Home » म्हटलेलं वाक्य त्याने युद्धभूमीवर खरं केलं !

म्हटलेलं वाक्य त्याने युद्धभूमीवर खरं केलं !

by Team Gajawaja
0 comment
Manoj Kumar Pandey
Share

‘जय महाकाली, आयो गोरखाली’च्या घोषणा देत गोरखा रायफल्सचे सैनिक खालूबारच्या शिखरावर पोहोचले. घळीत दबा धरून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांचा गोळ्यांचा वर्षाव सुरूच होता. त्याची पर्वा न करता कॅप्टन मनोज कुमार पांडे आपल्या तुकडीसोबत वर सरकत होते. तेवढ्यात शत्रू सैनिक समोर आल्यावर सर्वांनी बंदुका आणि खुकरीने त्यांच्याशी दोन हात केले. Combat फाईटमध्ये कॅप्टन मनोज यांनी आपल्या खुकरीने तीन शत्रूंचा खातमा केला. (Manoj Kumar Pandey)

यानंतर पाकच्या बंकरकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. मात्र बंकरमधून सुरू असलेल्या गोळ्यांच्या भडीमारामुळे कॅप्टन मनोज यांच्या खांद्याला आणि पायाला एक गोळी लागली. मात्र नेपाळी भाषेत ‘ना छोडवू’ असं आपल्या सहकाऱ्यांना म्हणत ते पुढे जात राहिले. मात्र याचवेळी बंकरमधून एक Mortar मनोजकुमार यांच्या कपाळावर फुटला आणि क्षणातच त्यांचे डोळे मिटले गेले.

फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचं एक वाक्य आहे, If a man says he is not afraid of dying, he is either lying or is a Gurkha. त्यांचं हेच वाक्य सत्यात उतरवून दाखवलं गोरखा रायफल्सच्या कॅप्टन मनोज कुमार पांडे यांनी ! कारगिलच्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या मनोज पांडे यांचा प्रवास जितका खडतर तितकाच प्रेरणादायी आहे. परमवीर चक्र जिंकण्याचा मानस तर या पठ्ठयाने एका इंटरव्युमध्येच बोलून दाखवला होता. कारगिल विजय दिवसला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, याच निमित्ताने आम्ही मनोज पांडे यांची शौर्यगाथा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. (Manoj Kumar Pandey)

मनोज पांडे यांचा जन्म 25 जून 1975 रोजी उत्तर प्रदेशच्या सीतापुरमध्ये झाला होता. घरातल्या चार भावंडांपैकी सर्वात मोठा मुलगा, त्यामुळे जबाबदाऱ्या येणार सर्वसाधारण परिस्थितीत वाढलेला सर्वसाधारण मुलांसारखाच मनोज काटकसरी होता. लहानपणापासून हुशार… त्यात बॉक्सिंग आणि बॉडीबिल्डिंगची आवड, त्यामुळे काहीतरी वेगळं करावं, हे आधीच ठरवलं होतं. मनोज 1990 साली राज्यातला एनसीसीचा सर्वात बेस्ट कॅडेट ठरला होता. यानंतर समोर एकच ध्येय ठेवलं आर्मीमध्ये जायचं. यासाठी तो एनडीएचं प्रिपेरेशन करायला लागला. आई-वडिलांनीही होकार दिला आणि अखेर खडतर मेहनत करून तो एनडीएमधून पासआउट झाला.

एनडीएच्या निवड समितीपुढे इंटरव्युला गेला असताना त्याला मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याने विचारलं की, आर्मीमध्ये का भरती व्हायच आहे ? क्षणाचाही विलंब न करता मनोजने उत्तर दिलं, मला परमवीर चक्र मिळवायचं आहे ! यावेळी मुलाखत घेणारा अधिकारी पॅनलवरच्या इतर अधिकाऱ्यांकडे बघत मंद हसला पण त्या अधिकाऱ्याला कदाचित माहीत नसावं की, हाच 18 वर्षांचा कोवळा मुलगा भविष्यात त्याचे शब्द पूर्ण करणार आहे. यानंतर मनोजसमोर दुसरं आव्हान होतं, आयएमएचं म्हणजेच इंडियन मिलिटरी एकडमीचं ! इथेही त्याने आपली चुणूक दाखवली आणि अखेर आर्मीमध्ये ऑफिसर झाला. यंग, Dashing, Dynamic ऑफिसर लेफ्टनंट मनोज कुमार पांडे ! (Manoj Kumar Pandey)

11th गोरखा रायफल्सच्या 1st बटालियनमध्ये 7 जून 1997 ला मनोज यांची लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली. कॅप्टन मनोज यांची सुरुवातच सियाचीन गलेशियरपासून झाली. सगळ्यांनाच माहीत आहे की, सियाचीनमध्ये तापमान मायनस 50 डिग्री इतकं असतं. इथे कॅप्टन मनोज यांनी काही महीने काढल्यानंतर त्यांची पोस्टिंग पुण्यात करण्यात आली. मात्र कारगिल युद्धाचं सावट पसरल्यानंतर त्यांच्या बटालीयनला त्वरित पुण्यातून कारगिलच्या बटालीक सेक्टरला येण्याचा आदेश मिळाला. येथे त्यांना आपल्या तुकडीचं नेतृत्व करायचं होतं. अपडेट्स मिळाल्या की, घुसखोर दहशतवादी आणि पाक सैन्य बटालीक सेक्टरमध्ये तळ ठोकून बसलं आहे. तो काळ होता मे-जून-जुलै 1999 !

कुडकुडणारी थंडी, हातात घट्ट धरलेली रायफल आणि कंबरेवर अडकवलेली ती कुकरी ! त्या खूकरीकडे पाहून मनोज यांना त्यांचा भूतकाळातला प्रसंग आठवला. हातघाईच्या युद्धात कुकरी सर्वात उत्तम शस्त्र, त्यामुळे त्याचा वापर कसा करावा, याचंही प्रशिक्षण गुरखा रेजिमेंट दिलं जातं. रेजिमेंटमध्ये दसऱ्यानिमित्त एक स्पर्धा भरवण्यात आली होती. (Manoj Kumar Pandey)

यावेळी एका घावातच बकऱ्याची मान कुकरीने धडावेगळी करायची होती. हे कौशल्यसुद्धा मनोज यांनी करून दाखवलं पण याचा त्यांना खूपवेळ पश्चाताप होता. कारण ते शाकाहारी होते. रूमवर परतल्यानंतर त्यांनी दहा-बारावेळा तोंड आणि हात धुतले. कदाचित त्यांना हे पाप असल्याचं भासत होतं. पण अचानक मनोज यांना कळून चुकलं की, आता तर मला शत्रूचा जीव घ्यायचा आहे. ते भानावर आले आणि मी एक सैनिक आहे, हे त्यांना कळून चुकलं. (Manoj Kumar Pandey)

याच कुकरीचा वापर आता प्रत्यक्ष रणांगणात करायचा होता. सर्वात आधी कुकरथनवर तिरंगा फडकवण्याचं लक्ष्य त्यांच्यासमोर होतं. हे ऑपरेशन दोन महीने चाललं आणि इथल्या सर्व शत्रूंना कॅप्टन मनोज यांच्या नेतृत्वातील तुकडीने यमसदनी धाडलं. गोठवणाऱ्या थंडीत बर्फाचे डोंगर चढून बेसावध असणाऱ्या सैनिकांना ठार करत त्यांनी कुकरथन आणि जूबरटॉप आपल्या ताब्यात घेतला. रणभूमीचा अनुभव आता कॅप्टन मनोज पांडे यांना आला होता. दररोज एकच कपडे, जेवण, पाणी नाही. थंडी, पाऊस, वारा, ऊन कसलीही पर्वा नाही. खडतर डोंगर चढण, कोणत्याही सुविधा नाहीत. केवळ आपली, रायफल, गोळ्या, कुकरी आणि ग्रेनेड याच्यातच त्यांचं आयुष्य गुंतलं होतं.

यानंतर आता त्यांच्यासमोर होतं खालूबारचं शिखर ताब्यात घेण ! त्यांच्यासोबत कर्नल ललित राय यांना गोरखा तुकडीचं नेतृत्व दिलं होतं. जुलैचा महिना होता. कॅप्टन मनोज आणि त्यांच्या गोरखा तुकडीचे सैनिक 14 तास निरंतर चालत होते. शिखराच्या माथ्याची रेषा त्यांना दिसत होती. आव्हान खडतर होतं पण आपलं लक्ष्य आपण काहीही करून गाठायचं हे त्यांनी मनात पक्क करून ठेवलं होतं. त्यांनी आपल्या डायरीमध्ये एक वाक्य लिहून ठेवलं होतं. Some Goals Are So Worthy, It’s Glorious Even To Fail! म्हणजे काही लक्ष्य इतकी सुंदर असतात की, त्यात आपण अपयशी ठरलो, तरीही ते गौरवास्पद वाटतात. त्यामुळे त्यांनी खालूबारचं कठीण आव्हान पूर्ण करायचं ठरवलं होतं. (Manoj Kumar Pandey)

कॅप्टन मनोज पांडे यांची एक सवय होती. कितीही गोळीबार असो, पण ते कसलीही पर्वा न करता थेट चवताळलेल्या सिंहासारखे शत्रूंवर झेप घ्यायचे. त्यांचा असा रुद्रावतार त्यांच्या सैनिकांनी अनेकदा पाहिला होता. खालूबारजवळच्या एका छोट्या घळीत 10 दिवसांपासून भारतीय सैनिकांचे मृतदेह पडून होते. त्यातच या ठिकाणी पाक सैनिकांनी संरक्षक भिंत उभारली होती त्यामुळे इथे जाऊन त्यांचा मृतदेह आणण म्हणजे स्वतचा जीव गमावण असं होतं. पाकिस्तानच्या आक्रमणाचा अंदाज भारतीय सैनिकांना नव्हता. कोणीही त्या घळीत जाण्याचा प्रयत्न केला, तर पाक सैनिक प्रचंड गोळीबार करायचे. तरीही मनोज यांना वाटतं होतं की त्या सैनिकांना आणून त्यांच्यावर सन्मानाने अन्त्यसंस्कार करावेत. (Manoj Kumar Pandey)

पण आपल्या जिवाची बाजी लावून धुवाधार गोळीबार असतानाही त्यांनी ते चार मृतदेह आणि त्यांना आपल्या तळापर्यंत पोहोचवलं. आपल्या मृत साथीदारांची छिन्नविचिन्न झालेले चेहरे पाहून त्यांचा राग अनावर झाला होता. पाकिस्तानच्या कुत्र्यांनो, मी तुम्हाला माझ्या मायभूमीतून उखडून फेकून देईन, अशी घोषणा करत त्यांनी आता तर यांना सोडायचं नाही, हा दृढनिश्चय केला.

शत्रूंचे बंकर आता थोड्याच अंतरावर होते, त्यातच आपल्या सहकाऱ्यांना कव्हर फायर देण्याचं सांगून त्या गोळ्यांच्या वर्षावात विजेच्या वेगात ते शत्रूच्या बंकरजवळ पोहोचले. तेवढ्यात पाकच्या Northern Light Infantry चे दोन सैनिक त्यांना दिसले. आपल्या कंबरेला अडकवलेली कुकरी त्यांनी काढली. कुकरीचं पातं आकाशात भिरकावलं, ‘जय महाकाली, आयो गोरखाली’ ची गर्जना झाली आणि सपासप शत्रूंच्या गळ्यावर वार झाले. (Manoj Kumar Pandey)

आपण वरती आलोय तर आता महत्त्वाचं होतं बंकर उडवणं ! मनोज आपली कुकरी घेऊन पुढे सरकले. पाकिस्तानी सैनिक बायोनेटचा वापर करत होतं. तेवढ्यात Combat फाईट सुरू झाली. या फाईटमध्येच त्यांनी तीन शत्रूंना ठार केलं. मात्र त्यांच्या बंकरमधून मशीनगन्सचा मारा सुरूच होता तरीही ते ऐकले नाहीत, बंकरकडे जातच राहिले. एवढ्यात एक गोळी त्यांच्या पायात घुसली आणि एक गोळी खांद्याला लागली. जमीनीवरूनच सरकत सरकत ते नेपाळी भाषेत ‘ना छोडवू’ असं आपल्या सहकाऱ्यांना म्हणतच होते. आपला जखमी पाय पुढे सरकवत त्यांनी एक हातबॉम्ब काढला आणि तो बंकरकडे भिरकावला. बंकर ध्वस्त झाला. या एकट्या विरानेच तीन बंकर उद्ध्वस्त करून टाकले होते. (Manoj Kumar Pandey)

पण त्याचवेळी बंकरमधून सुटलेला एक मॉर्टर त्यांच्या डोक्याजवळ फुटला. सगळं अंधुक झालं. त्यांना श्वास घेण अशक्य झालं. जिभेला कोरड पडली. अजून काहीतरी करायचं बाकी होतं, पण शरीराने आणि मनाने आज्ञा देणं बंद केलं होतं. कुकरी हातातून गळून पडली. ट्रीगरवरुन बोट निघालं.

============================

हे देखील वाचा :  ‘ये दिल मांगे मोर’ म्हणत विक्रम बत्रांनी जिंकला कारगिल !

============================

मान छातीवर कलली आणि कॅप्टन मनोज कुमार पांडे कोलमडून खाली पडले. फुटलेल्या डोक्यातून चेहऱ्यावर रक्त वाहायला लागलं. डोळ्यांसमोर अंधारी आली आणि त्यांनी आपले डोळे कायमचे मिटले. कॅप्टन धारातीर्थी पडले. भारत मातेच्या सुपुत्राने तीच्या रक्षणार्थ आपला जीव ओवाळून टाकला. त्या चौथ्या बंकरसमोर रक्ताच्या थारोळ्यात काही वेळ त्यांचा मृतदेह पडूनच होता. (Manoj Kumar Pandey)

त्यावेळी त्या कोवळ्या पण धाडसी विराचं वय होतं केवळ 24 वर्ष आणि 7 दिवस ! सहा वर्षांपूर्वी याच मनोज कुमार पांडे यांनी इंटरव्युमध्ये म्हटलं होतं की, ‘मला परमवीर चक्र मिळवायचं आहे’ आणि त्यांनी ते सहा वर्षानंतर साध्य करून दाखवलं. भारत सरकारने त्यांचा सर्वोच्च अशा परमवीर चक्र पुरस्काराने सन्मान केला. ‘जब तक सूरज चाँद रहेगा, मनोज पांडे तुम्हारा नाम रहेगा’ अशा घोषणांनी सीतापुर दणाणून उठलं होतं. इतक्या कमी वयातच देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या कारगिल युद्धातील या महावीराला गाजावाजाचा सलाम !


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.