Home » Venezuela President : डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यासमोरची आव्हाने

Venezuela President : डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यासमोरची आव्हाने

by Team Gajawaja
0 comment
Venezuela President
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानं झालेल्या कारवाईत, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन सैन्यानं ताब्यात घेतले आहे. मादुरो यांना न्यू यॉर्कमध्ये आणण्यात आले असून त्यांच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. या सर्वात आता व्हेनेझझुएलाचे प्रशासन अमेरिकेच्या ताब्यात असल्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली. त्यामुळे व्हेनेझुएलामध्ये अनिश्चितता पसरली असतांनाच व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांची कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. रॉड्रिग्ज यांना मादुरो यांच्या जवळच्या सहकारी आणि व्हेनेझुएलाच्या राजकारणातील एक शक्तिशाली व्यक्ती मानले जाते. त्या व्हेनेझुएलामध्ये लेडी टायगर म्हणून प्रसिद्ध आहेत. कार्यवाहक अध्यक्षपद ताब्यात घेतल्यावर डेल्सी यांनी सर्वप्रथम जो संदेश दिला, त्यामध्ये अमेरिकेला अध्यक्ष निकोलस आणि त्यांच्या पत्नी यांना परत करावे अशी मागणी केली आहे. शिवाय व्हेनेझुएला मोठ्या संकटातून जात आहे, पण जिद्दीनं हा देश यावर मात करेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. रशियाच्या समर्थक असलेल्या डेल्सी यांच्यापुढचा काळ सर्वात आव्हानात्मक रहाणार आहे. तेलाच्या राजकारणावरुन अमेरिका यापुढे व्हेनेझुएलाला कामय नमते घ्यायला लावणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता देशाच्या विकासाला प्राधान्य देणे आणि निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीची सुटका करणे या पहिल्या आव्हानाला डेल्सी कशाप्रकारे तोंड देतात, याकडे जगाचे लक्ष आहे. ( Venezuela President  )

Delcy Rodríguez

Delcy Rodríguez

डेल्सी रॉड्रिग्ज २०१८ पासून व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती आहेत. त्या व्हेनेझुएलाच्या तेलावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेचे तसेच गुप्तचर सेवेचे पर्यवेक्षण करतात. डेल्सी रॉड्रिग्ज यांचा जन्म १८ मे १९६९ रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे झाला. डाव्या विचारसरणीचे नेते आणि माजी गुप्तचर अधिकारी जॉर्ज अँटोनियो रॉड्रिग्ज यांच्या कन्या आहेत. डेल्सी यांच्याच वडिलांनी १९७० च्या दशकात लीगा सोशलिस्टा या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली आहे. डेल्सी रॉड्रिग्ज, निकोलस मादुरोच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक मानल्या जातात. त्यांचा भाऊ जॉर्ज रॉड्रिग्ज हा सुद्धा व्हेनेझुएला प्रशासनाच्या मुख्य पदावर आहे. डेल्सी रॉड्रिग्ज यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाची सरकारी पदे भूषवली आहेत. दळणवळण आणि माहिती मंत्री, परराष्ट्र मंत्री, सरकार समर्थक संविधान सभा प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. २०१८ मध्ये, डेल्सी रॉड्रिग्ज यांना व्हेनेझुएलाच्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये, डेल्सी यांना तेल मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. वकील असलेल्या डेल्सी या आपल्या फॅशनसाठीही ओळखल्या जातात.

त्याच्या कार्याचा आवाक अफाट असल्यामुळेच त्यांना व्हेनेझुएलामध्ये लेडी टायगर या नावानं ओळखलं जातं. मादुरो यांच्या सर्वात विश्वासू साथीदार असलेल्या डेल्सी यांच्यापुढे आता मादुरो यांना अमेरिकेच्या ताब्यातून सहीमलामत परत आणण्याचे अशक्यप्राय काम करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकेला संदेश पाठवून मादुरो सुरक्षित असल्याचा पुरावा मागितला आहे. ( Venezuela President  )

व्हेनेझुएलाच्या संविधानानुसार राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपतींना सत्तेचा अधिकार आहे. कलम २३३ आणि २३४ अंतर्गत, उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतींची तात्पुरती किंवा कायमस्वरूपी कर्तव्ये स्वीकारावी लागतात. डेल्सी यांनी या तरतुदीनुसार पदभार हाती घेताच प्रथम अमेरिकेला संदेश पाठवला आणि त्यानंतर अस्थिर झालेल्या व्हेनेझुएलामधील नागरिकांना शांततेचा संदेश पाठवला आहे. त्यांनी अमेरिकेच्या हल्ल्याचे वर्णन आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाचे उघड उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. आमच्या महान मातृभूमीच्या लोकांना एकजूट राहण्याचे आवाहन असून व्हेनेझुएलाचे जे झाले आहे ते कोणत्याही देशाच्या बाबतीत घडू शकते, असेही डेल्सी यांनी सांगितले आहे. शिवाय या देशात फक्त एकच राष्ट्रपती आहे आणि त्यांचे नाव निकोलस मादुरो मोरोस असल्याचे ठासून सांगितले आहे.

=======

हे देखील वाचा : America Vs Venezuela : अखेर व्हेनेझुएलावर अमेरिकेचा हल्ला

=======

डेल्सी रॉड्रिग्ज यांच्या या पहिल्याच संदेशातून त्यांची राजकीय परिपक्वता दिसून आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने झालेल्या कारवाईचा अनेक देशांनी विरोध केला आहे. रशिया, चीन या देशांनी अमेरिकेच्या या कृतीचा निषेध केला आहे. डेल्सी यांनी या सर्व अमेरिका विरोधी देशांना आता आपण एक झालं पाहिजे, अशी अप्रत्यक्ष साद घातली आहे. ( Venezuela President  )

सई बने… 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.