१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला हे तर आपल्याला माहीतच आहे. पण त्याआधी, म्हणजे १९४७ च्या ही आधीच, भारतातला Rather महाराष्ट्रातला असा एक जिल्हा होता जो स्वतंत्र झाला होता. पण नेमका कसा ? आणि कोणता होता हा जिल्हा ? हे जाणून घेऊ. (Maharashtra District)
तर मंडळी, भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी 3 दिवसांसाठी स्वतंत्र झालेला हा जिल्हा म्हणजे अनेक राजकारण्यांची पंढरी, म्हणजेच सोलापूर ! महाराष्ट्राचे कित्येक धडाडीचे राजकारणी या जिल्ह्याने अगदी जवळून अनुभवले, त्यांची कर्मभूमी म्हणजे हा सोलापूर जिल्हा. चालुक्य, यादव, राष्ट्रकुट, बहामनी यांसारख्या विविध राजवटींची सत्ता लाभलेल्या सोलापूर जिल्ह्याचा इतिहास हा फार मोठा आहे.
या सोलापूरबद्दल सांगायचं झालं तर जुन्या मान्यतेनुसार सोळा पूर, अर्थात सोळा गावं एकत्र आली आणि एक भलंमोठं गाव तयार झालं आणि त्यालाच पुढे सोलापूर असं नाव पडलं. ती १६ गाव म्हणजे – आदिलपूर, अहमदपूर, चपालदेव, फतेहपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांदरवाडी, मुहम्मदपूर, राणापूर, संदलपूर, शैकपूर, सोलापूर, सोनालगी, सोनापूर आणि वैदकवाडी. सोलापूर किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखावरून हे शहर सोन्नलपूर म्हणून ओळखले जात असल्याचे दिसून येते तर किल्ल्यातील विहिरीवरील दुसऱ्या शिलालेखावरून ते संदलपूर म्हणून ओळखले जात असल्याचे दिसून येते. तर अशा एकापेक्षा एक रंजक इतिहासाने भरलेल्या ह्या सोलापूर जिल्ह्याची अजून एक रंजक गोष्ट म्हणजे हा जिल्हा भारत स्वतंत्र होण्याआधी ३ दिवस स्वतंत्र झाला होता. (Maharashtra District)

तर त्यामागची गोष्ट अशी की सोलापूरच्या नागरिकांनी १९३० साली ९ ते ११ मे असे तीन दिवस स्वातंत्र्याचा आनंद घेतला होता. ज्या दिवशी अख्खा भारत पारतंत्र्य उपभोगत होता, त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील नागरिक मात्र स्वातंत्र्य काय असतं याचा अनुभव घेत होते. पण हे कसं शक्य झालं, तर १९३० साली जेव्हा गांधीजींना अटक करण्यात आली तेव्हा संपूर्ण भारतात ब्रिटिश राजवटीविरुद्ध निदर्शनं झाली. सोलापूरमध्येही मोठ्या प्रमाणात मोर्चे आणि निदर्शनं झाली. यादरम्यान पोलिसांनी नागरिकांवर गोळीबार केला. तेव्हा पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांचे प्राण गेले. त्यामुळे संतप्त जमावाने पोलिस ठाण्यांवर हल्ला केला. भीतीमुळे पोलिस आणि इतर अधिकारी सोलापूर सोडून पळून गेले. सोलापूर जिल्ह्यात कायदेशीर असा एकही रक्षक दिसत नव्हता. जणू कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर होती. या काळात नागरिकांच्या कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर होती.
================
हे देखील वाचा : Airports : ‘ही’ आहेत जगातील सर्वाधिक धोकायदायक विमानतळं
================
पुढे ३ दिवस जिल्ह्यात यायची हिंमत ब्रिटीशांनी केली नाही. या काळात इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे सोलापूर अध्यक्ष रामकृष्ण जाजू यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सर्व परिस्थिती हाताळली. अशा पद्धतीने तीन दिवस इथे भारतीय लोकशाही नांदत होती आणि लोक खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगत होते. (Maharashtra District)
आणखी एक इंटेररेस्टिंग गोष्ट म्हणजे सोलापूर नगर परिषद ही भारतातील पहिली नगर परिषद होती, जिने १९३० मध्येच नगर परिषद इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवला. देशभरात अशा प्रकारची ही पहिली आणि अनोखी घटना होती. त्यानंतर चिडून ब्रिटीश राज्यकर्त्यांनी सोलापूरमध्ये मार्शल लॉ जाहीर केला आणि अनेक नेत्यांना आणि निष्पाप नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आजही सोलापूर शहराच्या मध्यभागी ह्या हुतात्म्यांचं स्मृती स्मारक आहे, ही जागा हुतात्मा चौक म्हणून ओळखली जाते.
