1991 मध्ये बॉलिवूडला एक नवीन अभिनेत्री मिळाली. पत्थर के फूल या चित्रपटामधून रवीना टंडन नावाची अभिनेत्री बॉलिवूडमध्ये दाखल झाली. आता बरोबर 32 वर्षांनी याच रवीना टंडनची मुलगी बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. रवीनाची मुलगी, राशा हिनं अलिकडेच 18 वा वाढदिवस साजरा केला. याच दिवशी राशानं आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात केली आहे. राशासोबत अजून एक नवीन अभिनेता बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. त्याचे नाव अमन असून अमन अजय देवगणचा भाचा आहे. या दोन स्टारकिडच्या चित्रपटाचे शुटींग सध्या सुरु झाले असून, हा चित्रपट मोठ्या पडद्यावर कधी येईल याची उत्सुकता आहे.
अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा बॉलिवूडमध्ये डेब्यु करीत आहे. राशाच्या 18 वाढदिवसाची पार्टी नुकतीच मध्यप्रदेश येथील भोपाळमध्ये साजरी झाली. याच दिवशी राशाच्या पहिल्या चित्रपटाचेही शुटींग सुरु झाले आहे. राशा आणि अजय देवगण याचा भाचा, अमन ज्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहेत, त्याचे नाव आझाद आहे. या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक अभिषेक कपूर आहेत. राशा आणि अमनसाठी एक सरप्राईज पार्टी ठेवण्यात आली होती. त्यात बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित होते. गेल्या काही महिन्यापासून आझाद या चित्रपटात राशा अभिनय करणार अशीच चर्चा होती. पण त्याबाबत रवीनानं बोलण्यास नकार दिला होता. मात्र राशाच्या वाढदिवसाच्या पार्टीत हे रहस्य उघड करण्यात आलं. आझाद चित्रपटाचं शुटींग सुरु झालं असून त्याचा मुहूर्त सीन मान्यवरांच्या उपस्थितीत शूट करण्यात आला.
या सिक्रेट पार्टीत चित्रपट सृष्टीशी संबंधित आणि रवीना हिचे पती अनिल थडानी यांच्या व्यवसायाशी संबंधित अनेक लोक उपस्थित होते. रवीना टंडन, तिचा पती अनिल थडानी, कुटुंबातील सदस्य, निर्माता-दिग्दर्शक अभिषेक कपूरची पत्नी आणि निर्माती प्रज्ञा कपूर यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत राशा आणि अमनच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. निर्माते अभिषेक कपूर अनेक दिवसांपासून या प्रोजेक्टवर काम करत आहेत. यासाठी अभिनेता कोण असेल याचीही उत्सुकता होती. मात्र अजय देवगण आणि काजोल यांचा भाचा अमन देवगण याची चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून वर्णी लागली. या भूमिकेसाठी शहारुख आणि सैफ अली या दोघांच्याही मुलांचीही चर्चा होत होती. मात्र आपल्या लेकीसाठी रवीनानं अमन देवगणच्या नावाला अधिक पसंती दिली. त्यामागे मुख्य कारण म्हणजे अजय आणि रवीना ही एकेकाळची लोकप्रिय जोडी होती. या दोघांचाही पहिला चित्रपट म्हणजे पत्थर के फुल. त्यानंतर दिलवाले, एक ही रास्ता, गैर सारखे हिट चित्रपट या जोडीनं दिले. त्यामुळे राशासाठी अमन देवगणला रवीनाची अधिक पसंती होती. या चित्रपटात राशा आणि अमनसोबत अजय देवगणही कॅमिओ करताना दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शुटींग मध्यप्रदेशमध्ये सुरु आहे. भोपाळ आणि आसपासच्या लोकेशन्सवर या चित्रपटाचे शुटिंग सुमारे 20 दिवस चालणार आहे.
=========
हे देखील वाचा : गुलशन कुमार यांच्या ‘हनुमान चालीसा’ने YouTube वर केला नवा रेकार्ड; व्यूजमध्ये व्हिडिओ ठरला भारतात अव्वल!
=========
गेल्या काही वर्षापासून राशा ही अभिनयाचे धडे गिरवत आहे. राशानं अनेक मान्यवरांकडे अभिनयाचे धडे घेतले असून परदेशातही तंत्रज्ञानासंदर्भात अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आपल्या आईसारखी यशस्वी अभिनेत्री होण्यासाठी राशा प्रयत्नशील आहे. रवीनाच्या मागे तिचे वडील दिग्दर्शक रवी टंडन यांचा पाठिंबा होता. तसाच पाठिंबा राशाला रवीनानं दिला आहे. रवीनानं आपल्या पहिल्याच चित्रपटातून फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता. यासोबत रविनाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2023 मध्ये तिचा पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दिलवाले, मोहरा, खिलाडियों का खिलाडी, जिद्दी, गुलाम-ए-मुस्तफा, शूल, दमन सारख्या चित्रपटांमधून रवीनानं आपली छाप चित्रपटसृष्टीवर ठेवली आहे. आता याच रवीनाची राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.
सई बने