Home » सुदान गृहयुद्ध आणि ऑपरेशन कावेरी…

सुदान गृहयुद्ध आणि ऑपरेशन कावेरी…

by Team Gajawaja
0 comment
Sudan Civil War
Share

आफ्रिकन देश सुदानमध्ये गेल्या 10 दिवसांपासून अक्षरशः नरसंहार सुरू आहे. सुदानमधील या गृहयुदधात सुदानी (Sudan Civil War) नागरिक मारले जात आहेतच मात्र तेथील अन्य देशांच्या नागरिकांनाही या युद्धाची झळ बसली आहे. सध्या 3000 हून अधिक भारतीय संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकले आहेत. यासोबत अन्य देशातील नागरिकही सुदानमधून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यात इंग्लडने आघाडी केली असून आता संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने सोमवारी ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे. या कारवाईबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी माहिती दिली असून सर्व भारतीयांना सुरक्षीतपणे सुदानबाहेर काढले जाईल, याची हमी दिली आहे. एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन कावेरी अंतर्गत 500 भारतीयांना सुदानच्या बंदराहून समुद्रमार्गातून भारतात आणण्यात येईल. भारतासोबतच इतर देशही सुदानमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जहाजांचा वापर करीत आहेत.  

सुदानमध्ये सध्या गृहयुद्ध (Sudan Civil War) सुरू आहे. सुदानचे लष्करप्रमुख अब्देल फताह अल-बुरहान आणि त्यांचे उपनियुक्त मोहम्मद हमदान डॅगलो यांच्या निष्ठावंत सैन्यांमध्ये लढाई तीव्र झाली आहे. परिस्थिती अशी आहे की, तिथे रस्त्यावर बंदूके घेऊन फिरणा-या सैनिकांची संख्या वाढली आहे.  तसेच त्यांच्यावर रोखधाम ठेवणारे कोणीही नाही. काही दिवसांपूर्वी गोळीबारात एका भारतीयाचाही मृत्यू झाला होता. देशाची स्थिती इतकी बिघडली आहे की, हवाई मार्ग बंद झाला आहे. अनेक विमानतळ आणि विमानांचे नुकसान झाले आहे. सुदानमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान मोदींनी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन  करुन सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.  त्याअंतर्गतच आता ऑपरेशन कावेरी सुरु करण्यात आले आहे. सुदानमधील भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी भारताने सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात भारतीय हवाई दलाची दोन C-130J विमाने तयार ठेवली आहेत. 15 एप्रिलपासून सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी-रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यात लढाई सुरु आहे.  वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, सुदानमधील या गृहयुद्धात (Sudan Civil War) आतापर्यंत 413 लोकांचा मृत्यू झाला आहे.  तर 3,551 लोक जखमी झाले आहेत.  राजधानी खार्तूममध्ये लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात झालेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक इमारती आणि वाहने उद्ध्वस्त झाली आहेत.

सुदानमध्ये सुमरा 4 हजार भारतीय अडकले आहेत. याशिवाय अन्य देशातील नागरिकांची संख्याही मोठी आहे. अमेरिका, ब्रिटनसह 9 देशांनी आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. फ्रान्सच्या हवाई दलाने पाच भारतीयांना बाहेर काढले आहे.  येथील इंटरनेट सेवा बंद असल्यानं या बचावकार्यात अडचणी येत आहेत. भारताव्यतिरिक्त अन्य देशही आपल्या नागरिकांच्या बचावासाठी पुढे आले आहेत.  त्यात फ्रान्स, नेदरलॅण्ड, जॉर्डन, जर्मनी, इटली, स्पेन, अर्जेंटिना, कोलंबिया, आयर्लंड, पोर्तुगाल, पोलंड, मेक्सिको आणि व्हेनेझुएला या देशांचाही समावेश आहे.  याशिवाय  कॅनडा, सौदी अरेबिया, पाकिस्तान, कुवेत, कतार, यूएई, इजिप्त, ट्युनिशिया, बल्गेरिया, बांगलादेश, फिलीपिन्स, कॅनडा, बुर्किना फासो यासह भारतातील नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. (Sudan Civil War)

दरम्यान अमेरिकेने आपल्या दूतावासातील 100 अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुदानबाहेर काढले असून सुदानमधील अमेरिकन दुतावास पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार,  सुदानमध्ये सर्वसामान्य जनतेचे अक्षरशः हाल सुरु आहेत.  लढाईमुळे देशात पाणी आणि वीज पुरवठा थांबला आहे. लोकांना खायला अन्नही उपलब्ध नाही. यामुळे सुमारे 20 हजार सुदानी नागरिकांनी देश सोडला आहे. यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. तर आणखी नागरिक सुदान सोडण्याच्या प्रयत्नात आहेत.  जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सुदानमध्ये लहान मुलांची अवस्था वाईट आहे. या गृहयुद्धाची त्यांनी मोठी झळ बसली आहे.  त्यातच हॉस्पिटलवरही हल्ले झाल्याने मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे युद्धातील जखमी सैनिकांवर आणि सामान्य नागरिकांवरही उपचार करणे कठिण झाले आहे.(Sudan Civil War)  

======

हे देखील वाचा : बेवारसी असलेला ‘हा’ एक हजार कोटींचा बंगला…

======

सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. 2019 मध्ये नागरिकांनी सुदानचे तत्कालीन अध्यक्ष ओमर अल-बशीर यांना सत्तेवरून हटवण्यासाठी निदर्शने केली. त्यानंतर सैन्याने सत्तापालट केला.  मात्र नागरिक लोकशाही शासन आणि सरकारमध्ये लोकांचे प्रतिनिधी असावे अशी मागणी करु लागले. यानंतर, सुदानमध्ये संयुक्त सरकार स्थापन करण्यात आले.  पण 2021 मध्ये पुन्हा सत्तापालट झाले आणि सुदानमध्ये लष्करी राजवट सुरू झाली. लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह अल-बुरहान देशाचे राष्ट्रपती आणि आरएसएफचे नेते मोहम्मद हमदान दगालो उपाध्यक्ष झाले. तेव्हापासून आरएसएफ आणि लष्कर यांच्यात संघर्ष सुरूच आहे.  नागरी राजवट लागू करण्याच्या करारावरून लष्कर आणि आरएसएफमध्ये वाद सुरु झाला आहे. आरएसएफला 10 वर्षांनंतर नागरी शासन लागू करायचे आहे, तर लष्कराचे म्हणणे आहे की ते 2 वर्षांच्या आत लागू केले जावे.  हा वाद इतका टोकाला गेला आहे की, सर्व सुदानमध्ये एक गृहयुद्धच सुरु झाले आहे.  त्यात सर्वसामान्य सुदानी नागरिक पार होरपळून गेला आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.