मराठीत नेहमीच नवनवीन विषयांवर आधारीत चित्रपटांची निर्मिती केली जाते. आशयघन कथानकाला कसदार अभिनयाची जोड देत दर्जेदार निर्मिती करणं हे जणू आज मराठी सिनेमांचं समीकरणच बनलं आहे. याच समीकरणाला साजेसा असलेला आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘तराफा’ असं टायटल असलेल्या या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. हा चित्रपट ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
निर्माते अविनाश कुडचे (काका) यांनी भूमि प्रोडक्शन या बॅनरखाली ‘तराफा’ची निर्मिती केली असून, सुबोध पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एखाद्या सुरेख चित्राप्रमाणं भासावं असं ‘तराफा’चं लक्ष वेधून घेणारं मनमोहक पहिलं पोस्टर रसिकांच्या भेटीला आलं आहे. निसर्गरम्य वातावरणात तराफावर उभी असलेली तरुण आणि तरुणीची रोमँटिक जोडी पोस्टरवर पहायला मिळते.
====
हे देखील वाचा: “झॉलीवूड” चित्रपटातून झाडीपट्टीची ३ जूनपासून मोठ्या पडद्यावर धमाल
====
मावळतीला जाणारा सूर्य आणि आपल्या घरट्याकडे परतणाऱ्या पाखरांच्या थव्यांच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर शूट करण्यात आलं आहे. यात एक प्रेमकहाणी पहायला मिळणार असल्याचे संकेत या पोस्टरवरून मिळतात. चित्रपटाचं टायटल तराफा असं का ठेवण्यात आलंय? याचं उत्तर पोस्टरमध्ये नसलं तरी चित्रपटात नक्कीच मिळणार आहे.
प्रेमकथेच्या अनुषंगानं इतरही काही विषयांना या चित्रपटात स्पर्श करण्यात येणार असल्याचा अंदाजही शीर्षकावरून येतो. सुबोध पवार यांनी या चित्रपटाचं अतिशय अभ्यासपूर्ण दिग्दर्शन केलं असल्यानं काहीशी नावीन्यपूर्ण गोष्ट ‘तराफा’मध्ये पहायला मिळणार आहे. बांबूचा तराफा जरी पाण्यावर तरंगत असला तरी त्यावर मधोमध तोल सावरणं गरजेचं असतं.
मैत्री, प्रेम, संसार किंवा कोणत्याही नात्याचं असंच असल्याचं सांगणारा हा चित्रपट आहे. यात अश्विनी कासार, पंकज खामकर, दिलीप डोंबे, श्रावणी सोळसकर, मिलिंद दास्ताने यांच्या जोडीला बालकलाकार भूमी अविनाश कुडचे, गौरी अविनाश कुडचे यांच्याही भूमिका आहेत.
====
हे देखील वाचा: राष्ट्रीय पुरस्कारविजेते शिवाजी लोटण-पाटील यांच्या चित्रपटात आता प्रिती मल्लापूरकर
====
‘तराफा’ची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन सुबोध पवार यांनी अमृताच्या साथीनं केलं आहे. सुधीर मेश्राम यांनी मुख्य सहाय्यक दिग्दर्शकाची, तर महेश जी. भारंबे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. डिओपी राजा फडतरे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन निलेश गावंड यांचं आहे.
संगीत विजय गटलेवार यांनी दिलं आहे तर कोरिओग्राफी प्रदीप कार्लेकर आणि शार्दुल कुंवर यांची आहे. विजय गटलेवार, जयश्री करंबेळकर, विवेक नाईक यांनी या चित्रपटासाठी गायन केलं आहे. वेशभूषा शाऊल गटलेवार, रंगभूषा संतोष भोसले आणि केशभूषा मनाली भोसले यांनी केली आहे. कला दिग्दर्शन केशव ठाकूर यांनी केले असून ६ मे रोजी हा चित्रपट रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.