Home » तालिबान बांधणार हिंदूंसाठी मंदिर

तालिबान बांधणार हिंदूंसाठी मंदिर

by Team Gajawaja
0 comment
Hindu Temple
Share

15 ऑगस्ट 2021 रोजी अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा तालिबानकडे आला. याच दिवशी तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला आणि हे सर्व शहर ताब्यात घेतले. या घटनेला जवळपास दोन वर्ष झाली असून आता सर्व अफगाणिस्तानवर तालिबानची एकहाती सत्ता आहे. या दोन वर्षात काय बदल झाले हा प्रश्न नेहमी विचारला जातो. शिवाय तालिबानच्या दहशतीची अनेक उदाहरणंही समोर आणली जातात. मात्र या जहाल अतिरेकी संघटनेनं आता आपल्या विचारसरणीला बदलायला सुरुवात केली आहे. एका देशावर राज्य करायचं असेल तर त्यासाठी जगभराची मदत लागते आणि जागतिक मदत हवी असेल तर सर्वसमावेशक धोरण गरजेचे असते. तालिबानला याची जाणीव झाली आहे. कारण एकेकाळी हिंदूंची मंदिरे उद्धस्त करणारे आणि बुद्धाच्या मुर्ती तोफांच्या गोळ्यांनी तोडणारे तालिबान आता हिंदू मंदिरांची निर्मिती करणार आहे. स्वतः तालिबान सरकारनं या हिंदू मंदिरासाठी आपल्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. (Hindu Temple)

विशेष म्हणजे हे मंदिर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेचे मुख्यालय जिथे आहे, त्या वझिरीस्तानमध्ये बांधण्यात येणार आहे.  तालिबानचा हा निर्णय धक्कादायक आहे. मुळात पहिला धक्का बसला आहे तो पाकिस्तानला. कारण पाकिस्तानमध्ये जी मोजकी हिंदू मंदिरे शिल्लक राहिली आहेत, त्यांची अवस्था खराब आहे. तिथे हिंदू धर्मियांवर रोज हल्ले होत आहेत. उलट अफगाणिस्तानमध्ये असलेल्या हिंदू कुटुंबांनी आनंदानं रहावं. त्यांच्यासाठी आम्ही मंदिराचीही व्यवस्था करुन देऊ असे तालिबाननं जाहीर केल्यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे. शिवाय अलिकडे भारत सरकार आणि तालिबान यांच्यात जी सकारात्मक बोलणी झाली, त्याचे हे परिणाम असल्याचीही चर्चा आहे. (Hindu Temple) 

अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानमधील मीरानशाह येथे हिंदू कुटुंब वास्तव्यास आहेत. या कुटुंबांच्या अनेक पिढ्या याच भागात राहत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आली तरी या कुटुंबांनी हा देश सोडला नाही. आता या 60 हिंदू कुटुंबांसाठी तालिबान मंदिर बांधणार आहे. मुख्य म्हणजे  हा भाग पाकिस्तान लष्कर आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला आहे. गेली काही वर्ष पाकिस्तानी लष्कर आणि तहरीक-ए-तालिबान या संघटनेमध्ये चकमकी होत आहेत. या सर्व वातावरणात येथील मुळ हिंदू कुटुंब टिकून आहेत. आता त्यांच्यासाठी तालिबाननं जमीन उपलब्ध करुन दिली आहे. उत्तर वझिरीस्तानचे खासदार मोहसिन दावर यांनी मंदिरासाठी जमिनीची निवड केल्याची माहिती दिली. शिवाय मंदिराच्या उभारणीसाठी अर्थसंकल्पातही तरतूद केल्याचेही स्पष्ट केले आहे. येथील हिंदू कुटुंबांची काळजी तालिबान घेत असल्याचे एका तालिबान कमांडरने सांगितले.(Hindu Temple)  

हिंदू कुटुंबांच्या रक्षणाची आणि त्यांच्या श्रद्धांची काळजी घेतली जात असल्याचेही तालिबानं स्पष्ट केले. तसेच येथील हिंदू कुटुंबानीही तालिबाननं आपल्याला कधीही त्रास दिला नाही तसेच धार्मिक पूजा समारंभामध्ये अटकाव केला नसल्याचे स्पष्ट केले. वझिरीस्तान हा भाग हिंदूंसाठी सर्वाधिक सुरक्षित मानला जातो. पाकिस्तानच्या अन्य भागात रहाणारी हिंदु कुटुंबेही वझिरीस्तानमध्ये स्थलांतरीत होण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यासाठी येथे होणारे मंदिर आशेचा किरण आहे. कारण पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले हे आता नित्याचेच झाले आहेत. आता खुद्द तालिबानच मंदिर बांधणार असल्यामुळे त्यावर हल्ला होणार नाही, अशी खात्री येथील हिंदुंना आहे. (Hindu Temple)  

पाकिस्तानातील सिंध आणि पंजाब प्रांतात तीन वर्षांत १२ मंदिरांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये पंजाबमधील रावळपिंडी येथील 100 वर्षे जुन्या मंदिरावरील हल्ला आणि सिंधमधील श्री राम मंदिरावरील हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील हिंदुंची अवस्था जगापुढे आली होती. (Hindu Temple)  

========

हे देखील वाचा : Success Story: दलित समाजातील अरबपति- राजेश सरैया

========

अफगाणिस्तानमध्ये मात्र हिंदु मंदिरांचे (Hindu Temple) अस्तित्व कायम आहे. हिंदू आणि शीख यांच्या धार्मिक स्थळांना तालिबाननं लक्ष केलं होतं. मात्र आता तालिबान आपल्या देशात रहात असलेल्या हिंदुबरोबर मिळतेजुळते घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातूनच तेथील मंदिरांना संरक्षण मिळत आहे. अशात अफगाणिस्तानमधील दुर्गामातेच्या मंदिराबाबतही अनेक आख्यायिका सांगण्यात येतात.  हे मंदिर अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील आसा टेकडीवर आहे.  माँ शक्तीचे हे मंदिर आसा माई म्हणून ओळखले जाते, ते एक प्राचीन शक्तीपीठ आहे.  देवीच्याच नावावरून या टेकडीचे नाव आसा पहाडी ठेवण्यात आले.  माता आसा माईच्या मंदिरात मां शक्तीशिवाय इतर अनेक देवतांच्या मूर्तीही आहेत.  या मंदिरात नवरात्रात भाविकांची गर्दी असते.  काबुलमधील या मंदिराबाबत तालिबानच्या मनात दहशत आहे.  कारण या मंदिरावर कोणी वाईट नजर टाकली तर त्याचे दगडात रुपांतर होते, अशी आख्यायिका आहे. यामुळे तालिबाननं या मंदिरापासून दूर रहाणेच पसंद केले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.