कोरोनामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मला सोनेरी दिवस आले. आता कोरोनाचा काळ ओसरला असला तरी ओटीटी माध्यम मात्र तेवढेच लोकप्रिय ठरले आहे. त्यामुळेच नव्या वेबसिरीज आणि मोठ्या पडद्यावर रिलीज झालेले चित्रपट महिन्याभरात या छोट्या पडद्यावरही येत आहेत. काही मध्यम बजेटचे चित्रपट थेट ओटीटीवर रिलीज होत आहेत. त्यापैकी काही चित्रपटांनी अपेक्षेपेक्षाही अधिक गल्ला जमवल्यानं बिग बजेट चित्रपट निर्मातेही ओटीटी प्लॅटफॉर्मला प्राधान्य देत आहेत. येत्या आठवड्यातही ओटीटीवर असेच चित्रपट पाहता येणार आहेत.
तुलसीदास ज्युनिअर

19 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर ‘तुलसीदास ज्युनिअर’ हा चित्रपट रिलीज होतोय. आशुतोष गोवारीकर यांचा हा चित्रपट क्रीडा विश्वावर आधारीत आहे. मृदूल निर्मित चित्रपट दिवंगत अभिनेते राजीव कपूर यांच्यामुळेही चर्चेत आहे.
ऋषि कपूर यांचे छोटे बंधू असलेले राजीव कपूर गेली अनेक वर्ष कॅमेऱ्यापासून दूर होते. ‘तुलसीदास ज्युनिअर’च्या निमित्तानं ते कॅमेऱ्याला सामोरे गेले. मात्र दुर्दैवानं राजीव कपूर यांचा मृत्यू झाला आणि ‘तुलसीदास ज्युनिअर’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटात संजय दत्त आणि बाल कलाकार म्हणून वरुण बुद्धदेव यांचीही भूमिका आहे.
लंडन फाइल्स

21 एप्रिल रोजी वूट सिलेक्टवर ‘लंडन फाइल्स’ ही वेबसिरीज रिलीज होतेय. गुन्हेगार आणि गुप्तहेर यांची कथा असलेल्या या वेबसिरीजमध्ये अर्जुन रामपाल आणि पूरब कोहली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लंडनची पार्श्वभूमी असलेल्या या सिरीजमध्ये ओम सिंह या गुप्तहेराच्या भूमिकेत अर्जुन रामपाल असून तो अमर रॉय अर्थात पूरब कोहली या उद्योजकांच्या मुलीच्या शोधात असतो. सहा भाग असलेल्या या वेबसिरीजचे दिग्दर्शक सचिन पाठक असून यामध्ये सपना पब्बी, मेधा राणा, गोपाल दत्त यांच्याही भूमिका आहेत.
गिल्टी माइंड्स

22 एप्रिल रोजी प्राइम व्हिडीओवर ‘गिल्टी माइंडस’ ही वेबसिरीज रिलीज होतेय. कोर्ट रुम ड्रामा असलेल्या या वेबसिरीजमध्ये श्रीया पिळगांवकर आणि वरुण मित्रा प्रमुख भूमिकेत आहेत. शिवाय शक्ती कपूर, सतीश कौशिक, कुलभूषण खरबंदा सारखे जेष्ठ अभिनेतेही या सिरीजमध्ये असल्यानं सिरीजबाबत उत्सुकता आहे.
शेफाली भूषण या सिरीजच्या दिग्दर्शिका आहेत. याच दिवशी लाईंसगेट प्लेवर ‘बर्न्ट’ नावाचा चित्रपट रिलीज होतोय. एका शेफची ही कहाणी आहे. ब्रेडली हा शेफ एडम जोन्स यांच्या भूमिकेत आहे. 2015 रोजी मोठ्या पडद्यावर आलेला बर्न्ट गाजलेला चित्रपट आहे. सिएना मिलर, उमर सी, डैनियल ब्रुहल, मैथ्यू राइस, उमा थरमन, एमा थॉम्पसन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आता ओटीटीवर येत आहे.
अनुपमा – नमस्ते

25 एप्रिल रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर ‘अनुपमा – नमस्ते’ अमेरिका ही स्पेशल सिरीज रिलीज होतेय. अनुपमा या सध्या गाजत असलेल्या मालिकेवर ही विशेष मालिका असून ती फक्त ओटीटीवर असेल. अर्थात रुपाली गांगुली यातही प्रमुख भूमिकेत आहे.
=====
हे देखील वाचा – नाना इज बॅक…
=====
गॅसलिट

25 रोजी लाइंसगेट प्लसवर ‘गॅसलिट’ सिरीज येतेय. अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या वॉटरगेट स्कॅडलवर आधारीत ही सिरीज आहे. यात ज्युलिया रॉबर्टस, शॉन डैन, बेटी गिलपिन प्रमुख भूमिकेत असतील.