भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 जून पासून अमेरिकेच्या दौ-यावर जात आहेत. या दौ-यात दोन्ही देशात संरक्षणापासून गुंतवणुकीपर्यंत अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये आदान-प्रदान काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या या चर्चेत एक प्रमुख मुद्दा असणार आहे 30 MQ 9B रीपर ड्रोन. अतिशय वेगवान आणि लक्षवेधी असलेले हे ड्रोन अमेरिकेकडून भारताला मिळणार आहे. यामुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे. गेल्या काही वर्षापासून भारताला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी राष्ट्रांकडून घुसखोरीचा त्रास होत आहे. पाकिस्तान तर भारतात चीनी बनावटीच्या ड्रोनच्या आधारे शस्त्रांस्त्रांपासून ते ड्रग्जचीही तस्करी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांवर भारताकडून कडक उपाय होत आहेत. मात्र भारताच्या खात्यात 30 MQ 9B रीपर ड्रोन आल्यास या दोन्ही देशांवर वचक बसणार आहे. गेमचेंजर म्हणून या ड्रोनकडे बघितले जात आहे.

सुमारे 3 अब्ज डॉलर्सच्या या आर्थिक व्यवहारात भारताला 30 MQ 9B रीपर ड्रोन मिळणार आहेत. त्यापैकी 14 ड्रोन भारतीय नौदलाला आणि 8-8 ड्रोन लष्कर आणि हवाई दलाकडे सुपूर्द केले जाणार आहे. यासंदर्भात भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी चर्चा करुन संमती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौ-यात त्यावर सहमती होऊन हे ड्रोन भारताच्या ताब्यात मिळणार आहेत. भारतीय सैन्य दलासाठी ही मोठी उपलब्धी असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यात या करारावर स्वाक्षरी होणार आहे. भारतातील संरक्षण तज्ज्ञांनी या कराराचा गेम चेंजर म्हणून उल्लेख केला आहे. 30 MQ 9B रीपर ड्रोन हे आतापर्यंतचे सर्वात घातक आणि भेदक असे ड्रोन आहेत. या ड्रोनला हंटर किलर ड्रोन असेही म्हणतात.
या 30 MQ 9B रीपर ड्रोनचा अमेरिकेने आपल्या शत्रूच्या अचूक वध करण्यासाठी वापर केला आहे. 31 जुलै 2022 रोजी अमेरिकेने तत्कालीन अल कायदा प्रमुख अल जवाहिरीची काबूलमध्ये हत्या केली होती. हा हल्ला इतका अचूक होता की, जवाहिरीशिवाय इमारतीतील इतर कोणीही मारले गेले नाही. हे संपूर्ण ऑपरेशन या 30 MQ 9B रीपर ड्रोननेच केले होते. त्यामुळेच भारताच्या खात्यात आता एकाचवेळी 14 30 MQ 9B रीपर ड्रोन दाखल होणार असल्यानं चीन आणि पाकिस्तान यांनी अतिशय सावध गिरीची भूमिका घेतली आहे. पाकिस्ताननं तर आतापासूनच या करारामुळे आपल्याला धोका असल्याचा बाऊ करायला सुरुवात केली आहे. भारत या ड्रोनचा आपल्यावर वापर करु शकतो, असा ओरडा करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेने या आधुनिक ड्रोनचा वापर तालिबान आणि ISIS विरोधात केला होता. हे 30 MQ 9B रीपर ड्रोन यूएस आर्मीच्या हवाई ताफ्यातील एक महत्त्वाचा भाग आहे.
या ड्रोनचा वापर मुख्यतः शत्रूंच्या हालचालींवर गुप्तपणे पाळत ठेवणे आणि शत्रू आपल्या लक्षाच्या टप्प्यात आल्यावर हल्ला करणे, यासाठी केला जातो. अतिशय आधुनिक तंत्रज्ञान या ड्रोनमध्ये आहे. भारताला त्याचा व्यापक अर्थांनं उपयोग होणार आहे. भारताला 7517 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. याशिवाय चीनसोबत 4,056 किमी, पाकिस्तानसह 3,323 किमी, नेपाळसह 1,752 किमी आणि म्यानमारसह 1,645 किमी आपल्या सीमा विभागल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी 30 MQ 9B रीपर ड्रोन खूप फायदेशीर ठरणार आहे. हे ड्रोन जमिनीवर दोन पायलट आणि सेन्सर ऑपरेटरच्या टीमद्वारे दूरस्थपणे उडवले जाते. ड्रोनचा पायलट टेक ऑफ, फ्लाइट मार्ग आणि लँडिंग नियंत्रित करतो, तर सेन्सर ऑपरेटर कॅमेरे आणि पाळत ठेवणारी उपकरणे नियंत्रित करतात. 30 MQ 9B रीपर तीस तास उडू शकते तर 50,000 फूट उंचीवर 340 किलो वजन वाहून नेऊ शकते. अचूक लक्षभेद हे या ड्रोनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
=======
हे देखील वाचा : नरेंद्र मोदी आजचे आणि 2005 चे…
=======
युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने सुरुवातीला सीमा सुरक्षा कर्तव्यासाठी या ड्रोनची निर्मिती केली होती. मात्र त्यात अनेक सुधारणा करुन हे ड्रोन आता अमेरिकेच्या लष्करात प्रमुख भूमिकेत आलं आहे. या ड्रोनमुळे भारताच्या लष्करी सामर्थ्यांत भर पडणार आहे. तर पाकिस्तानमधून होणा-या अतिरेकी कारवायांना आळा घालता येणार आहे.
सई बने