Home » बिकिनी वॅक्स करताना कोणती काळजी घ्यावी?

बिकिनी वॅक्स करताना कोणती काळजी घ्यावी?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bikini Wax
Share

स्त्री असो वा पुरुष प्रत्येक जणं आपापल्या शरीराची यथायोग्य काळजी घेत असतो. शरीराची काळजी घेणे ते स्वच्छ ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपले शरीर स्वच्छ असले तरी आपल्यात एक वेगळाच आत्मविश्वास येतो, शिवाय अनेक आजार, इन्फेक्शनपासून देखील आपण सुरक्षित असतो. आता महिला त्यांच्या शरीराच्या पुरुषाच्या तुलनेत जरा जास्त काळजी घेतात. वेळोवेळी पार्लरमध्ये जाऊन स्वतःला ग्रुम करतात.

महिलांची स्वच्छतेमधील एक महत्वाचा भाग म्हणजे वॅक्सिंग. आपल्या शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्याच्या प्रक्रियेला वॅक्सिंग म्हटले जाते. मग काखेतले, हातावरचे, पायावरची, चेहऱ्यावरचे आदी अनेक ठिकाणचे सर्वच केस वॅक्सिंग करून काढले जातात. इतकेच नाही तर आजकाल बऱ्याच महिला त्यांच्या प्रायव्हेट पार्टवरील केस देखील वॅक्सिंग करून काढतात. याला बिकिनी वॅक्स असे म्हटले जाते. वॅक्सिंग ही क्रिया तशी थोडी त्रासदायक आहे. कारण यात गरम वॅक्स लावून मग केस खेचून काढले जातात. त्यात बिकिनी वॅक्स असेल तर अजूनच त्रास. एकत्र नाजूक जागा असल्याने अनेकांना इथे वॅक्स करताना त्रास होतो.

आजकाल बिकिनी वॅक्स करण्याचा मोठा ट्रेंड आला आहे. अगदी शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींपासून ते जास्त वयाच्या महिलांपर्यंत सर्वच महिला बिकिनी वॅक्स करण्याला प्राधान्य देतात. अनेक महिला रेझरने किंवा विविध क्रीम लावून या प्रायव्हेट पार्टवरील केस काढतात. मात्र असे केल्याने केस लवकर येतात म्हणून बिकिनी वॅक्स केले जाते. अनेक मुली पार्लरवाल्यांचे ऐकून किंवा जाहिराती पाहून, मैत्रिणी करताय म्हणून हे वॅक्स करतात. पण जर तुम्हाला खरंच स्वतःहून हे वॅक्स करण्याची इच्छा असेल तरच तुम्ही ते केले पाहिजे. जर तुम्ही हे वॅक्स पहिल्यांदा करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला हे वॅक्स करण्याआधी कोणती काळजी घ्यावी हे सांगणार आहोत.

Bikini Wax

केस ट्रिम करणे
बिकिनी वॅक्सच नाही तर शरीराच्या कोणत्याही भागावरील केस काढताना सर्वात पहिले त्या भागावरील नको असलेल्या केसांची वाढ तपासली पाहिजे. जर केस खूप मोठे असतील तर तर थेट वॅक्स लावून नका यामुळे त्रास जास्त होऊ शकतो. वॅक्सिंग करण्यापूर्वी केस कात्रीच्या मदतीने ट्रिम करुन घ्यावे. नाजूक भागावरचे केस बारीक झाल्यानंतर वॅक्स, क्रिम किंवा ट्रिमरच्या सहाय्याने काढलीस ते लगेच निघून जातात.

पाळीत बिकिनी वॅक्स टाळावे
मासिक पाळीमध्ये योनीची जागा खूपच संवेदनशील झालेली असते. अनेकांना काही प्रमाणात किंवा असहनीय वेदना देखील या काळात होत असतात. अशा परिस्थितीत बिकिनी वॅक्सिंग करणे टाळावे. या जागेवरची त्वचा पाळीमध्ये अतिशय संवेदनशील असते त्यामुळे जर पाळीत वॅक्सिंग केल्याने वेदनाच नाही तर संसर्गाचा धोकाही वाढतो. यासोबतच जर बिकिनी पार्टच्या आजूबाजूच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन, पुरळ, फोड्या किंवा खाज असल्यास वॅक्सिंग करणे टाळावे.

वॅक्सिंग किटची स्वच्छता
वापरलेले रेझर, ट्रिमिंग मशीन किंवा शेव्हिंग, वॅक्सीनचे किट स्वच्छ ठेवा आणि कोणासोबतही अजिबात शेअर करू नका. कारण इतरांनी वापरलेले हे साहित्य तुम्ही पुन्हा वापरल्यास त्या व्यक्तीला असलेले त्वचेच्या आजारातील बॅक्टेरिया तुमच्या स्किनमध्ये ट्रान्सफर होतील आणि इन्फेक्शन वाढेल. यामुळे कधी कधी लैंगिक संसर्ग सुद्धा होतो.

त्वचेची पूर्वतयारी
वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेची स्वच्छता आणि तयारी आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे मॉइस्चरायझर, क्रीम किंवा तेल लावणे वॅक्सिंग आधी टाळावे. कारण त्यामुळे वॅक्स लावायला त्रास होऊ शकतो. वॅक्सिंगच्या एक दिवस आधी स्क्रब करून ती जागा आणि त्वचा मऊ आणि स्वच्छ ठेवा.

योग्य प्रकारची वॅक्स निवडा
बिकिनी वॅक्ससाठी सॉफ्ट वॅक्स किंवा हार्ड वॅक्सचा वापर केला जातो. हार्ड वॅक्स, विशेषतः बिकिनीच्या भागासाठी वापरला जातो कारण तो त्वचेसाठी सौम्य असतो आणि केस काढताना कमी वेदना होतात. त्यामुळे पहिल्यांदा करणार असाल तर योग्य प्रकारची वॅक्स निवडा. यासाठी तुम्ही अनुभवी व्यक्तीची मदत देखील घेऊ शकता.

अनुभवी लोकांचा सल्ला
बिकिनी वॅक्सिंग करण्याची इच्छा असेल किंवा पहिल्यांदा करत असाल तर आधी प्रोफेशनल किंवा अनुभवी लोकांचा सल्ल्या नक्की घ्या. आणि हे वॅक्स करताना ते अनुभवी वॅक्सिंग तज्ञच करत आहे ना याची खात्री करून घ्या. कारण हे वॅक्सिंग सुरक्षित आणि योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. शिवाय यातील तज्ञाचे अनुभव आणि ज्ञान तुम्हाला या वॅक्सिंगसाठी आत्मविश्वास देतील.

वॅक्सिंगनंतर कशी आणि कोणती काळजी घ्यावी
वॅक्सिंगनंतर त्वचा संवेदनशील होते. त्वचेला सूज, लालसरपणा, बारीक पुरळ, खाज किंवा जळजळ जाणवू शकते. अशावेळी कूलिंग जेल, मॉइश्चरायझर किंवा एलोवेरा जेल वापरा. काही तास गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा आणि आरामदायक कपडे घाला. बिकिनी वॅक्स केल्यानंतर सुक्ष्म केस मांड्यांना टोचू शकतात आणि चालताना त्रास होऊ शकतो. जास्त जळजळ होत असल्यास त्या ठिकाणी बर्फ किंवा थंड पाणी लावावे.
बिकिनी वॅक्सनंतर घट्ट कपडे घालू नका.

(टीप – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून देण्यात आली आहे. कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा अनुभवी लोकांचा सल्ला घ्या.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.