Home » Donald Trump : शाही मित्रासाठी शाही भेट आणि वाद !

Donald Trump : शाही मित्रासाठी शाही भेट आणि वाद !

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या आठवड्यात मध्य पूर्वेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यामध्ये ट्रम्प हे सौदी अरेबिया आणि कतार या देशांना भेट देणार आहेत. डोनाल्ड ड्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या दुस-या काळातील हा पहिलाच मध्यपूर्व देशांचा दौरा आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी या देशांमध्ये मोठी तयारी सुरु आहे. कतारमधील राजघराण्यानं तर अब्जो रुपये किंमतीचे अलिशान जंबो जेटच ट्रम्प यांना भेट स्वरुपात देण्याची तयारी सुरु केली आहे. (Donald Trump)

या अलिशान भेटीची बातमी बाहेर आली आणि ट्रम्प यांच्यावर टिका सुरु झाली आहे. अमेरिकेमध्येही ट्रम्प यांना या भेटीबद्दल जाब विचारण्यात येत आहे. कतार हा देश अनेक अतिरेकी संघटनांचा मित्र देश म्हणून ओळखला जातो. अशा देशाकडून अलिशान भेट ट्रम्प कशी स्विकारु शकतात, हा प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहे. शिवाय अमेरिकेच्या संविधानानुसार परदेशातून भेटवस्तू स्वीकारण्याचा अधिकार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मध्य पूर्वेच्या दौ-याआधीच मोठी टिका सुरु झाल्यानं कतारच्या अधिका-यांनी पुढे येत अशास्वरुपाची भेट देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र व्हाईट हाऊसनं याबाबत काहीही वक्तव्य केलेले नाही. (International News)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करणार आहेत. या काळात ट्रम्प व्यापारी सौदे करणार आहेत. मात्र ट्रम्प यांना खुश कऱण्यासाठी कतार मधील राजघराण्यानं एक शाही भेट पुढे केली, आणि ट्रम्प यांचा सर्वच दौरा वादात सापडला आहे. कतारच्या राजघराण्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांना 400 दशलक्ष डॉलर्स किमतीचे बोईंग 747 जंबो जेट भेट दिल्याच्या बातम्या पुढे आल्या. हे विमान त्यातील अलिशान सुविधांमुळे ओळखले जाते. या विमानाच्या आतील सजावट ही एखाद्या राजमहलापेक्षाही अधिक देखणी कऱण्यात आली आहे. या विमानातून प्रवास करणा-या व्यक्तिला विमानाऐवजी एखाद्या राजवाड्यातूनच प्रवास होत असल्याची जाणीव होते. 33 अब्ज रुपये किंमतीच्या या विमानात हॉल, मिटींग रुम, बेडरुम, बाथरुम अशा सर्वांचीच सजावट अलिशान फर्निचरनं केलेली आहे. या फर्निचरला सोन्याचा मुलामाही लावण्यात आल्याची माहिती आहे. हेच विमान आता ट्रम्प यांच्या सेवेत येणार असल्याची बातमी आहे. (Donald Trump)

कतार राजघराण्यानं हे विमान ट्रम्प यांना देण्यासाठी तयार कऱण्यास सुरुवात केली आहे. ही बातमी बाहेर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. कारण कतार राजघराणे हे अनेक अतिरेकी संघटनांनाही पाठिंबा देत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कतार राजघराणे ट्रम्प यांना अलिशान भेट देऊन काय साधण्याचा प्रयत्न करणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पहिल्या मध्य पूर्वेच्या दौ-यात त्यांचा पहिला मुक्काम सौदी अरेबिया असणार आहे. सौदीचे क्राउन प्रिन्स आणि ट्रम्प यांची मैत्री जगजाहीर आहे. क्राऊन प्रिन्स अमेरिकेत $600 अब्ज गुंतवणूक करणार आहेत. त्यानंतर ट्रम्प हे कतारमध्ये जाणार आहेत. ट्रम्पच्या या भेटीसाठी कतारच्या राजघराण्यानंही तयारी सुरु केली आहे. कतार राजघराण्याकडून ट्रम्प यांना भेट म्हणून आलिशान बोईंग 747 जंबो जेट देण्यात येणार आहे. (International News)

भविष्यात हे जेट अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या विमानात रूपांतरित कऱण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. ट्रम्प जानेवारी 2029 पर्यंत या विमानाचा वापर करणार असल्याचीही माहिती आहे. अलिशान अशा या विमानापुढे, सध्या ट्रम्प जे विमान वापरत आहेत, ते अगदिच जुनाट वाटेल असेच आहे. वास्तविक ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये वेस्ट पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या आलिशान जेटमधून प्रवास केल्याचेही उघड झाले आहे. प्रशासनाने राष्ट्रपतींच्या वापरासाठी बोईंग 747 अपग्रेड करण्यासाठी संरक्षण कंत्राटदार एल हॅरिस यांना नियुक्तही केले आहे. ट्रम्प यांना देण्यात येण्यापूर्वी हेच विमान कतार राजघराणेही वापरत होते. आता ते थेट अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यात सामावणार आहे. त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देशाचे संविधान टाळून अशी भेट कशी घेऊ शकतात, हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. (Donald Trump)

==============

हे देखील वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

Operation Sindoor : या तीन मित्रांनी लिहिली ‘ऑपरेशन सिंदूर’ची स्टोरी !

==============

हा विमानाचा वाद वाढल्यावर कतारचे मिडिया प्रमुख अताशे अली अल-अन्सारी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विमान भेट दिल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. मात्र ट्रम्प यांच्या विरोधकांनी व्हाईट हाऊसने याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. कतार हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. पण कतारचे जगभरातील दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत. कतारची राजधानी दोहा येथे तालिबानचे राजकीय कार्यालय असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर कतारचे हमासशीही मैत्रीचे संबंध आहेत. गाझाच्या या दहशतवादी संघटनेला कतार मोठ्या प्रमाणात पैसा देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं या देशाचा दौरा करणे आणि त्यांच्याकडून अलिशान भेटी घेणे, हे चुकीचे असल्याची टिका ट्रम्प यांच्यावर होत आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.