जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची ओळख काय, असा प्रश्न विचारला तर डोळ्यासमोर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे स्वातंत्र्याचे प्रतीक समोर उभे रहाते. जगातील उंच पुतळा म्हणून ओळखल्या जाणा-या या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला 139 वर्ष झाली आहेत. मात्र एवढ्या वर्षानंतर आता अमेरिका हे स्वातंत्र्याचे प्रतिक गमावणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा हा पुतळा अमेरिकेमध्ये तयार झालेला नाही, तर 1886 मध्ये फ्रान्सनं हा पुतळा अमेरिकेला भेट स्वरुपात दिला आहे. अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहारामधील मॅनहॅटन परिसरातील लिबर्टी बेटावर या पुतळ्याला उभारण्यात आले. त्यामध्येही फ्रान्समधील तंत्रज्ञानांचा समावेश होता. (Statue Of Liberty)
‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे’ लोकार्पण 28 ऑक्टोबर 1886 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांच्या हस्ते झाले. तेव्हापासून हा पुतळा अमेरिका आणि फ्रान्समधील मैत्रीचे प्रतीक झाला आहे. मात्र आता हाच पुतळा फ्रान्स परत मागण्याच्या तयारीत आहे. युरोपियन संसदेचे सदस्य आणि फ्रान्समधील डाव्या विचारसरणीच्या पक्षाचे सह-अध्यक्ष राफेल ग्लक्समन यांनी अमेरिकेला, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ आमचा असून आम्हाला तो परत करा असे आवाहन केले आहे. अमेरिका आणि फ्रान्समधील संबंध आता तणावाचे झाले आहेत, त्यामुळे अमेरिका आता या ऐतिहासिक वारशाच्या लायकीचा राहिलेला नाही, त्यांनी आम्हाला आम्ही दिलेली भेट परत करावी, असेही राफेल यांनी सांगितले आहे. त्यामुळे खरोखरच ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ फ्रान्स घेऊन जाणार का, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. (International News)
आत्तापर्यंत अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून ज्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची ओळख होती, तोच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वादात सापडला असून हा पुतळा अमेरिकेच्या बाहेर जाणार का, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये उभा असलेला हा ऐतिहासिक पुतळा 139 वर्षापूर्वी फ्रान्सने अमेरिकेला भेट दिला आहे. अमेरिका आणि फ्रान्समध्ये स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यात येतो, तसेच येथे समान लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे, त्यामुळे फ्रान्सनं ही ऐतिहासिक भेट अमेरिकेला दिली आहे. पण आता 139 वर्षानंतर या भेटीसाठी अमेरिका पात्र नसल्याची जाणीव फ्रान्सला झाली असून फ्रान्सने हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी परत मागितला आहे. युरोपियन संसदेचे सदस्य आणि फ्रान्सच्या डाव्या पक्षाचे सह-अध्यक्ष राफेल ग्लक्समन यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पुतळा परत मागितला आहे. त्यांच्या मते सध्याची अमेरिका ही हुकूमशाही वृत्तीची झाली आहे. त्यामुळे आता या देशात स्वातंत्र्यांच्या देवतेला जागा नाही. राफेल यांनी केलेल्या या मागणीला त्यांच्या समर्थकांनी पाठिंबा दिला असून तिथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला परत आणण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. (Statue Of Liberty)
अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या सांस्कृतिक युनिट युनेस्कोने स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही अमेरिकेची मालमत्ता असून आता यावर कोणीही दावा ठोकू शकणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या पुतळ्याची मागणी करणा-या ग्लक्समनला फ्रेंच सरकारकडूनही पाठिंबा मिळालेला नाही. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मित्रत्वाचे संबंध आहेत. ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क वाढ धोरणाला त्यांनी विरोध केला आहे. मात्र ट्रम्प यांच्यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. शिवाय ग्लक्समन यांच्या मागणीवरही कोणतेही भाष्य केले नाही. अमेरिकेनंही ग्लक्समन यांची मागणी फेटाळून लावली आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा अमेरिकेचा वारसा आहे आणि तो परत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगून ग्लक्समन यांचा दावा हास्यास्पद असल्याचे सांगितले आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा इतिहास जाणण्यासारखा आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्धापनदिनानिमित्त फ्रान्सने हा पुतळा अमेरिकेला भेट दिला. (International News)
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
1871 मध्ये, एका फ्रेंच गटाने फ्रान्समधील स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांच्या समर्थनार्थ अमेरिकेला एक पुतळा भेट देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर त्यावर काम सुरु झाले. 350 तुकड्यांमध्ये हा पुतळा अमेरिकेत पाठवण्यात आला. त्यासोबत या पुतळ्याची निर्मिती करणारे इंजिनिअर आणि अन्य कलाकार होते. त्यांनीच न्यू यॉर्क येथे हा पुतळा प्रस्थापित केला. त्यानंतर अमेरिकेनं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला शोभेल असा परिसर विकसीत केला. या पुतळ्याकडे “स्वातंत्र्य, न्याय आणि लोकशाहीचे आंतरराष्ट्रीय प्रतीक” म्हणून पाहिले जात असे. या पुतळ्यावर 4 जुलै 1776 ही अमेरिकन स्वातंत्र्याची तारीख लिहिलेली आहे. या पुतळ्याच्या डोक्यावर जाण्यासाठी आतून पायऱ्या आहेत. पर्यटक 354 पायऱ्या चढून तिथे पोहोचू शकतात. दरवर्षी लाखो पर्यटक या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला बघण्यासाठी न्यू यॉर्क शहरात येतात. याच स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला फ्रान्समधील एका गटानं परत मागितल्यानं अमेरिकन जनतेनं नाराजी व्यक्त केली आहे. (Statue Of Liberty)
सई बने