भारत आणि इस्रायलची मैत्री जगजाहीर आहे. या मैत्रीचे बंधन अधिक घट्ट करणारी बातमी नुकतीच आली आहे. पहिल्या महायुद्धामध्ये ओटोमन साम्राज्याला पराभूत करणा-या भारतीय जवानांना इस्रायलनं मानाची वंदना दिली आहे. 107 वर्षे झालेल्या या पहिल्या महायुद्धात ओटोमन साम्राज्य हे शक्तीशाली होते. याच साम्राज्याविरुद्ध भारतीय सैनिक हैफामध्ये लढले होते. हैफामध्ये तुर्की ओटोमन साम्राज्याचा पराभव भारतीय सैनिकांनी केला. मात्र तेव्हा भारतात ब्रिटिश राजवट होती. त्यामुळे या विजयाचे श्रेय ब्रिटनने घेतले. मात्र आता इस्रायलनं भारतीय सैन्याची ही पराक्रमाची गाथा अवघ्या जगाला सांगून यात ब्रिटीश सरकार नाही, तर भारतीय सैन्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे. भारतीय सैन्याचा हा पराक्रम आता इस्रायलच्या शालेय पुस्तकांमधूनही सांगण्यात येणार आहे. (India and Israel)
पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतात ब्रिटीश राजवट होती. या युद्धात ब्रिटीशांनी भारतीय सैनिकांचा वापर करुन घेतला. यात ऑटोमन राजवटीविरोधात जे युद्ध झालं, त्यातही भारतीय सैनिक होते. या सैनिकांनी युद्धात भीम पराक्रम केला. मात्र त्यांचे हे सर्व शौर्य ब्रिटीश सरकारनं आपल्या नावावर जमा केले. आता 107 वर्षानंतर या सैनिकांची शौर्याची गाथा सांगण्यात येत आहे. पहिल्या महायुद्धात ऑट्टोमन राजवटीपासून शहर मुक्त करण्यासाठी लढणा-या भारतीय सैनिकांना मानवंदना देण्याचा निर्णय इस्रायली हैफा शहराने घेतला आहे. हैफा हे राजधानी तेल अवीवपासून 90 किलोमीटर अंतरावर असलेले इस्रायली बंदर शहर आहे. या शहराच्या महापौर योना याहव यांनी भारतीय सैनिकांचे योगदान शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केले जाईल, असे सांगितले आहे. (International News)
योना याहव यांनी सांगितले की, आम्हाला नेहमीच सांगितले जात असे की, हे शहर ब्रिटिशांनी मुक्त केले. परंतु या शहराच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर हे स्पष्ट झाले आहे की, हे शहर मुक्त करणारे ब्रिटिश नव्हते तर भारतीय होते. याच सैनिकांच्या शौर्याची गाथा आता पाठ्यपुस्तकात येणार आहे. हैफामध्ये लढलेले मेजर दलपत सिंग यांना हैफाचा हिरो म्हणून आजही मान दिला जातो. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहे. या युद्धात भारतीय घोडदळाने हैफा हे तटबंदी असलेले शहर ताब्यात घेत मोठा पराक्रम केला. यामुळेच हैफा शहर ब्रिटिश आणि मित्र राष्ट्रांच्या नियंत्रणाखाली आले. त्यातून पहिल्या महायुद्धाचे चित्र बदलले. अंगावर तोफेचे गोळे सहन करत भारतीय सैनिकांनी मिळवलेल्या या विजयाची कथा ऐकली तरी आजही अंगावर काटा उभा रहातो. भारतीय सैन्याच्या 15 व्या शाही घोडदळ ब्रिगेडच्या सैनिकांनी 23 सप्टेंबर 1918 रोजी हैफा शहरावर आपला झेंडा लावला. या शाही घोडदळ तुकडीमध्ये म्हैसूर, हैदराबाद आणि जोधपूर या संस्थानांमधून आलेल्या सैनिकांचा समावेश होता. (India and Israel)
विशेष म्हणजे भारतीय घोडदळ रेजिमेंटने, हाती तलवार घेत तोफखान्याने सज्ज असलेल्या ओटोमन सैन्यावर हल्ला केला. तलवारी आणि भाल्यांनी सज्ज असलेल्या भारतीय घोडदळ रेजिमेंटने माउंट कार्मेलच्या ओटोमन सैन्याला हाकलून लावले आणि शहर मुक्त केले. युद्ध इतिहासकार या घटनेचे इतिहासातील शेवटचे मोठे घोडदळ ऑपरेशन असे वर्णन करतात. भारतीय सैनिकांच्या या विजयामुळे ओटोमन साम्राज्य कमकुवत झाले आणि त्याचा पराभव झाला. पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याच्या सोबतीनं 74000 हून अधिक भारतीय सैन्य लढले. यातील बहुतांश सैनिकांनी आपले प्राण गमावले. (International News)
=======
हे देखील वाचा : Afghanistan : तालिबानचे डिजिटल लॉकडाऊन !
=======
सुमारे 4000 हून अधिक भारतीय सैनिक तेव्हा पश्चिम आशियात मरण पावले. यापैकी अनेकांच्या कबरी हैफा, जेरुसलेम आणि रामले या इस्रायली युद्ध स्मशानभूमीत आजही जतन केलेल्या आहेत. ब्रिटीशांनी जरी या सैनिकांच्या पराक्रमाचा गौरव केला नसला तरी इस्रायलनं भारतीय सैनिकांचे हे योगदान कायम स्मरणात ठेवले आहे. तिथे दरवर्षी, या सैनिकांच्या सन्मानार्थ समारंभ आयोजित केला जातो. दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी म्हैसूर, हैदराबाद आणि जोधपूर लान्सर्स रेजिमेंटला श्रद्धांजली वाहण्यासाठी हैफा दिन साजरा होतो. यावर्षी झालेल्या या हैफा दिनी भारतीय सैन्यांची शौर्यगाथा तेथील पाठ्यपुस्तकात समाविष्ठ करण्यात आली आहे. (India and Israel)
सई बने….
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics