Home » Vikram Samvat 2083: नव हिंदू वर्ष – रुद्र संवत्सर

Vikram Samvat 2083: नव हिंदू वर्ष – रुद्र संवत्सर

by Team Gajawaja
0 comment
Share

पुढच्या काही दिवसांतच हिंदू नववर्ष सुरू होणार आहे. हे विक्रम संवत २०८३ असणार असून या हिंदू नववर्षाला ‘रुद्र संवत्सर’ असे म्हणण्यात येईल. हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होते. २०२६ मध्ये सुरू होणारे हिंदू नववर्ष म्हणजेच विक्रम संवत २०८३ आहे. हे नववर्ष १९ मार्च २०२६ रोजी सुरू होईल. याच दिवशी देशभर चैत्र नवरात्र सुरू होईल आणि घरोघरी गुढी उभारून या वर्षाचे स्वागत करण्यात येईल. हिंदू नववर्ष २०२६ चा राजा आणि मंत्री कोण असणार, हे नववर्ष सुरू होण्याच्या वारावरून निश्चित केले जाते. या वर्षी हिंदू नववर्ष गुरुवार, १९ मार्च रोजी सुरू होत आहे. म्हणून या नवीन वर्षाचा राजा ‘गुरु’ असणार आहे, तर मंत्री ‘मंगल’ असणार आहे. त्यामुळे आगामी हिंदू नववर्ष युद्धजन्य घटनांचे असू शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. शिवाय हे हिंदू नववर्ष १२ नव्हे तर १३ महिन्यांचे असणार आहे. हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जाणारा अधिक महिना या नव्या वर्षात येणार आहे. याच नववर्षात नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळाही होणार आहे. ( Vikram Samvat 2083 )

हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्ष विक्रम संवत २०८३ हे ‘रुद्र’ या नावाने ओळखले जाणार आहे. सम्राट विक्रमादित्य यांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेला संवत्सर सुरू केला, तेव्हापासून तो दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो. राजा विक्रमादित्य यांच्या नावावरून याला विक्रम संवत असे म्हटले जाऊ लागले. हिंदू नवीन वर्ष उत्तराभाद्रपद नक्षत्रात सुरू होणार आहे. तसेच या दिवशी मीन शुक्ल योगात लग्न असणार आहे. ‘रुद्र’ या नावावरूनच येणारे नवीन वर्ष आपत्तीजन्य असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिंदू धार्मिक शास्त्रानुसार रुद्र संवत्सरामध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता असते. याचा परिणाम पिकांवरही दिसून येऊ शकतो. त्यामुळे या नव्या वर्षात धान्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. संवत गणनेनुसार रुद्र संवत्सरमध्ये जंगलात आग लागण्याच्या घटनाही वाढू शकतात.

या हिंदू नववर्षात १७ मे ते १५ जून या कालावधीत ज्येष्ठ अधिक मास असणार आहे. त्यामुळे हिंदू वर्षात १२ ऐवजी १३ महिने असतील. अधिक मास हा खगोलीय गणनेशी संबंधित आहे. चांद्र वर्ष अंदाजे ३५४ दिवसांचे असते, तर सौर वर्ष ३६५ दिवसांचे असते. दरवर्षी अंदाजे ११ दिवसांचा फरक पडतो. जेव्हा हा फरक सुमारे ३० दिवसांपर्यंत पोहोचतो, तेव्हा एक अतिरिक्त महिना जोडला जातो, त्यालाच अधिक मास म्हणतात. यावर्षीच्या हिंदू वर्षात हा ज्येष्ठ अधिक मास येणार आहे. अधिक महिन्यात पूजा करणे, दान करणे आणि हवन करणे शुभ मानले जाते. अधिक मास हा ‘पुरुषोत्तम मास’ म्हणूनही ओळखला जातो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या काळात भगवान विष्णूची पूजा, हवन, जप, दान आणि धार्मिक ग्रंथांचे पठण करणे उत्तम मानले जाते. या अधिक महिन्यात पवित्र तीर्थस्थळी दर्शन आणि स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जाण्याची शक्यता आहे. त्यात नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा सुरू होणार असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने येथे येतील. ( Vikram Samvat 2083 )

=======

हे देखील वाचा : Shimga : कोकणचो शिमगो…कोकणातील पालखी परंपरा

=======

धार्मिक कार्यासाठी अधिक महिना शुभ मानला जात असला तरी या महिन्यात विवाह, नामकरण, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात केली जात नाही. या अतिरिक्त महिन्यामुळे वर्षाच्या उत्तरार्धात उपवास आणि सणांच्या तारखा १५ ते २० दिवसांनी बदलण्याची शक्यता आहे. या हिंदू नववर्षाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विक्रम संवत २०८३ मध्ये गुरु ग्रहाचा प्रभाव अधिक असल्याचे मानले जाते. गुरु हा ज्ञान, धर्म, नीतिमत्ता आणि विस्ताराचा ग्रह मानला जातो. परिणामी, या वर्षी धार्मिक, आध्यात्मिक आणि शिक्षणाशी संबंधित कामांकडे लोकांचा अधिक कल वाढेल, असे तज्ञांचे मत आहे. ( Vikram Samvat 2083 )

– सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.