कोरोनाचे उमगस्थान असलेल्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर चालू झाला आहे. अवघ्या जगाला या कोरोना नावाच्या चक्रव्यूहात अडकणाऱ्या या चीनला स्वतःची मात्र या रोगापासून मुक्तता करण्यात आली नाही. आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाचा कहर चालू असतांना या रोगाला समुळ नष्ट करण्यासाठी चीन सरकारनं शून्य कोविड पॉलिसी (Zero covid policy) स्विकारली आहे. मात्र याच धोरणामुळे चीनमध्ये अभूतपूर्व असे आंदोलन सुरु झाले आहे. चीनच्या शून्य कोविड धोरणा विरोधात अनेक मोठ्या शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. चीनमधील या कठोर कोविड नियंत्रण धोरणाविरोधानं त्रस्त झालेले नागरिक रस्त्यावर आले आहेत. शांघायसह अनेक शहरांमध्ये नागरिकांनी कोविड निर्बंधांविरोधात निदर्शने केली आहेत. नागरिकांनी ‘स्टेप डाउन सीसीपी’ आणि ‘स्टेप डाउन जिनपिंग’च्या घोषणा दिल्या. चीनमध्ये अशी निदर्शने फारच दुर्मिळ मानली जातात. कारण अन्य कुठल्याही देशात सरकारविरोधात आंदोलन झाली आहेत, मात्र चीनमध्ये प्रस्थापित सरकारविरोधात अशी व्यापक आंदोलने झाल्याची अद्यापही नोंद नाही. विशेष म्हणजे या आंदोलनानं जागतिक घडामोडीही तीव्र होत आहेत. या आंदोलनांचे वृत्तांकन करणा-या बीबीसीच्या एका पत्रकाराला अटक करण्यात आली आणि त्याला कोठडीत डांबण्यात आले. या दरम्यान पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच अमेरिकाही या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चीनमध्ये सरकारविरोधात चालू असलेलं आंदोलन दडपण्यासाठी पोलीस दलाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, याबाबत अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे.
चीनमध्ये वाढता कोविडचा प्रसार रोखण्यासाठी कठोर नियम लावण्यात आले आहेत. हेच नियम आता चीनच्या नागरिकांना नकोसे झाले आहेत. त्यामुळे आंदोलन सुरु झाले असून आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाविरुद्धचे हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे मोठे आंदोलन असल्याचे बोलले जाते. बीजिंग आणि शांघायसह 8 शहरांमध्ये निदर्शने पसरली आहेत. याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र सरकारनं शून्य कोविड धोरण(Zero covid policy) ठेवल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. शून्य कोविड धोरणा(Zero covid policy) अंतर्गत कोरोना बाधित रुग्णांना वेगळे ठेवण्यात येते. यासाठी चीनमध्ये मोठे कंटेनरवजा रुग्णालय बांधण्यात आले आहेत. एका छोट्याश्या कंटेनरमध्येच या रुग्णाला रहावे लागते. रोगापेक्षा ही व्यवस्थाच अपायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. जिथे कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. ते भाग पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. काही भाग चार-पाच महिन्यांपासून पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे त्या भागात अन्नधान्य आणि औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत.
=========
हे देखील वाचा : जमीन खरेदी करताना ‘या’ आकाराची असेल तर होईल लाभ
========
बंदिवासात असलेल्या नागरिकांनी याबाबत अनेकवेळा तक्रारी करुनही त्यांना अन्न आणि औषधाची व्यवस्था करण्यात आलेली नाही, त्यामुळेच आंदोलनाचा भडका उडाला आहे. शांघायच्या पूर्वेकडील महानगरात सुरू झालेली निदर्शने बीजिंगमध्येही पसरली आहेत. शांघायमधील उरुमकी येथे लॉकडाऊन दरम्यान अपार्टमेंटला लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू झाला. या इमारतीमधील नागरिकांनाही लॉकडाऊनच्या कडक नियमांमुळे मदत मिळाली नसल्याचा आरोप आहे. या घटनेमुळेही आंदोलन तीव्र झाले आहे. शेकडो निदर्शक आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु आहेत. सोशल मीडियावर निदर्शनांचे अनेक व्हिडिओही शेअर करण्यात आले आहेत. ज्यात आंदोलक हातात रिकामे फलक घेऊन निषेध करत आहेत. चीनमध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून असे सरकारविरोधातील व्हिडीओ पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला मोठा धक्का बसल्याचा अंदाज आहे.आंदोलकांना पोलीस जबरदस्तीनं पकडून बसमधून नेत आहेत.अशावेळी या बसचा आंदोलकांनी पाठलागही केला आहे. नागरिकांच्या या तीव्र भावना शून्य कोविड धोरणाविरोधात असून आम्हाला मुक्त करा असा त्यांचा नारा आहे. तसेच हे आंदोलक आता शी जिनपिंग यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करत आहेत.
दरम्यान चीनमधील या आंदोलकांवर होणा-या अत्याचारावर अमेरिका आणि इंग्लडनं चिंता व्यक्त केली आहे. ही आंदोलने एकीकडे चालू असली तरी चीनमध्ये कोरोना बाधितांची संख्या वेगानं वाढत आहे. एकट्या बीजिंगमध्ये सलग पाचव्या दिवशी कोरोना विषाणूचे सुमारे 4,000 रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची कोंडी झाली आहे.
सई बने