ऋषिकेश, हे नाव ऐकलं तरी तमाम हिंदू धर्मियांचे हात जोडले जातात. हिंदू धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ऋषिकेशचे नाव घेतले जाते. ऋषिकेशला “योग सिटी ऑफ द वर्ल्ड” म्हणूनही ओळखले जाते. या शहराचे नाव भगवान विष्णूच्या नावावरुन पडले आहे. याच ऋषिकेशमध्ये अनेक पवित्र मंदिरे आहेत. भव्य आश्रम आहेत. त्यामुळे हे देवांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. या शहराची आत्तापर्यंत आणखी एक ओळख करुन देण्यात येत होती, ती म्हणजे, ऋषिकेश हे शाकाहारी आणि मद्यमुक्त शहर म्हणून सांगण्यात येत होते. मात्र आता ही ओळख पुसली जाण्याची चिन्हे आहेत. कारण यावर्षीच सनबर्न हा फेस्टिवल ऋषिकेशमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सनबर्न फेस्टिवल हा गाण्यांचा उत्सव असल्याचे सांगितले जात असले तरी त्यात मोठ्या प्रमाणात दारु आणि ड्रग्जचा व्यापार होतो हे जगजाहीर आहे. (Sunburn Festival In Rishikesh)
असा हा फेस्टिवल ऋषिकेशसारख्या पवित्र स्थळावर आयोजित करुन आणखी एक वाद उभा कऱण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. दरवर्षी गोव्यात होणारा सनबर्न फेस्टिवल यावर्षी ऋषिकेशमध्ये होणार असल्याची घोषणा झाली आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकींगची व्यवस्थाही जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या ऋषिकेशला शाकाहारी आणि मद्यमुक्त शहर म्हणण्यात येत होते, त्याच ऋषिकेशमध्ये होणा-या या सनबर्न फेस्टिवलसाठी कुठले मद्य मिळेल आणि त्याचा दर काय असेल याची सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात जाहीरातही करण्यात येत आहे. ऋषिकेशची ओळख ही देवभूमी अशी आहे. ऋषिकेशमध्ये अनेक आश्रम असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी करण्यात येतात. तसेच अनेक आश्रमातून भारताची देणगी असलेल्या योगाचे प्रशिक्षण देण्यात येते. (Social Updates)
ऋषिकेशमधील गंगा आरती पाहण्यासाठी देश विदेशातून भाविक येथे येतात. आता त्याच ऋषिकेशमध्ये सनबर्न फेस्टिवलसारखा कार्यक्रम होत आहे. 28 आणि 29 सप्टेंबर रोजी नीर गंगा रिसॉर्ट्समध्ये ‘सनबर्न रीलोड ऋषिकेश’ होत आहे. या फेस्टिवलमध्ये आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी होत आहेत. त्यात ज्युलिया ब्लिस आणि प्रो ब्रॉस यासारख्या आंतरराष्ट्रीय डीजेंचाही सहभाग आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु असून सोशल मिडियावर सनबर्न फेस्टिवलचे ब्रॅंडींग सुरु झाले आहे. यासाठी स्टुडंट पास ते व्हीआयपी पासचीही सुविधा आहे. यात सहभागी व्हायचे असले तर तिकीटांची रक्कम 1200 रुपयांपासून 90 हजार रुपयांपर्यंत आहे. हा सनबर्न फेस्टिवल सायंकाळी 5 वाजता सुरु होणार आहे. अर्थात तो रात्री उशीरापर्यंत किंवा अगदी पहाटेपर्यंत चालणारा फेस्टिवल आहे. (Sunburn Festival In Rishikesh)
या फेस्टिवलमध्ये सहभागी होणा-यांची तिकीटे जेवढी महाग असणार आहेत, तेवढ्याच त्यांना देण्यात येणा-या सुविधाही जास्त असणार आहेत. 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिकचे तिकीट खरेदी केल्यास देण्यात येणा-या सुविधांची यादी पाहिली की ऋषिकेशमधील नागरिकांचा संताप होणार आहे. या तिकीट धारकांना 2 बाटल्या प्रीमियम दारू, 4 बिअर आणि 4 रेडबुल यासाठी कॉकटेल टेबलवर बसण्यासाठी आरामदायक सुविधा देण्यात येणार आहे. या सनबर्न फेस्टिवलसाठी मोठे व्यासपिठ उभारण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी वयाचीही अट आहे. 3 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना प्रौढ व्यक्तीसह असणे आवश्यक करण्यात आले आहे. या फेस्टिवलच्या स्थळी पोहचण्यासाठी शटल सेवेची सुविधा करण्यात आली आहे. याशिवाय या फेस्टिवलच्या ठिकाणी कॅरी बॅग, हँडबॅग आणि इतर वस्तूंना परवानगी देण्यात आलेली नाही. शिवाय एकदा खरेदी केलेले तिकीट रद्द करण्यात येणार नाही, हेही आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Social Updates)
======
हे देखील वाचा : अलिगढचे लड्डूगोपाल
======
सनबर्न फेस्टिवल हा आत्तापर्यंत अनेक वादांचे मुळ ठरला आहे. काही वर्षापूर्वी हा फेस्टिवल महाराष्ट्रातील पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याला झालेल्या विरोधामुळे पुण्यातून हा फेस्टिवल गोव्यामध्ये करण्यात आला. संगीत आणि नृत्याचा महोत्सव अशी त्याची जाहीरात होत असली तरी या सर्वात मोठ्याप्रमाणात दारु आणि ड्रग्जचा व्यापार होत असल्याचे उघड झाले आहे. आता ऋषिकेशसारख्या पवित्र स्थळी होणा-या या फेस्टिवलमुळे नवा वाद उभा राहिला आहे. (Sunburn Festival In Rishikesh)
सई बने