Home » Ramdas Boat : …आणि त्या ७५० लोकांना घेऊन ‘रामदास’ बुडाली!

Ramdas Boat : …आणि त्या ७५० लोकांना घेऊन ‘रामदास’ बुडाली!

by Team Gajawaja
0 comment
Ramdas Boat
Share

सन १९४७! तारीख, १७ जुलै भारत अजून स्वतंत्र झाला नव्हता. दीप अमावास्येचा दिवस होता आणि मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावर प्रचंड गर्दी होती. श्रावण सुरु होणार होता त्यामुळे हजारो चाकरमानी मंडळी बोटीने गावी जाण्यासाठी उत्सुक होती. पण आषाढाच्या तुफान पावसाने मागचे दोन दिवस अक्षरशः थैमान घातलं होतं. त्यामुळे एकंदरीत प्रवास कसा होणार होता याबद्दल लोकांच्या मनात शंकाच होती. पण गावी जाण्याचा उत्साहसुद्धा होता! आणि या गर्दीच्या मधोमध दिमाखात उभी होती ‘रामदास बोट’! भलीमोठ्ठी, रुबाबदार!

अरबी समुद्रात मुंबई ते गोवा दरम्यान पूर्वीपासून जलप्रवासी बोटीचीं वाहतूक सुरू होती. या बोटी रेवस, जयगड, रत्नागिरी, मालवणमार्गे गोव्याला जात असत. पण या विशिष्ट काळात, रेवस आणि आसपासच्या परिसराच्या फे-यांसाठी तैनात होती. रामदास बोट साडेआठशे प्रवाशांना घेऊन रेवसच्या दिशेने निघाली खरी पण पुढे जाऊन या बोटीचा इतका भीषण अपघात झाला की अनेकांना त्यात प्राण गमवावे लागले. पण नेमकं असं काय घडलं होतं त्या दिवशी जाणून घेऊ. (Ramdas Boat)

आता सागरी अपघात म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ती टायटॅनिक! आता टायटॅनिक हे त्या काळातील सर्वात मोठ जहाज होत आणि हिमनगाला आदळल्यामुळे त्याचा अपघात होऊन ते समुद्रात बुडालं हे सगळ्यांनाच माहितेय. यावर एक मूवी पण येऊन गेला. पण असाच एक भीषण अपघात स्वातंत्र्यपूर्व काळात ‘रामदास’ बोटीसोबत घडला होता. ही बोट बनली होती स्कॉटलंडमध्ये १९३६ साली. (Top Stories)

दुसऱ्या महायुद्धात सरकारने ती ताब्यात घेतली आणि १९४२ नंतर ती पुन्हा सामान्य जनतेच्या सेवेत आली. या बोटीची लांबी १८० फूट रुंदी २९ फूट वजन ४०६ टन आणि ती १०५० प्रवासी, १० हॉटेल कर्मचारी आणि ४२ खलाशी घेऊन प्रवास करू शकत होती. त्या दिवशी म्हणजे १७ जुलै च्या दिवशी या बोटीचे कॅप्टन होते शेख सुलेमान, तर चीफ ऑफिसर आदमभाई. बोटीची तपासणी झाली, अधिकाऱ्यांनी निघायची परवानगी दिली होती. साधारण सकाळी साडेआठ वाजता, रामदास बोटीचा प्रवास सुरु झाला आणि हीच सुरुवात होती एका धोकादायक प्रवासाची! कारण हवामान खात्याचा अंदाज साफ चुकला होता. (Ramdas Boat)

Ramdas Boat

बोट समुद्रात पोहोचत असतानाच आकाश ढगांनी भरून आलं, वादळी वारे, जोरदार पावसाने बोटीचा वेग कमी केला आणि लाटा उंचावू लागल्या. काही प्रवासी चिंतेत, काही अजूनही गप्पांमध्ये रमलेले… खरंतर अलिबाग, मुरुडकडे जाणारी मंडळी या बोट सेवेचा नेहमीच लाभ घेत असत. त्यांना प्रवासासाठी हा पर्याय खूपच सोयीचा होता. पण तो दिवस मात्र काळरात्र ठरणार, हे बोटीत असलेल्या त्या ७५० लोकांना माहित नव्हतं.

पण कॅप्टन शेख सुलेमान यांना हा बदल लक्षात आला होता. या तडाख्यातून सुटणं फारच कठीण जाणार होतं. यातच बोटीने मुंबईपासून ८.१० मैल अंतर पार केलं होतं पण पुढे काय वाढून ठेवलंय, याची कुणालाही कल्पना नव्हती. रेवस अजूनही दूरच होतं. प्रवास खडतर होणार असल्याची जाणीव झालेली होती. मोठमोठ्या लाटा उसळत होत्या, त्यावर रामदास हेलकावे खात होती. जागेवर बसून असणारे प्रवासी, सीट घट्ट पकडून ठेऊन जागेवर स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांनी समुद्राचं हे असं रौद्ररूप पाहिलं नव्हतं. ज्यांनी पाहिलं होतं, ते इतरांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. सुखाचा आणि आनंदाचा प्रवास आता भयावह ठरू लागला होता. त्यातच बोटीसमोर तेलाचं मोठं पिंप वाहत आलं. ते टाळण्यासाठी कॅप्टनने बोटीची दिशा बदलली… पण याच बदलाने बोट एकाच बाजूला कलली…त्यात भर पडली वादळी लाटांची…प्रवासी घाबरले, ओरडले, आणि सगळे दुसऱ्या बाजूला धावले पण सुरक्षेसाठी प्रवाशांनी अनावधानाने केलेली ही कृती धोकादायक ठरली कारण संपूर्ण वजन एका बाजूला गेलं आणि रामदास बोट उलटली…सगळीकडे एकच कोलाहल.. बोटीत पाणी शिरू लागलं. काही जण समुद्रात फेकले गेले. ज्यांना पोहता येत होतं त्यांनी स्वतःहून पाण्यात उड्या टाकण्याचा निर्णय घेतता, कोणी मदतीसाठी हाका मारत होतं, तर काहींनी लाईफ जॅकेटचा शोध सुरु केला. खवळलेला समुद्र मात्र सगळ्याशी तितक्याच निर्दयपणे वागत होता. (Ramdas Boat)

कांहींनी स्वत:ला पोहता येतं म्हणून मिळालेले लाईफ जॅकेट्स, बेल्ट्स इतरांना देऊ केले. मात्र पोहू शकणारी व्यक्ती प्राण वाचवू शकत नव्हती. काळ समोर आवासून उभा ठाकलेला असतानासुद्धा अनेकांनी माणुसकीचं दर्शन दाखवल्याचं या घटनेविषयी केलेल्या वर्णनांमध्ये पाहायला मिळत. काही वेळात वादळ थांबलं, सकाळ उजाडली, रेवसचे मासेमार मासेमारीसाठी निघाले…पण समुद्रात काही वेगळंच दिसत होतं, काही जण पोहत होते, काही मृतदेह तरंगत होते तर काही मृतदेह किनाऱ्याला लागले होते. हातावर पॉट असलेल्या या मासेमारांनी क्षणाचाही विचार न करता, आपली हजारो रुपयांची मासळी पाण्यात फेकून दिली…७५ हून अधिक लोकांचे प्राण वाचवले…त्यांच्या नावाने आजही त्या भागात लोक कृतज्ञतेने बोलतात. पण रामदास बोट, ती पूर्णपणे समुद्रात बुडाली…आणि आजही तिचं ठिकाण अचूक कुठे आहे, हे कुणालाच माहीत नाही.  (Top Stories)

==================

हे देखील वाचा : India Partition : गांधी, जिना, नेहरू, सावरकर फाळणी कोणामुळे झाली ?

==================

या भीषण सागरी अपघात दुर्घटनेत तब्बल ६२५ जणांचा बुडून मृत्यू झाला. मात्र काहींचं दैव बलवत्तर होतं. नियती त्यांच्या मदतीला धावली होती. हरी मढवी आणि त्यांचा एक मित्र असे दोघे रेवस बंदराकडे पोहत निघाले होते त्यात पट्टीचे पोहणारे मढवी जीव वाचवण्यात यशस्वी ठरले, पोहत पोहत त्यांनी रेवस गाठलं, पण त्यांचा मित्र मात्र त्यातून वाचू शकला नाही. बोटीचे कप्तान शेख आणि आदमभाई सुद्धा या अपघातात बचावले. रामदास बुडाल्याची माहिती मुंबईला सुद्धा कळवण्यात आली. तिथेही शक्य तेवढ्या प्रमाणात बचावकार्य झालं. काहींचे जीव वाचवण्यात यश आलं. काहीजण पोहत पोहत ससून डॉकला पोचले. याबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे एक तरुण, जो त्या दिवशी ‘रामदास’ने प्रवास करणार होता, त्याच्या घरी एक बाई आली आणि ‘आवस वाढा आवस’ असं म्हणाली…त्याने तेच निमित्त करत प्रवास टाळला…आणि तो वाचला! यादरम्यान अंधश्रद्धा वाढल्या आणि अनेकांनी अमावास्येच्या प्रवासांना कायमचा रामराम ठोकला! (Ramdas Boat)

रामदास बोट दुर्घटनेपूर्वीही कोकण किनारपट्टीवर दोन मोठे बोट अपघात झाले होते. १९२७ साली जयंती आणि तुकाराम नावाच्या दोन बोटी एकाच दिवशी बुडाल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या दोन बोटींच्या दुर्घटनांत १४३ जणांचा मृत्यू झाला होता. जयंती बोटीवरील सर्व ९६ जणांचा तर तुकाराम बोटीवरील ४७ जणांचा मृत्यू झाला होता.पण रामदास बोट दुर्घटना भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी बोट दुर्घटना होती. यावेळी अलिबाग, रेवस, मांडवा, वरसोली, उरण, सासवणे, करंजा, किहीम आशा भागात अनेक मृतदेह वाहून किनाऱ्याला लागले होते. यावरून भुताखेतांच्या अनेक गोष्टी रचल्या गेल्या. अनेक नव्या अंधश्रद्धा जन्माला आल्या. एका बाजूला माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या या अपघाताच्या बाबतीत असंही सांगितलं जातं, की किनाऱ्याला लागलेल्या मृतदेहांवरील दागिने लूबाडून नेण्याच्या घटनासुद्धा घडल्या. एकंदरीतच, हा सागरी अपघात फारच भीषण आणि भयावह ठरता होता. इतका की समुद्राकडे पाहिल्यावर आजही अनेकांचं काळीज दडपून जातं कारण या अपघातात अनेक आयुष्य आणि स्वप्न कायमची संपली होती! रामदास सोबतच चाकरमान्यांची वाट पाहणारे अनेक डोळे त्यादिवशी शोकसागरात बुडाले होते.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.