आयपीएल आणि त्याच्या जेतेपदाचा मान मिळवण्यासाठी विविध संघांमध्ये रंगणारा दोन महिन्याचा थरार भारतीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आनंदाची पर्वनीच ठरतो. कोण जिंकलं ? कोण हारलं ? या राड्यात दरवर्षी एखाद्या संघाचा एखादा फलंदाज आपल्या तुफान फलंदाजीने राडा घालत असतो. टीम कुठलीही असो. या पठ्ठ्याने गोलंदाजांना धुतलेच म्हणून समजा. एखाद्या वेळेला अशा भिडूच्या तुफान कामगिरीमुळे ती संबंधित टीम जेतेपदाला गवसणी घालते तर बऱ्याचदा तो एकटाच गडी खिंड लढवत असल्यामुळे टिमला ट्रॉफी काय जिंकता येत नाही. अशावेळी या पठ्ठ्याने केलेली कामगिरी बऱ्याचदा झाकोळून जायची शक्यता निर्माण होते. हीच शक्यता टाळण्यासाठी आणि त्या त्या फलंदाजांच्या वैयक्तिक कामगिरीला योग्य ते प्रोत्साहन देण्यासाठी आयपीएल आयोजक मंडळाकडून दरवर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅपचा (Orange cap) सन्मान देवून गौरविण्यात येते. ज्याचे रन्स जास्त त्याच्या डोक्यावर ही ऑरेंज कॅप (Orange cap) जाऊन स्थिरावते. आयपीएल खेळणाऱ्या प्रत्येक टीमच जसं आयपीएलची ट्रॉफी पटकावण्याचं स्वप्नं असत, त्याचप्रमाणे प्रत्येक फलंदाजदेखील ऑरेंज कॅपला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत असतो. आतापर्यंत ऑरेंज कॅप (Orange cap)आपल्या डोक्यावर विसावून घेण्याचं कुणाकुणाचं स्वप्न पूर्ण झालं आहे ते बघुयात.
शॉन मार्श ( २००८ )
२००८ साली पार पडलेल्या पहिल्यावहिल्या आयपीएलमधील पहिल्या ऑरेंज कॅपचा (Orange cap) मान शॉन मार्शने मिळवला. किंग्स इलेव्हन पंजाब कडून खेळतांना शॉन मार्शने पाच अर्धशतके आणि एका शतकासह ६१६ धावांचा डोंगर रचला होता. यादरम्यान १३९.६८ च्या स्ट्राईक रेटने खेळतांना ६८.४४ ची सरासरी त्याने राखली होती.
मॅथ्यू हेडन ( २००९ )
आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतांना ५२ च्या सरासरीने मॅथ्यू हेडनने ५७२ धावा ठोकल्या होत्या. यादरम्यान त्याने पाच अर्धशतके ठोकत आपली बॅट उंचावली होती. मात्र त्याच्या या भन्नाट कामगिरीचा फायदा त्याच्या चेन्नई सुपर किंग्सला तेवढासा फायदा उचलता आला नाही.
सचिन तेंडूलकर ( २०१० )
आयपीएलचा तिसरा हंगाम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपल्या फलंदाजीने गाजवला. त्याच्या फलंदाजीच्या बळावर त्याची टीम, मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. संपूर्ण हंगामात फटकेबाजी करत सचिनने ४७.५३ च्या सरासरीने ६१८ धावांचा डोंगर उभा केला होता.(Orange cap)
ख्रिस गेल ( २०११, २०१२ )
२०११ हे साल बंगळूरूच्या ख्रिस गेलसाठी फायद्याचं ठरलं. या हंगामात गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेत ६७.५५ च्या सरासरीने त्याने ६०८ धावा चोपल्या. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर बंगळूरूने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. अंतिम सामन्यात त्यांना चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. संघांच्या या उत्तम प्रदर्शनात ख्रिस गेलने मोलाची भूमिका बजावली होती.
२०१२ च्या आयपीएल हंगामात आपला दबदबा कायम राखत सलग दुसऱ्यांदा ख्रिस गेलने ऑरेंज कॅपचा (Orange cap) मान पटकावला. बंगळूरूकडून खेळतांना गेलने ६१.०८ च्या सरासरीने ७३३ धावा ठोकल्या. यामध्ये त्याने सात अर्धशतके आणि एक शतक झळकावले. त्याच्या या कामगिरीचा त्याच्या संघाला जास्त फायदा घेता आला नाही.

मायकल हसी ( २०१३ )
चेन्नई सुपर किंग्स कडून खेळतांना ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू मायकल हसीने ऑरेंज कॅप (Orange cap)आपल्याकडे खेचून आणली. ५२.३५ च्या सरासरीने ६ अर्धशतकांसह त्याने ७३३ धावा ठोकल्या. त्याच्या या कामगिरीच्या बळावर चेन्नईने आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती.
रॉबिन उथप्पा ( २०१४ )
कोलकता नाईट रायडर्सकडून खेळतांना सलामीवीर रॉबिन उथप्पाने ६६० धावा ठोकत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली होती. ४४ च्या सरासरीने धावा करतांना त्याने ५ अर्धशतके ठोकली होती. त्याच्या कामगिरीच्या बळावर कोलकताने त्या वर्षी जेतेपदाला गवसणी घातली.
डेव्हिड वार्नर ( २०१५ , २०१७ , २०१९ )
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप आपल्या नावे करणाऱ्या डेव्हिड वार्नरने २०१५ च्या हंगामात पहिल्यांदा ऑरेंज कॅप(Orange cap) पटकावली. ४३.२३ च्या सरासरीने ७ अर्धशतकासह ५६२ धावा ठोकल्या. त्याचबरोबर त्याने २०१७ आणि २०१९ च्या हंगामात फटकेबाजी करत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली.
विराट कोहली ( २०१६ )
२०१६ चा आयपीएल हंगाम विराट कोहलीने गाजवला. या हंगामात त्याने ८१.०८ च्या सरासरीने तब्बल ९७३ धावा ठोकल्या. आयपीएलच्या एका हंगामात एखाद्या फलंदाजाने ठोकलेल्या या सर्वाधिक धावा होत्या. एका हंगामातील सर्वाधिक धावांचा विक्रम अजूनही विराट कोहलीच्याच नावावर आहे. या हंगामात त्याने तब्बल ४ शतके आणि ७ अर्धशतके ठोकली होती. त्याच्याच कामगिरीच्या बळावर बंगळूरूने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. अंतिम सामन्यात त्यांना हैद्राबादकडून पराभवाचा सामना करावा लागला.
केन विलियमसन ( २०१८ )
सनरायझर्स हैद्राबादकडून खेळतांना केन विलियमसनने ५२.५ च्या सरासरीने ८ अर्धशतकांसह ७३५ धावा ठोकत ऑरेज कॅप आपल्या नावे केली होती. धीम्यागतीने खेळणारा फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केनचे स्ट्राईक रेट १४२ च्या वर होते हे विशेष.
=======
हे देखील वाचा : आतापर्यंत ‘या’ संघांनी आयपीएल जेतेपद पटकावले…
=======
के एल राहुल ( २०२० )
२०२० साली पंजाबकडून खेळतांना के एल राहुलने ५५.८३ च्या सरासरीने ६७० धावा ठोकत ऑरेंज कॅप (Orange cap) आपल्याकडे खेचून आणली. यात पाच अर्धशतकांसह एका शतकाचा समावेश होता.
ऋतुराज गायकवाड ( २०२१ )
चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या युवा ऋतुराज गायकवाडने या हंगामात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चेन्नईकडून सलामीवीर म्हणून भूमिका बजावतांना त्याने चार अर्धशतके आणि एका शतकासह ६३५ धावा ठोकल्या.
जॉस बट्लर ( २०२२ )
२०२२ च्या हंगामात राजस्थान रॉयल्स कडून खेळतांना इंग्लिश फलंदाज जॉस बट्लरने चार शतके आणि चार अर्धशतकासह ८६३ धावा ठोकल्या. एका हंगामात सर्वाधिक वैयक्तिक धावा ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये कोहलीनंतर जॉस बट्लरचा नंबर लागतो.