1976 साल, देशात आणीबाणी काळ आहे. विरोधी पक्ष नेते तुरुंगात आहेत, आणि मीडियावर सेंसरशिपचा कडक पहारा आहे. अशा वेळी राजस्थानातल्या जयगढ़ किल्ल्यात एक मोठी शोध मोहीम सुरू आहे. तब्बल पाच महिने भारतीय सेना, आयकर विभाग आणि इतर सरकारी पथकं किल्ल्याच्या आत खणकाम करत काहीतरी शोधता आहेत. ते शोधता आहेत एक रहस्यमयी खजिना ते शोधण्याचा आदेश दिला होता पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी. पुढे हा खजिना सापडला की नाही याचं रहस्य उलगडूयाचं, पण हा खजिना सापडायच्या आधीच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिलं आणि त्या खजिन्यात हिस्सा मागितला! हा खजिना शापित होता म्हणून त्याच्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या, या खजिन्याची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊ. (Indira Gandhi)
जयगढ़ किल्ला, राजस्थानातल्या जयपुरजवळ, अरावली डोंगरावर उभा आहे. हा किल्ला म्हणजे राजस्थानच्या रजवाडी इतिहासाची एक भव्य साक्ष! 1726 साली सवाई जय सिंह दुसऱ्यानं बांधलेला हा किल्ला लाल वाळूच्या दगडांनी बनलाय, आणि त्यातली भक्कम भिंती, सुंदर मंदिरं आणि जगातला सगळ्यात मोठा तोफ, ‘जयवाण’, यामुळे हा किल्ला खास आहे. पण हा किल्ला फक्त त्याच्या बांधकामासाठीच नाही, तर त्यात लपलेल्या खजिन्याच्या गोष्टीसाठीही प्रसिद्ध आहे.(Top Stories)
ही गोष्ट आहे 16 व्या शतकातली, मुघल बादशहा अकबरानं आपला सेनापती राजा मान सिंह याला अफगानिस्तान जिंकायला पाठवलं. मान सिंह याने तिथं जाऊन मोठा विजय मिळवला आणि प्रचंड खजिना घेऊन तो परतला. पण हा खजिना त्याने अकबराला देण्याऐवजी, जयगढ़ किल्ल्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये लपवून ठेवला. ही गोष्ट अनेक वर्षं फक्त दंतकथा म्हणून लोकांमध्ये पसरत होती. पण 1976 साली, जेव्हा आणीबाणी लागू झाली, तेव्हा इंदिरा गांधींनी या खजिन्याचा शोध घ्यायचं ठरवलं.
आणीबाणीच्या काळात, भारतीय सेनेच्या तुकड्या, आयकर विभाग, आणि इतर सरकारी पथकं किल्ल्यात दाखल झाली. त्यांनी किल्ल्याच्या प्रत्येक कोपऱ्याची झडती घेतली गेली. पाच महिने ही शोध मोहीम सुरू राहिली. ही शोध मोहीम सुरू असताना किल्ल्यावर हेलिकॉप्टर्स घिरट्या घालायचे, आणि जयपुर-दिल्ली हायवेचा काही भाग कित्येक दिवस बंद ठेवण्यात आला होता. तेव्हा लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली, की किल्ल्यात नक्कीच काहीतरी मोठं सापडलंय.
पण सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, या शोध मोहिमे दरम्यान, पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी इंदिराजींना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी थेट जयगढ़च्या खजिन्यात 50% हिस्सा मागितला! त्यांचं म्हणणं होतं, की ब्रिटिश काळातल्या काही करारांनुसार, हा खजिना भारत-पाकिस्तानात विभागला जायला हवा. हे पत्र कसं तरी लीक झालं आणि सगळीकडे खळबळ उडाली. इंदिराजींनी भुट्टो यांना उत्तर देताना सांगितलं, की किल्ल्यात काहीच सापडलं नाही, फक्त 230 किलो चांदी सापडली आहे. पण खरंच फक्त एवढंच सापडलं होतं का? (Indira Gandhi)
इथंच गोष्ट आणखी रंजक होते. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल की, त्या शोधमोहिमे दरम्यान, जयपुर-दिल्ली हायवेवर फक्त लष्करी ट्रकच दिसत होते. काहींनी तर असंही म्हटलं, की 50-60 ट्रक दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले होते. आणि दिल्ली विमानतळावर दोन विमानं तयार ठेवण्यात आली होती, जी नंतर कुठंतरी उडून गेली. पण या ट्रकांमध्ये आणि विमानांमध्ये नेमकं काय होतं? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
=================
हे देखील वाचा : Mary Celeste : भूतीया जहाज जे समुद्रात भटकत होतं आणि…
=================
इंदिराजींनी शेवटी सांगितलं, की किल्ल्यात फक्त 230 किलो चांदी सापडली. पण ही गोष्ट अनेकांना पटली नाही. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात शोध काम सुरू होतं, लष्कराची तैनात, हायवे बंद, आणि हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या फक्त चांदीसाठी? काहीतरी मोठं दडवलं गेलंय, असं अनेकांचं मत होतं. काहींनी तर असंही म्हटलं, इथे एक शापित खजिना सुद्धा होता. त्या मागची कथा अशी की, मान सिंह पहिला याने बंगालला भेट देताना तो जेस्सोरेश्वरी कालीच्या मंदिरात गेला होता, तेव्हा त्याने मंदिरातील पुजारी आणि देवीला आमेरला आणलं होतं. एका कथेनुसार जो कोणी हा खजिना लुटेल, त्याला शाप लागेल आणि त्याचा मृत्यू होईल. त्यामुळे काही लोक इंदिरा आणि संजय गांधी यांच्या मृत्यूचं कारणही या श्रापाशी जोडतात. (Indira Gandhi)
पण खरं सत्य काय? जयगढ़चा हा खजिना खरंच सापडला का? आणि सापडला तर तो गेला कुठं? काही आरटीआयद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला, पण त्यातून काहीच हाती लागलं नाही. आजही जयगढ़चा हा खजिन्याचं रहस्य अनुत्तरित आहे. काहींच्या मते, हा खजिना दिल्लीला नेला गेला होता, तर काहींच्या मते, तो अजूनही किल्ल्याच्या कुठल्यातरी गुप्त खोलीत लपलाय.
काही लोकांना वाटतं, की आणीबाणीच्या काळात इंदिराजींनी हा खजिना आपल्या ताब्यात घेतला, आणि त्याच पैशांनी कॉंग्रेसला पुढच्या काळात आर्थिक बळ मिळालं. पण हे सगळं फक्त अंदाज आहेत, याबद्दल ठोस पुरावे काहीच नाहीत. जयगढ़च्या या खजिन्याची गोष्ट आजही लोकांच्या मनात कुतूहल जागवते. तुम्हाला काय वाटतं? हा खजिना खरंच होता का? आणि जर होता, तर तो आता आहे कुठे? तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics