टाईल’ घेऊन राजकारणात उतरलेल्या राज ठाकरे यांचे जनतेबद्दल असे मत का व्हावे, असा प्रश्न सर्वसामान्यांना साहजिकच पडतो. त्यासाठी श्री राज ठाकरे यांच्याच राजकारणाचे सिंहावलोकन करण्याची गरज आहे.  

आपल्या स्वयंभू नेतृत्वाला शिवसेनेत फारसे स्थान मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच श्री राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि स्वतःच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. हा तरुण नेता महाराष्ट्रात खरेच काहीतरी ‘नवनिर्माण’ करेल अशी आशा वाटून असंख्य तरुण कार्यकर्ते ‘मनसे’त दाखल झाले. तसेच शिवसेनेत नाराज असलेले बरेच नेतेही ‘मनसे’त डेरेदाखल झाले. त्यामुळे पक्षस्थापनेनंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत विधानसभेत ‘मनसे’चे १३-१४ आमदार, मुंबई महापालिकेत २५ नगरसेवक, त्यानंतर नाशिक महापालिकेत  ‘मनसे’ला बहुमत असे आशादायक चित्र दिसले. पुण्यासारख्या शहरातही ‘मनसे’चे काही नगरसेवक निवडून आले.

राज ठाकरे कोठेही जावोत, त्यांच्या सभांना प्रचंड मोठी गर्दी जमायची. – जी अजूनही जमते. परंतु पक्षाला त्यामानाने ‘उभारी’ आली नाही. अल्पावधीतच ‘मनसे’ ला गळती सुरू झाली. एखाद्या ‘कार्पोरेट कंपनीतील’ कर्मचारी जसे स्वतःच्या भवितव्यातील फायद्यासाठी पगारवाढ, पदोन्नती यांचा विचार करून दुसऱ्या कार्पोरेट कंपनीमध्ये जातात. नेमके तसेच  ‘मनसे’ त झाले’. काही प्रमुख नेते आणि असंख्य  कार्यकर्त्यांनी हळूहळू दुसरा ‘घरोबा’ केला. ही गळती थांबविण्यात राज ठाकरे यांना अपयश आले. पक्षाची रचना ही देखील त्याला प्रामुख्याने कारणीभूत होती. 

Rupali Thombre Patil : रुपाली ठोंबरेंनी FB प्रोफाईल बदलला अन् सांगितलं,  राष्ट्रवादीच का? - Marathi News | Rupali Thombre Patil : Rupali Thombre  changed her FB profile and said, why NCP? leave

पक्षामध्ये एकच प्रमुख नेता तो म्हणजे पक्षाध्यक्ष राज ठाकरे. पक्षाविषयी फक्त त्यांनीच बोलायचे. नेते आणि कार्यकर्ते यांनी फक्त ऐकायचे अशी परिस्थिती आली. तसे पाहता पक्षात  इतरही नेते, उपनेते आहेत मात्र त्यांना धोरणात्मक बोलायला फारशी परवानगी नसावी. पक्षप्रमुख जे बोलतील तेच ब्रम्हवाक्य. त्यामुळे इतर नेत्यांच्या पदांना फारसा अर्थ नव्हता. स्थानिक पातळीवरील छोट्या छोट्या प्रश्नाच्या निर्णयासाठीही कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्यावर अवलंबून राहावे लागत असे आणि सर्वात म्हणजे पक्षप्रमुख म्हणून नेते आणि कार्यकर्त्यांना जो वेळ द्यावा लागतो तो ‘वेळ’ राज ठाकरे यांच्याकडे नसतो. त्यामुळे पक्षातील ‘नाराजी’ राज यांना कधीच दिसली नसावी. त्यामुळे पक्षाला ‘ओहोटी’ लागली. (गंमत  म्हणजे राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असतानाच ‘मनसे’च्या पुण्यातील आक्रमक नेत्या रूपाली ठोंबरे यांनी ‘मनसे’ला सोडचिट्ठी देऊन ‘राष्ट्रवादी’शी जवळीक साधली.) 

विशेष म्हणजे ‘मनसे’ आणि शिवसेना यांच्या विचारसरणीत तसा फारसा कोणताच फरक नाही. कधी ‘मराठीपण’ तर कधी ‘हिंदुत्वावर जोर देऊन हे दोन्ही पक्ष राजकारण करतात. असलाच फरक तर तो ‘खळ्ळ–खट्याक’ मध्ये आहे. मात्र राजकीय नेत्यांप्रमाणे आता जनताही पक्षाच्या विचारसरणीला फारसे महत्व देत नाही.  नेत्यांच्या ‘धरसोडी’चा खेळ मात्र ती लक्षात ठेवते हे मतदानाअंती कळून येते.  याशिवाय आपल्या सभांना होणाऱ्या प्रचंड गर्दीचे ‘मतपेटीत’ रूपांतर करणे राज ठाकरे यांना कधीच जमले नाही. कारण जनताही आता बरीच हुशार झाली आहे. राजकीय नेत्यांचे ‘खेळ’ जनता करमणूक म्हणून पाहते आणि मतदानाच्या दिवशी स्वतःच्या विवेकबुद्धीला पटेल त्यानुसार मतदान करते, हे आता सिद्ध होत चालले आहे.  त्यामुळे राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे नाशिकचा विकास करूनही नाशिक महापालिका हातातून गेली आणि विधानसभेतही आता नावालाच मनसेचा एकमेव आमदार आहे.

हे ही वाचा: राजकारण: एका ‘खुर्ची’मुळे घडलेले महाभारत

भाजपविरोधी आघाडी : ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) ‘खलनायिका’ ठरणार?

वास्तविक राजकारणात बरेच चढ-उतार सहन करावे लागतात. त्यालाही बऱ्याच अंशी ‘जनता’च जबाबदार असते.  राजकारणातील हे यशापयश  पचविण्याची ताकद ज्याच्या अंगात असते तोच खरा नेता असतो. त्यासाठी वेळोवेळी आत्मपरीक्षण करण्याची गरज असते. केवळ वैफल्यग्रस्त होऊन आपल्या अपयशाची जबाबदारी जनतेच्या माथ्यावर टाकणे हे अपरिपकव राजकारणाचेच लक्षण म्हणावे लागेल. त्यामुळे केवळ जनतेमुळे आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्षे ‘फुकट’ गेली असे म्हणण्यापेक्षा राज ठाकरे यांनी ‘मनसे’ आत्मपरीक्षण करणे केव्हाही चांगलेच ठरेल.  त्यावरच त्यांचे आणि ‘मनसे’चे भवितव्य अवलंबून राहणार  आहे.

— श्रीकांत नारायण

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत )

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.