संपूर्ण सुदानला गृहयुद्धानं व्यापलं असतानाच यातून सर्व जगाला अधिक चिंतेत टाकणारी बातमी आली आहे. सुदानमधील काही सैनिकांच्या टोळ्यांनी व्हायरसने भरलेली लॅबच ताब्यात घेतली आहे. ही बातमी जेव्हा समोर आली, तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेनं काळजी व्यक्त केली. कोरोनापेक्षाही घातक अशा विषाणूंची (virus) लॅब सुदानमध्ये असेल याची माहितीही कोणाला नव्हती. मात्र सुदानमध्ये गृहयुद्ध सुरु झाल्यावर त्यासंदर्भातील बातमी समजली आणि आता ही विषाणू (virus) असलेली लॅब काही अतिरेकी संघटनांच्या ताब्यात असल्याची बातमी आली आहे. त्यामुळे अवघ्या जगावर पुन्हा एकदा विषाणू हल्याची छाया पसरली आहे.

सुदानमध्ये सैन्य आणि निमलष्करी दलांमध्ये संघर्ष सुरूच आहे. लष्कराचे जनरल अब्देल-फताह बुरहान आणि आरएसएफचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डगालो यांच्यात असलेल्या या लढतीचं स्वरुप आता गृहयुद्धात झालं आहे. त्यात अनेक गट पडले असून काही अतिरेकी संघटनाही येथे सक्रीय झाल्या आहेत. याच अतिरेकी संघटनांनी आता सुदानमधील प्रमुख मालमत्तांवर कब्जा करायला सुरुवात केली आहे. त्यात अनेक हॉस्पिटल आणि सरकारी वास्तूही आहेत. यातील एक म्हणजे तेथील सरकारी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत कोरोनापेक्षाही घातकी विषाणू संरक्षित केल्याची माहिती आहे. हे विषाणू (virus) काळजीपूर्वक हाताळले न गेल्यास त्यातून कोरोनासारखी महामारी पसरण्याचा धोका जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात माहिती दिली आहे. सुदानमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान सैनिकांनी सुदानची राजधानी खार्तूममध्ये, गोवर आणि कॉलरा सारख्या आजारांना कारणीभूत धोकादायक विषाणू असलेल्या प्रयोगशाळांचा ताबा घेतला आहे. या लॅबमध्ये पोलिओ, गोवर यासारख्या गंभीर आजारांचे नमुने आहेत. शिवाय आफ्रिका देशांमध्ये आढळून येणा-या काही गंभीर आजारांचे विषाणूही आहेत. प्रयोगशाळेचा ताबा घेतल्यानंतर छेडछाड झाल्यास संपूर्ण मानवतेला धोकादायक ठरणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. पोलिओ आणि गोवर सारख्या रोगांवर अनेक देशांनी मात केली आहे. आता पुन्हा नव्यानं हे रोग आले तर त्यांचे फैलाव रोखणे हे एक आव्हान असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्यातच या लॅबमध्ये जाण्यासाठी आणि तेथील घातकी विषाणू सुरक्षितपणे ठेवण्यासाठी कोणतेही साधन सध्यातरी उपलब्ध नसल्यानं चिंता अधिक वाढली आहे.
सध्या सुदानमधील परिस्थिती बिकट आहे. सत्तासंघर्षामुळे सुदान पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सुदानला लागून असलेल्या देशांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सध्या येथील रस्त्यावर मृतदेह पडल्याचे दृश्य आहे. हॉस्पिटलही बंद पडले असून सुदानी नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी शेजारील देशांमध्ये आश्रय घेत आहेत आणि ज्यांना हे शक्य नाही ते आपल्या घरात लपून बसले आहेत. परिस्थिती एवढी बिकट आहे की, अनेक घरातील अन्नपुरवठा संपला आहे. नागरिक उपाशी आहेत. मात्र बाहेर पडल्यास सैनिकांच्या गोळीला बळी पडावे लागेल या भीतीनं अनेक उपाशीपोटीच लपून बसले आहेत. या गृहयुद्धात 500 नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
=======
हे देखील वाचा : सुदान गृहयुद्ध आणि ऑपरेशन कावेरी…
=======
यासर्वात जगाला काळजी करायला लावणारी आणखी एक बातमी पाकिस्तानमधून आली आहे. ज्या मंकीपॉक्स या रोगाचा (virus) फैलाव अफ्रिकी देशांमध्ये मोठ्याप्रमाणात झाला आहे, त्याचे रुग्ण पाकिस्तानमध्येही आढळले आहेत. सौदी अरेबियातून आलेल्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली. फ्लाइटमध्ये त्याच्यासोबत बसलेल्या अन्य व्यक्तीमध्येही ही लक्षणे आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ही लक्षणे आढळलेले रावळपिंडी येथील असून त्यांची ओळख सध्यातरी लपवण्यात आली आहे. मंकीपॉक्सची पहिली केस आफ्रिकेत समोर आली होती. 14 सप्टेंबर 2022 रोजी जागतिक स्तरावर 103 देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवण्यात आली होती. मंकीपॉक्स विषाणू हा एक विषाणूजन्य रोग आहे जो ऑर्थोपॉक्स विषाणू वंशाच्या प्रजातीमुळे होतो. यामुळे त्वचेवर पुरळ येते आणि जखमा होतात. याशिवाय व्यक्तीला ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, कमी ऊर्जा, सूज येणे अशी लक्षणेही जाणवतात. आता पाकिस्तानमध्ये अशाप्रकारचे रुग्ण आढळल्यावर इतर देशांनीही विशेषतः भारतानेही याबाबत काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सई बने