Home » तिसरं महायुद्ध टळलं !

तिसरं महायुद्ध टळलं !

by Team Gajawaja
0 comment
Vasili Arkhipov
Share

जगात आजवर अनेक युद्ध झाले आहेत. त्यांचा इतिहास आपण ऐकला वाचला आहे, पण युद्ध टळल्याचा इतिहास आपण कधीच ऐकला नाही. युद्ध एकाला विजय देतं, पण त्याचसोबत, ते युद्ध हरणाऱ्याचं आणि विजय मिळवणाऱ्याचं खूप काही हिरावून घेऊन जातं. त्यामुळे प्रत्येक युद्ध थांबवता आलं पाहिजे. आजची गोष्ट अशाच एका माणसाची आहे ज्याने उंबरठ्यावर आलेलं तिसरं महायुद्ध धुडकावून लावलं. त्यांचं नाव वासिली अर्खिपोव्ह ते सोव्हिएत संघाचे नेव्ही ऑफिसर होते. जगाला एका भयंकर विध्वंसापासून वाचवणाऱ्या या सैनिकाच नाव, जगात खुप कमी लोकांना माहीती असेल. वासिली अर्खिपोव्ह यांनी असं काय केलं ज्याने तिसरं महायुद्ध टळलं. (Vasili Arkhipov)

दुसरं महायुद्ध संपलं होतं. सोव्हिएत संघ म्हणजेच रशिया एक सुपरपॉवर म्हणून उदयास आला होता. दुसऱ्या महायुद्धामुळे युरोपचं प्रचंड नुकसान झालं होतं. युद्धामुळे अनेक युरोपीय देश आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या कमकुवत झाले होते. त्यामुळे मित्र राष्ट्रांनी मिळून NATO ही एक संघटना स्थापन केली. ज्याचे सदस्य एकूण बारा देश होते. NATO या संघटनेचं उद्दिष्ट होतं की सोव्हिएत संघाच्या वाढत्या वर्चस्वाला कंट्रोलमध्ये ठेवणं आणि NATO सदस्य देशांचं सर्वांनी मिळून संरक्षण करणं. एका सदस्य देशावर हल्ला झाला तर तो सर्व सदस्य देशांवर झालेला हल्ला मानला जातो. NATO अंतर्गतच अमेरिकेने इटली आणि टर्की सारख्या देशात न्यूक्लियर वेपन इंस्टॉल केले. त्यामुळे रशिया या न्यूक्लियर वेपनसच्या रडारवर होतं. सोव्हिएत संघ हे सगळं हाताची घडी घालून बघणाऱ्यातलं तर नव्हतं. (Vasili Arkhipov)

सोव्हिएत संघाने सुद्धा अमेरिके जवळ क्यूबा देशात न्यूक्लियर मिसाईल्स तैनात करण्यास सुरुवात केली. हे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका हेलिकॉप्टरने पहिलं आणि त्याचे फोटो सुद्धा काढले. त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जॉन एफ. केनडी यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी क्युबावर थेट हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी सोव्हिएत जहाजांना क्युबावर येण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी क्युबाच्या समुद्रात आपले जहाज उतरवून नाकाबंदी केली. राष्ट्रध्यक्ष जॉन एफ. केनडी यांना सोव्हिएत संघ क्युबामध्ये अमेरिकेविरुद्ध मिसाईल्स उभे करत आहे हेच माहिती होतं. ते मिसाईल्स न्यूक्लियर मिसाईल्स आहेत हे त्यानं माहिती नव्हतं. (Vasili Arkhipov)

आता या नाकाबंदीला प्रतिउत्तर देण्यासाठी मॉस्कोमध्ये रोंडियानो मालीनोवस्की यांनी एक मीटिंग बोलावली. रोंडियानो मालीनोवस्की हे सोव्हिएत मिलिटरी चे कमांडर होते. त्यांनी सोव्हिएत आर्मी ऑफिसर्ससोबत अमेरिकेच्या नाकाबंदीविरुद्ध एक मिशन आखलं. या मिशनचं उद्दिष्ट होतं अमेरिकेने सोव्हिएत संघा विरुद्ध क्युबामध्ये काही हालचाल केली तर लगेच अमेरिकेवर हल्ला करणं. तो ही साधा सुद्धा हल्ला नाही, सोव्हिएत संघ अमेरिकेवर अणू बॉम्ब हल्ला करण्याच्या तयारीत होतं. यासाठी चार सबमरीनस म्हणजे पाणबुड्या पाठवण्यात येणार होत्या. या मिशनसाठी पाठवण्यात क्रूचे प्रमुख होते वासिली अर्खिपोव्ह. त्यांच्यासोबत आणखी २ प्रमुख ऑफिसर होते. B- 59 या सबमरीनचे कॅप्टन वॅलेन्टिन सावित्स्की आणि सोव्हिएत संघाचे राजकीय अधिकारी इव्हान मस्लेनिकोव्ह. (Vasili Arkhipov)

B- 59 सह इतर तिन्ही पाणबुड्यांच्या टॉरपेडोवर न्यूक्लियर वेपन्स इंस्टॉल करण्यात आले होते. हे न्यूक्लियर वेपन्स अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा जास्त ताकदवर होते. मग 1 ऑक्टोबर 1962 रोजी या चारही पाणबुड्या क्युबाच्या दिशेने निघाल्या. रशियाची सागरी सीमा पार केल्यानंतर रेडिओच्या मदतीने त्यांनी रशियाशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की जहाजामध्ये एका ब्लॅकबॉक्समध्ये मिशनची पूर्ण माहिती पुरवण्यात आली आहे आणि पाणबुड्यांवर स्पेशल वेपन्स म्हणजे न्यूक्लियर वेपन्स सुद्धा आहेत. त्याचा वापर करण्यासाठी कोणाचीही पर्मिशन घेण्याची त्या तिघांना गरज नाहीये, फक्त न्यूक्लियर वेपन लॉंच करण्याआधी त्या तिन्ही ऑफिसरसची त्यासाठी सहमती हवी.

वासिली अर्खिपोव्ह यांचा क्रू जवळ जवळ 11,000 किलोमीटरचा प्रवास करून क्युबाच्या कॅरीबियन समुद्रात दाखल झाले. इतक्या दिवसांच्या प्रवासामुळे आणि पाणबुडीच्या बंद वतावरणामुळे सर्व सैनिक वैतागले आणि थकले होते. पण आता मिशनला खरी सुरवात झाली होती. त्यांना अमेरिकेची नाकाबंदी पार करून क्युबापर्यंत जायचं होतं, तेही अमेरिकेच्या नजरेस न पडता. पण अमेरीकेने नाकाबंदी एवढी कडक लावली होती की साधा मासा जरी पाण्यात हलला तरी ते अमेरिकन नौदलाला कळत होतं. एवढी मोठया पाणबुड्या त्यांच्या नजरे खालून कश्या सुटल्या असत्या? (Vasili Arkhipov)

पण या पाणबुड्या क्युबाला पोहचण्याआधीच अमेरिकेला हे कळालं की सोव्हिएत संघाने क्युबामध्ये न्यूक्लियर मिसाईल्स इंस्टॉल केल्या आहेत. त्यामुळे रशियाहून वासिली अर्खिपोव्ह यांच्या क्रूसाठी एक रेडिओ संदेश आला की, “पाणबुड्या क्युबाला नेण्याची गरज नाही सध्या आहात तिथे थांबा, सुरक्षित.” अमेरिकन नौदलाच्या इतक्या जवळ असताना सुरक्षित कसं थांबणार? वासिली अर्खिपोव्ह यांच्याकडे एकच पर्याय होता, पाणबुड्या समुद्रात आणखी खोलं नेण्याचा. हे केल्यामुळे पाणबुड्यांचा रशियाशी संपर्क तुटत होता. शिवाय पाणबुड्यांमधली बॅटरी संपल्यामुळेएअर कंडिशनिंगसुद्धा कामं करणं बंद केलं होतं. पाणबुड्यांमध्ये तापमान आणि सैनिकांमध्ये अस्वस्थता वाढत होती. त्यांना लवकरात लवकर क्युबाच्या किनाऱ्यावर जाणं भाग होतं. पण वासिली अर्खिपोव्ह आणि इतर दोन्ही अधिकारी काही निर्णय घेणार त्या आधीच अमेरिकन नौदलाने B- 59 पाणबुडीवर हल्ला करण्यास सुरुवात केली.

पाणबुडीच्या आजूबाजूला असंख्य धमाके होत होते. त्यामुळे B – 59 ही पाणबुडी समुद्रात घुसळली जात होती. अमेरिकन नौदल B-59 या पाणबुडीवर डायरेक्ट हल्ला न करता, पाणबुड्यांच्या आजूबाजूला हल्ला करत होते, जेणेकरून ते समुद्राच्या तळावर येतील. पण B-59 चे कॅप्टन वॅलेन्टिन सावित्स्कीने ठरवलं की अमेरिकन नौदलावर आता न्यूक्लियर हल्ला करायचा. “आम्ही मरु पण तुम्हाला मारून मरु,” असं कॅप्टन वॅलेन्टिन सावित्स्की कडाडले आणि न्यूक्लियर वेपन लॉंच करण्याच्या तयारीला लागले. त्यांना सहमती होती सोव्हिएत संघाचे राजकीय अधिकारी इव्हान मस्लेनिकोव्ह यांची. पण न्यूक्लियर वेपन लॉंच करण्यासाठी त्यांना आणखी एका माणसाच्या सहमतीची गरज होती, ती म्हणजे वासिली अर्खिपोव्ह यांची. कॅप्टन वॅलेन्टिन आणि इव्हान मस्लेनिकोव्ह हे वासिली अर्खिपोव्ह यांना जीव तोडून समजावू लागले की आता न्यूक्लियर वेपन लॉंच करण्याची गरज आहे, नाहीतर आपण मरुच आणि मिशन सुद्धा फेल होईल. पण वासिली अर्खिपोव्ह हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते, काहीही झालं तरी न्यूक्लियर वेपन लॉंच नाही करायचं हे त्यांनी ठरवलं होतं. वासिली अर्खिपोव्ह हे कॅप्टन वॅलेन्टिन आणि इव्हान मस्लेनिकोव्ह यांना समजावत होते की आपल्यावर हल्ला झाला नाही आहे. अमेरिका आपल्याला फक्त बाहेर येण्याचा संदेश देत आहे. (Vasili Arkhipov)

======

हे देखील वाचा : युक्रेनवर ओढावले मोठे वीज संकट

======

थोड्या वेळाने,जेव्हा हे हल्ले थांबले, तेव्हा B-59 आणि इतर पाणबुड्या समुद्र तळावर आल्या, अमेरिकन नौदलाने पाणबुड्यांची तपासणी केली नाही आणि त्यांना परत मायदेशी परतण्याचे आदेश दिले. काही दिवसांनी सोव्हिएत संघ प्रमुख निकीता ख्रुश्चेव्ह यांनी अमेरिकेशी वाटाघाटी करून क्युबामध्ये इंस्टॉल केलेले न्यूक्लियर मिसाईल्स पुन्हा रशियाला नेले. वासिली अर्खिपोव्ह यांच्या एका निर्णयामुळे तिसरं महायुद्ध सुरू होण्याआधीच टळलं. त्याच्या या निर्णयामुळे त्यांना सोव्हिएत संघाच्या अनेक नेत्यांच्या टोमण्यांचा सामाना करावा लागला. पण नंतर हे सर्वांनीच मान्य केलं की वासिली अर्खिपोव्ह यांच्या एका नकारामुळे पृथ्वीवर होणारा सर्वात मोठा विध्वंस टळला. प्रत्येक देशाने युद्धाला वासिली अर्खिपोव्ह यांच्यासारखा नकार दिला पाहिजे. मगच हे जग माणसांसाठी माणसांपासून सुरक्षित होईल. (Vasili Arkhipov)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.