Home » ‘या’ देशाचे झाले खायचे वांदे…

‘या’ देशाचे झाले खायचे वांदे…

by Team Gajawaja
0 comment
Food Inflation
Share

एक किलो गव्हाच्या पिठासाठी तीन हजार रुपये, चिकनसाठी हजार रुपये, गॅस सिलेंडरसाठी दहा हजार रुपये, रोजच्या जेवणातील भाज्यांच्या दराचे तर विचारु नका. पाव किलो भाजी घ्यायची म्हणजे हजार रुपये हवेतच ही सध्याची परिस्थिती आहे, आपल्या शेजारच्या पाकिस्तानची.  ही परिस्थिती बघता पाकिस्तानचे वर्णन दुसरे श्रीलंका असे केले जात आहे. (Food Inflation)  

आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. यामुळे शेतमालाचे नुकसान झाले. परिणामी आता या देशात अन्नधान्याची कमतरता जाणवू लागली आहे.  पाकिस्तानची दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. तेथील नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत आणि अशा परिस्थितीत रोजच्या कमाईवर जगणा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे.(Food Inflation) बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे देशाची अर्थव्यवस्था पुरती डबघाईला गेली. यादरम्यान पाकिस्तानला परकीय मदतही प्राप्त झाली. मात्र तेथील सरकारने या मदतीचे वाटपही योग्य प्रकारे केले नाही.  त्यामुळे सामान्य नागरिकांची परिस्थिती हलाखिची झाली आहे. तेथील नागरिकांना आता जेवण करण्यासाठी लागणारा गॅस आणि चिकन खरेदी करणेही कठीण झाले आहे. डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये चिकन 650 रुपये किलोपर्यंत विकले जात आहे, तर एलपीजी गॅसच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. यात पाकिस्तानमध्ये ऊर्जा संकटही अधिक गडद झाले आहे.  ही परिस्थिती किती गंभीर आहे, हे दाखवण्यासाठी  सरकारने विजेचे दिवे न लावता मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सूर्यप्रकाशाचा वापर करत झालेल्या या बैठकीत देशातील ऊर्जा संकटाची माहिती देण्यात आली.  मात्र यावर उपाय काय, हे कोणालाही सांगता आले नाही. लोकांनी वीज वाचवावी असा आदेश देण्यात आला आहे.  मात्र कराचीमध्ये नागरिकांनी वीज बचत करण्याच्या सरकारच्या योजनेविरोधात निदर्शने केली आहेत. सरकारच्या ऊर्जा बचत योजनेला बहुतांश व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. इस्लामाबादमधील कामगार संघटनेने ही योजना लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बलुचिस्तानमध्ये 10-12 तास, तर खैबर पख्तुनख्वामध्ये 6 ते 12 तास वीजपुरवठा खंडित होत आहे.  पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांमध्येही  सरकारची वीज बचतीची योजना स्वीकारण्यास नकार देण्यात आला आहे. दोन्ही प्रांतात इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे सरकार सत्तेवर आहे. 

फक्त विजेच्या बाबतीतच नाही तर पाकिस्तानमध्ये सर्वच बाबतीत दिवाळे निघाल्याची परिस्थिती आहे. पाकिस्तानमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 10 हजार पाकिस्तानी रुपयांना विकला जात आहे. पाकिस्तानातील सर्वाधिक गॅस उत्पादक प्रांत असलेल्या खैबर पख्तुनख्वामध्ये त्रासलेले लोक पिशव्यांमध्ये गॅस भरून अन्न शिजवत आहेत(Food Inflation). या प्रांतात गॅस सिलेंडर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला गॅस घेऊन जातांनाचा येथील नागरिकांचा फोटो हा जगभर व्हायरल झाला. असा गॅस हा एखाद्या बॉम्ब सारखा घातक ठरु शकतो.  पण गरीबीने त्रस्त झालेल्या पाकिस्तानी नागरिकांना यातील धोक्याकडेही दुर्लक्ष करावे लागत आहे.  पाकिस्तानमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये एलपीजी गॅस 500 ते 900 रुपयांना मिळतो. सोयीनुसार वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्यांमध्येही ते उपलब्ध आहे. ते भरण्यासाठी वापरलेला कंप्रेसरही अवघ्या 1500 ते 2000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे व्यावसायिक हा असा गॅस घेणे सध्या पसंद करीत आहेत.  असे करतांना स्फोट होऊ शकतो, याची जाणीवही नागरिकांना आहे. मात्र एका गॅससाठी दहा हजार देणे त्यांना परवडत नसल्यानं असा धोका स्विकारावा लागत असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, सिंध, पंजाब आणि खैबर-पख्तूनख्वामधील अनेक शहरांमध्ये गॅस अजिबात उपलब्ध नाही. पाकिस्तानातील कराची, लाहोर, हैदराबाद, मुलतान, पेशावर आणि रावळपिंडी या प्रमुख शहरांमध्ये दररोज अनेक तास गॅस पुरवठा खंडित होत आहे.  दैनंदीन व्यवहारात लागणा-या वस्तूंचा जिथे पुरवठा व्यवस्थि नाही तिथे पाकिस्तानमधील रेल्वे सेवाही कोलमडल्यात जमा आहे.  त्यात पाकिस्तानचा ज्याच्यावर जास्त भरवसा आहे, त्या चीननंही पाकिस्तानला चांगलच फसवलं आहे.  

======

हे देखील वाचा : NPS खातेधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास पैसे काढण्यासाठी ‘ही’ प्रोसेस फॉलो करा

======

रेल्वे व्यवस्था रुळावर आणण्यासाठी पाकिस्तान सरकारने चीनकडून रेल्वेच्या बोगी मागवल्या होत्या. त्यांची किंमत 149 दशलक्ष डॉलर्स होती.  हा सर्व पैसाही वाया गेल्याचे बोलले जाते. पाकिस्तान दिवसेंदिवस श्रीलंकेच्या वाटेवर जात आहे. अर्थात आपला देश दिवाळखोरीच्या वाटेवर असतांना पाकिस्तानचे सरकार सुस्त आहे.  फारतर भारतावर आरोप करण्यापलिकडे त्यांच्याकडून काहीच भूमिका घेतली जात नाही.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.