2001 वर्षातला मार्च महिना हा जगाला एक मोठा धक्का देणारा होता. अतिरेकी विचारांमधला द्वेष किती व्यापक असू शकतो, याचे एक उदाहरणच जगाला लाईव्ह बघता आले. अफगाणिस्तानवर तालिबाननं तेव्हा ताबा मिळवला होता. जहाल अतिरेकी विचाराच्या या संघटनेनं तेव्हा प्रमुख मुल्ला मोहम्मद उमर याच्या आदेशानुसार अफगाणिस्तानमधील बुद्धाच्या मूर्ती अक्षरशः डायनामाइटने उडवून दिल्या. हे क्रूर काम करतांना जगाला लाईव्ह दिसेल याचीही व्यवस्था तालिबाननं केली होती. तालिबानला या बुद्धाच्या प्राचीन मुर्ती फोडू नये, म्हणून जगभरातून विनंती करण्यात येत होती. काही देशांनी तालिबानला त्या बदल्यात करोडो रुपयांचे अमिषही दाखवले. पण या अतिरेकी संघटनेनं हा ऐतिहासिक वारसा बॉम्बस्फोट करत उडवून लावला. जगभरातून तालिबानच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला. पण तालिबानं या सर्व निषेधाला बाजुला सारत, आमच्या धर्मात मुर्तीपुजा मान्य नाही, असं उत्तर दिलं होतं. (Taliban and Buddha statues)
मात्र याच तालिबान्यांना आता बुद्धाच्या आस-याला जावं लागलं आहे, हे एकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. एकेकाळी ज्या बुद्धाच्या मुर्ती तालिबानी अतिरेक्यांनी फोडल्या होत्या, त्याच मुर्ती आता या अतिरेक्यांना अन्न देत आहेत आणि त्यांच्याच आधारावर तालिबान्यांची गुजरण होत आहे. आपल्या संघटनेतर्फे काही वर्षापूर्वी झालं ते वेगळं होत, आणि संघटना बदलली आहे, असं स्पष्टीकरण देत तालिबाननं या मुर्ती बघण्यासाठी येणा-यांकडून पैसे वसूल करायला सुरुवात केली आहे. बामियानमधील बुद्ध मूर्ती तालिबान्यांनी तोडल्या असल्या तरी त्या जागेला बघण्यासाठी आणि वंदन करायला येणा-यांची संख्या कमी झाली नाही. अफगाणिस्तान दुस-यांदा तालिबानच्या ताब्यात गेला तरी या जागी येणा-या पर्यटकांची संख्या कमी झाली नाही. या पर्यटकांकडून आता तालिबान पैसे वसूल करत असून याच पैशातून आपल्या गरजा पूर्ण करत आहे. (Taliban and Buddha statues)

22 वर्षांपूर्वी तालिबान्यांनी उद्ध्वस्त केलेल्या बुद्धाच्या मूर्ती पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांकडून आता हेच तालिबानी पैसे घेऊन तिकीट विकत आहेत. अफगाणिस्तानच्या बामियान भागातील बुद्धाच्या मूर्ती आता तालिबान्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत झाल्या आहेत. अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थानी असलेल्या तालिबानचे सांस्कृतिक मंत्री अतिकुल्ला अजीजी यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. बामियान आणि बुद्ध आमच्या सरकारसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता या बुद्ध मुर्तींच्या सुरक्षेसाठी एक हजार रक्षक नेमण्यात आले आहेत. हे सुरक्षारक्षक या मुर्ती बघण्यासाठी येणा-या पर्यटकांकडून पैसे वसूल करतात. सांस्कृतिक विभागाचे संचालक सैफुररहमान मोहम्मदी यांनी तालिबानच्या बदललेल्या धोरणाबाबत स्पष्टीकरण दिले. (Taliban and Buddha statues)
दोन दशकांपूर्वी घडलेल्या घटनेबद्दल बोलण्यात अर्थ नाही.आता पुढे जाण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बामियान हा अफगाणिस्तानातील सर्वात गरीब प्रांतांपैकी एक आहे. हिंदुकुशच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या, बामियानमधील बहुतेक नागरिक फक्त बटाटा लागवड आणि कोळसा खाणीवर अवलंबून आहेत. या भागात असलेल्या या बुद्ध मुर्ती बघण्यासाठी पहिल्यापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असत. त्यामध्ये परदेशी पर्यटकांची संख्या अधिक होती. या पर्यटकांकडून स्थानिकांना चांगला फायदा होत असे. मात्र तालिबानं या भागावर ताबा मिळवल्यावर आणि नंतर मुर्ती नष्ट केल्यावर पर्यटकांची संख्या रोडावली. त्यामुळे स्थानिकांची उपासमार होऊ लागली. मात्र 2003 मध्ये युनेस्कोने बामियानला ऐतिहासिक स्थळाचा दर्जा दिला. (Taliban and Buddha statues)
त्यानंतर परदेशी पर्यटक पुन्हा या स्थळी भेट देऊ लागले. आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानची सत्ता काबिज केलेल्या तालिबानं बुद्ध मूर्तींच्या रिकाम्या जागेसमोर आपले बंदूकधारी सैनिक बसवले आहेत. हे सुरक्षा रक्षक अफगाण पर्यटकांकडून 3 रुपये आणि परदेशी पर्यटकांकडून 282 रुपये तिकीट ठेवण्यात आले आहे. 2015 पासून येथे लेझर शो आयोजित केला जातो. गेल्या वर्षी 2 लाखांहून अधिक अफगाण पर्यटक बामियानला पोहोचले होते. यातील प्रत्येक व्यक्तीने सरासरी पाच हजार रुपये खर्च केले होते. हा सर्व पैसा तालिबानच्या तिजोरीत जात आहे. आता तर तालिबानी अधिका-यांनी बामियानमधील तलावात पर्यटनाला चालना देण्यासाठी बोटिंगचीही व्यवस्था केली आहे. आम्ही उदारमतवादी आहोत, हे सांगण्याचा सध्याच्या तालिबान सरकारचा प्रयत्न आहे. अफगाणिस्तानातील सध्याचे तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून बामियानचा विकास करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र बामियानमधील बुद्ध मुर्तींच्या ठिकाणी ‘दहशतवादी तालिबान गटाने’ बुद्धाच्या मूर्ती फोडल्याचे पत्रक लावण्यात आले होते. त्यातील दहशतवादी हा शब्द आता काढून टाकण्यात आला आहे. आता पर्यटकांच्या सुविधेसाठी काम करण्यात येत आहे. चक्क बामियानमध्ये पर्यटकांना बुद्ध चित्रे आणि शिल्पे विकणारी दुकाने देखील सुरु करण्यात आली आहेत. (Taliban and Buddha statues)
=========
हे देखील वाचा : ऑपरेशन मॅन म्हणून ओळखले जाणारे ‘रवी सिन्हा’
=========
असे असले तरी जागतिक वारशाचा दर्जा असूनही बामियानमध्ये सुरक्षिततेची कोणतीही भक्कम व्यवस्था नाही. बामियानच्या डोंगराळ भागात अनेक ठिकाणी नागरिक रहात आहेत. हा संपूर्ण परिसर ऐतिहासीक वास्तूंने भरलेला आहे. येथे खोदकाम केल्यास अनेक ऐतिहासिक वस्तू मिळत आहेत. असे असले तरी या भागात आता नागरी वस्ती वाढली आहे. नागरिक या ऐतिहासिक वस्तू ताब्यात घेत आहेत. त्यांना कोणीही रोखत नाही. याशिवाय बामियानच्या टेकड्यांमधील अवैध खाणकामही जागतिक वारशासाठी धोकादायक ठरणार आहे. तालिबानला उशीरा का होईना पण या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व समजले आहे. आतातरी हा वारसा जोपासण्यासाठी योग्य काळजी घ्यावी अशी मागणी होत आहे.
सई बने