Home » China : कुणी लग्न करणार का लग्न !

China : कुणी लग्न करणार का लग्न !

by Team Gajawaja
0 comment
China
Share

महासत्ता म्हणवून घेणा-या चीनच्या हुनान प्रांतात नुकतीच एक घटना झाली, त्यावरुन चीनमधील तरुणांची मानसिकता स्पष्ट होत आहे. या हुनान प्रांतातील चांग्शा येथील रेल्वे स्टेशनवर एका 40 वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. ही व्यक्ती बेशुद्ध होऊन खाली पडली. रेल्वे स्थानकातील कर्मचारी आणि डॉक्टर यांनी तात्काळ य व्यक्तीचा ताबा घेतला. साधारण अर्धा तासात व्यक्तीला शुद्ध आली. त्यानंतर डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. यावर या व्यक्तिनं रेल्वे स्थानकावरच डॉक्टरांबरोबर वाद घालायला सुरुवात केली. मला कामावर जाण्यासाठी हाय-स्पीड ट्रेन पकडावी लागेल, असे तो वारंवार डॉक्टर आणि तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे कर्माचा-यांना सांगू लागला. शेवटी डॉक्टर त्याला जबरदस्तीनं रुग्णालयात घेऊन गेले. (China)

ही बातमी चीनच्या वृत्तपत्रात आली, आणि सोबत चीनमध्ये नोकरी टिकवण्यासाठी तरुणांमध्ये किती तणाव आहे, याचीही चर्चा झाली. त्यासोबतच या वाढत्या तणावामुळे चीनमधील तरुण-तरुणी लग्न करण्यास नकार देत असल्याचेही सांगण्यात आले आहे. चीनमध्ये नोकरीतील तणाव, सुट्ट्यांचे अगदी नगण्य प्रमाण आणि ऑफिसमध्ये 12 ते 14 तास तासांची ड्युटी यामुळे कुटुंबसंस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. नोकरी टिकवणे आणि टिकवलेल्या नोकरीत प्रमोशन मिळवणे या चक्रात येथील तरुण अडकले असून त्यापुढे त्यांना त्यांच्या प्रकृतीचीही काळजी वाटत नाही. या चक्रात अडकलेला चीनमधील तरुण वर्ग मोठ्या मानसिक ताणातून जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे, चीनमध्ये लग्नाचे प्रमाण कमी झाले असून चीनची लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे. (International News)

एकेकाळी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनची ओळख होती. मात्र पुढच्या काही वर्षात चीनमधील लोकसंख्या कमी होणार असून चीन हा सर्वाधिक वृद्धांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. या सर्वांसाठी चीनमधील सरकारचे धोरण कारणीभूत ठरले आहे. चीनमध्ये विवाह दर झपाट्याने घसरत चालला आहे. गेल्या वर्षी, चीनमधील विवाह दरात आत्तापर्यंतची मोठी घसरण झाली असून यात दरवर्षी वाढ होईल, अशी शंका येथील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. कुटुंबाचा सांभाळ आणि मुलांचे संगोपन करण्यासाठी येणारा मोठा खर्च आणि नोकरीच्या ठिकाणी असलेली स्पर्धा यासाठी कारणीभूत ठरली आहे. जगातील अनेक देश कमी लोकसंख्या आणि कमी प्रजनन दराच्या समस्येला सामोरे जात आहेत. (China)

जपान आणि कोरियामध्ये ही समस्या मोठी आहे. आता यात चीनचाही समावेश झाला आहे. चीनची लोकसंख्या 2022 पासून कमी होत चालली आहे. मुख्य म्हणजे चीनची लोकसंख्या ही वृद्ध होत चालली आहे. 14 टक्के चीनी नागरिक हे 65 वयापुढील आहेत. सध्या चीनमध्ये 60 वर्षापेक्षा वय असणारे 30 कोटी नागरिक आहेत. दरवर्षी या आकडेवारीत वाढ होणार आहे. अंदाजानुसार 2033 पर्यंत ही संख्या 40 कोटी होणार आहे. या सर्वात चिंताजनक म्हणजे, चीनमधील तरुण आणि तरुणी लग्न करण्यास टाळाटाळ करीत आहेत. येथे लाखो तरुण 40 पार होऊनही लग्न करत नाहीत. लग्नाऐवजी कार्यालयीन बढती आणि वाढीव पगार मिळण्यासाठी करावे लागणारे अतिरिक्त काम, यातच चीनची तरुण पिढी व्यस्त आहे. आता याच तरुणांनी लग्न करावे आणि अधिक मुलांना जन्म द्यावा म्हणून चीन सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी चक्क विवाह मंडळ चालवण्याची वेळही चीनी सरकारवर आली आहे. फारकाय आता चीनी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही कुटुंबसंस्था किती महत्त्वाची आहे, याचा धडा विद्यार्थ्यांना देण्याची सुरुवात कऱण्यात आली आहे. (International News)

============

हे देखील वाचा : Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे झाले ?

============

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, सरकारनं देशभरातील सर्वच शाळा आणि शासकीय विभागांना लोकसंख्या वाढवण्यासाठी योग्य वयात लग्न करण्यास आणि मुले जन्माला घालण्यासाठी जागरुकता निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या सलग 3 वर्षांपासून चीनमधील लोकसंख्या कमी होत असल्यानं आता या समस्येवर सामाजिक बाजूनेही विचार सुरु झाला आहे. त्यातून चिनमध्ये कार्यालयीन कामकाज आणि त्यातील स्पर्धा यावरही चर्चा झाली आहे. चीन सरकारनं आता विवाह आणि बाळंतपण यासाठी अधिक रजा देण्यास सुरुवात केली आहे. त्यातून मातृत्व विमा, कामाच्या ठिकाणी मातांना अधिकची रजा, बाळंतपणासाठी अनुदान, प्रसुती वैद्यकीय विमा, लहान मुलांसाठी आरोग्य आणि शिक्षण विमा, बालसंगोपन केंद्र आदी विविध योजना जाहीर केल्या आहेत. या सर्वांमुळे चीनमध्ये लग्न करणा-यां तरुणांची संख्या वाढेल अशी आशा सरकारला आहे. (China)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.