Home » Tajmahal : ताजमहाल व्हर्जन २ : नवऱ्याने बायकोसाठी बांधले ‘ताजमहल’सारखे घर

Tajmahal : ताजमहाल व्हर्जन २ : नवऱ्याने बायकोसाठी बांधले ‘ताजमहल’सारखे घर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tajmahal
Share

‘प्रेम’ म्हणजे जगातील सर्वात सुंदर भावना. प्रेम ही अशी भावना आहे, जी शब्दात व्यक्त करताच येत नाही. डोळ्यातून, वागण्यातून आपोआपच ती समोरच्या व्यक्तीला जाणवते. अनेकदा गंमतीगमतीमध्ये बायको नवऱ्याला विचारते, ‘तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता?’ नवरा देखील या प्रश्नाचे उत्तर गंमतीत देत म्हणतो, ‘मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. ताजमहाल देखील बंधू शकतो.’ यावर बायको पुन्हा गंमतीनेच म्हणते मग बांधा ना…यावर हशा पिकतो आणि हा संवाद इथेच थांबतो. (Tajmahal)

मात्र हा संवाद झाल्यानंतर जर एखाद्या नवऱ्याने खरंच यावर विचार केला आणि बायकोचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा ध्यास घेतला तर? तुम्ही म्हणाल, काहीही काय असे कुठे असते का? पण विचार तर करून बघा. जर खरच एखाद्या नवऱ्याने आपल्या प्रिय बायकोसाठी ताजमहाल बांधला तर. तर काय….ती जगातली सर्वात नशीबवान आणि आनंदी बायको असेल. मात्र हे फक्त कल्पनेपुरतेच मर्यादित असते खऱ्या आयुष्यात असे काही होत नाही. मात्र हे शक्य झाले आहे….व्यावसायिक आनंद प्रकाश चौकसे यांनी चक्क त्यांच्या बायकोसाठी ताजमहाल बांधला आहे. अहो खरंच (Marathi News)

भारतातील आग्रा येथे असलेले ताजमहाल हे जगातील सात आश्चर्यांमध्ये सामील आहे. मुघल बादशाह शाहजहानने त्याची लाडकी पत्नी असलेल्या मुमताजच्या निधनानंतर तिच्या स्मरणार्थ याची उभारणी केली होती. पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडाने बांधलेला हा महल संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. दरवर्षी लाखो देश विदेशातील पर्यटक याला पाहण्यासाठी आग्र्याला येत असतात. प्रेमाचे सर्वात मोठे आणि जगप्रसिद्ध उदाहरण असलेल्या याच ताजमहालवरून प्रेरणा घेत मध्यप्रदेशातील व्यावसायिक असलेल्या आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांच्या बायकोसाठी हुबेहूब ताजमहालसारखे दिसणारे घर बांधले आहे. (Top Marathi News)

व्यावसायिक आनंद प्रकाश चौकसे यांनी अत्यंत बारकाईने त्यांच्या या ताजमहाल सारख्या दिसणाऱ्या घराची रचना केली आहे. हे घर बांधण्यापूर्वी आनंद यांनी खऱ्या ताजमहालचा पूर्ण आणि सखोल अभ्यास केला. या घराची सर्व मोजमापांची रचना ताजमहला सारखीच आहे. त्यांनी इथे फक्त एकच बदल केला आहे, ताजमहलचे मोजमाप मीटरमध्ये आहे, तर चौकसे यांनी ते फूटमध्ये घेतले आहे. बाकी संपूर्ण घर हे आपल्याला ताजमहालाची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. घराच्या आतील इंटीरियरही तितकंच भव्यदिव्य आहे. नक्षीदार खांब, भव्य घुमट, सुंदर कोरीव दरवाजे आणि प्रशस्त हॉल ही या घराची खास वैशिष्ट्ये आहेत. (Top Marathi NEws)

आनंद प्रकाश चौकसे यांनी या घराबद्दल सांगताना सांगितले की, ताजमहाल त्यांच्या पत्नीला समर्पित आहे. या घरात प्रवेश केल्यानंतर पांढऱ्या शुभ्र संगमरवर खडकावर केलेले नक्षीकाम आणि कोरीव आपले लक्ष वेधून घेते. गाहर्ट प्रवेश केल्यानंतर समोर दिसणारे दृश्य पाहून सर्वच आश्चर्यचकित होतील यात शंका नाही. या घरात प्रवेश करताच जमिनीवर एका म्हशीचे चित्र रेखाटण्यात आले आहे. या घराचे मालक आनंद प्रकाश चौकसे यांनी सांगितले की त्यांनी त्यांचे बालपण प्राण्यांमध्ये घालवले, म्हणून म्हशीचे हे चित्र त्यांना गर्विष्ठ न होण्याची आणि सतत जमिनीवर राहण्याची आठवण करून देते. (Marathi Trending News)

या घराच्या रचनेबद्दल आनंद प्रकाश चौकसे यांनी सांगितले की, घर थंड राहावे म्हणून आत आणि बाहेर अशा दोन भिंती बांधण्यात आल्या असून या भिंतींमध्ये २ फूट अंतर ठेवण्यात आले आहे. या घरात एकूण चार बेडरूम, एक किचन आणि एक हॉल आहे. मूळ ताजमहल जसा पांढऱ्या संगमरवरी दगडांमध्ये बांधलेला आहे, तशीच झळाळी या बंगल्यामध्येही दिसते. मात्र आजच्या काळात संपूर्ण इमारत संगमरवरात बांधणं खर्चिक आणि अव्यवहारी आहे. म्हणूनच या घरासाठी मकराना मार्बल वापरण्यात आला आहे. (Marathi Latest News)

==============

हे ही वाचा : ‘कॅम्लिन’ ब्रँड परदेशातील नव्हे चक्क भारतातील, वाचा Success Story

Mangala Bai Maravi : जंगलातून जगभरात पोहोचलेली टॅटू आर्टिस्टची प्रेरणादायी यशोगाथा

================

या ताजमहाल व्हर्जन २ असलेल्या घरात एक लायब्ररी आणि मेडिटेशन रूम देखील आहे. टेरेसवर गेल्यावर घराचा घुमट देखील दिसतो. संपूर्ण घर बांधण्यासाठी जितका वेळ लागला तितकाच वेळ केवळ या घराहचे ताजमहाल सारखे घुमट बांधण्यासाठी लागला असल्याचे या घराचे मालक असलेल्या आनंद यांनी सांगितले. हा 4BHK ‘ताजमहाल’ एका मोठ्या निवासी शाळेच्या आवारात बांधला गेला आहे. आनंद प्रकाश चौकसे हे एक सामाजिक कार्यकर्ते असून, शिक्षणाच्या कामात सतत व्यग्र असतात. आनंद यांनी सांगितले की, त्यांनी अभियांत्रिकी सोडली आहे तर त्यांच्या पत्नीने वैद्यकीय शिक्षण सोडले असून त्या आता समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांनी भारतातील सर्वात हाय-टेक गुरुकुल बांधले आहे. (Social Media Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.