Home » बर्फाच्या पाण्यातली जादू…

बर्फाच्या पाण्यातली जादू…

by Team Gajawaja
0 comment
Water Therapy
Share

आईस बाथ… सध्या सोशल मिडियावर हा शब्द खुप व्हायरल होत आहे.  मुख्य म्हणजे, सोशल मिडियावर ज्यांचे लाखो, करोडो चाहते आहेत, असे अभिनेते आणि अभिनेत्रीही आपले बर्फानं भरलेल्या बाथ टबमधील फोटो शेअर करत आहे.  याला आईस बाथ थेरपी असं नाव आहे. या आईस बाथ थेरपीची सध्या चर्चा सगळीकडे आहे.  15 अंश किंवा त्यापेक्षा कमी थंड पाण्याने 10 ते 15 मिनिटे अंघोळ केल्यास अनेक फायदे असल्याचे सांगण्यात येते. या थंड पाण्याच्या थेरपीला हायड्रोथेरपी असेही म्हणतात.  ही थेरपी खेळाडूंमध्येही खूप लोकप्रिय आहे. (Water Therapy)  

वास्तविक अंघोळ करण्यासाठी नेहमी गरम पाण्याचा वापर केला जातो.  काहीजण थंडपाण्यानं अंघोळ करतात. पण हे थंड पाणी सामान्य तापमानाचे असते.  मात्र बर्फाच्या पाण्यानं अंघोळ करायची आणि त्या पाण्यात 10 मिनिटे बसून राहायचे, या कल्पनेनेही थंडी वाजायला लागते.  त्यामुळे काही फायदे होण्यापेक्षा त्यातून अधिक नुकसानच होण्याची शक्यता असल्याची भीतीही आहे.  यामुळेच ही आईस बाथ थेरपी म्हणजे काय ? हे आधी जाणून घेतले पाहिजे. (Water Therapy)

उन्हाळ्यात थंड पाण्यानं अंघोळ करतांना मजा वाटते. पण हेच पाणी 15 डिग्री किंवा त्याहून अधिक कमी असेल तर कसं वाटत असेल याचाही विचार केला पाहिजे.  जेव्हा तुम्ही 15 डिग्री किंवा त्याहून कमी थंड पाण्याने 10 ते 15 मिनिटे अंघोळ करता तेव्हा त्याला आईस बाथ थेरपी किंवा हायड्रोथेरपी म्हणतात. ही थेरपी खेळाडूंमध्ये लोकप्रिय आहे. पण आता त्यांच्यासोबत सिनेसृष्टीतही या थेरपीची क्रेझ वाढली आणि आपले आवडते अभिनेते जी आईस बाथ थेरपी घेत आहेत, तशीच आपणही घेऊया म्हणून अनेकांनी या आईस बाथ थेरपीचा अनुभव घेतला आहे.  या थेरपीमुळे शरीराला आराम मिळतो.  शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची पातळी वाढते.  थंड पाण्याची ही थेरपी घेतांना सुरुवातीला त्रास होतो. मात्र काही मिनिटातच या थंड पाण्याचा शरीराला सराव होतो, तेव्हापासून शरीरातील पेशींना या पाण्याचा लाभ मिळायला सुरुवात होते, असे सांगितले जाते.  या आईस बाथ थेरपीचा जे उपयोग करतात त्यांना हिवाळ्यात होणारा सर्दीचा त्रास कमी होतो, असेही सांगण्यात येते.  (Water Therapy)

या आईस बाथ संदर्भात अनेकांनी संशोधन केले आहे. एका डच अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की, आईस बाथ थेरपीने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.  शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढल्यामुळे शरीराला रोगांपासून संरक्षण मिळते.  याशिवाय शरीरातील सर्व विषारी पदार्थ यामुळे बाहेर पडण्यास मदत होते. रक्तभिसरण प्रणाली सुधारते.  तसेच आईस बाथ थेरपीमुळे शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह ही सुधारतो, असे सांगितले जाते. (Water Therapy) 

मुख्य म्हणजे, ज्यांना स्नायू दुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही आईस बाथ थेरपी वरदान मानली जाते.  त्यामुळेच खेळाडूंमध्ये या थेरपीची लोकप्रियता आहे. खेळाडूंना अनेकवेळा मार लागतो, त्यांचे स्नायू दुखावले जातात. अशावेळी ही आईस बाथ थेरपी केल्यास त्यांना अन्य औषधांपेक्षा लवकर आराम पडतो, असा दावा आहे. त्यामागे कारणही सांगण्यात आले आहे, थंड पाण्यामुळे रक्तवाहिनींचे आकुंचन होते. त्यामुळे ज्या भागात वेदना आहेत, तिथे रक्ताचा प्रवाह मंदावतो, आणि सूज किंवा वेदना कमी होते. आईस बाथ थेरपीनं अर्थात अतिउष्णतेपासूनही शरीराला होणारा त्रास कमी होतो. ही आईस बाथ थेरपी वजन कमी करण्यासही सहाय्य करते. या थंड पाण्यात स्नान केल्यावर कॅलरिज बर्न होतात, असे आढळून आले आहे. शिवाय यामुळे मज्जासंस्थेला आराम होतो.  त्यामुळे शरीराचा थकवा दूर होतो. ज्यंना निद्रा नाशाची समस्या आहे, त्यांच्यासाठी ही आईस बाथ थेरपी सुचवण्यात येते. (Water Therapy) 

=========

हे देखील वाचा : भारतातील असे शहर जेथे फुकटात राहता येते

=========

आईस बाथ थेरपीचे जेवढे फायदे आहेत, तेवढीच ही थेरपी घेतांना काळजी घेण्याचीही गरज असते. अन्यथा या थेरपीमुळे नुकसान होण्याचीही शक्यता असते. या थंडगार पाण्यानं आंघोळ करण्यापूर्वी आपल्या शरीराचे तापमान सामान्य होऊ देणे गरजेचे असते. यासाठी काही काळ एसीमध्ये बसण्याचा सल्ला दिला जातो. शक्यतो ही थेरपी तज्ञांच्या मार्गदर्शनातच करावी. कारण शरीराचे तपमान अचानक वाढणे किंव कमी होणे या दोघांतूनही नुकसान होण्याची शक्यता असते.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.