Home » एसटी संपाचे वादळ पवारांच्या घरात

एसटी संपाचे वादळ पवारांच्या घरात

by Team Gajawaja
0 comment
Share

संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार श्री शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या घरावर चप्पलफेक तसेच दगडफेकही केली. (ST Strike)

खा. सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना वारंवार हात जोडून विनंती करूनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत दिसले नाहीत. पोलिसांनी नंतर या कर्मचाऱ्यांना अटकाव करून त्यांना रोखले नसते तर, या कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या घरात घुसुन आणखी ‘राडा’ केला असता. (ST Strike)

या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले नसते तरच नवल होते. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांची ‘वकिली’ करणारे गुणवंत सदावर्ते यांना रात्री लगेच अटक करण्यात आली. त्यावरूनही ‘वादळ’ उठले असून सत्तारूढ आघाडी आणि विरोधी भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीची देवाणघेवाण सुरु झाली आहे.

सध्या महाराष्ट्रात कोणत्याही गोष्टीचे लगेच ‘राजकारण’ केले जाते आणि महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते एकमेकांवर तुटून पडतात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील जनता दररोज याचा अनुभव घेत आहे. (ST Strike)

वास्तविक आदल्याच दिवशी म्हणजे गुरूवारी उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाखेरीज इतर सर्व मागण्या मान्य करून तसे राज्यसरकारला आदेश दिले होते आणि राज्यसरकारनेही न्यायालयाचा आदेश स्वीकारून त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते.

msrtc: Striking MSRTC employees protest outside Sharad Pawar's home in  Mumbai, blame him for their plight - The Economic Times

====

हे देखील वाचा: नवी राजकीय खळबळ: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रात सक्रिय, वाढेल का ठाकरे सरकारचा त्रास?

====

न्यायालयाच्या या निर्णयावर एसटी कर्मचाऱ्यांनी ‘जल्लोषही केला होता. असे असताना शरद पवार यांच्या घरांवर दुसऱ्या दिवशी मोर्चा काढून हिंसक प्रकार घडवून खळबळ माजविण्याचे षडयंत्र कोणाचे होते आणि त्यामागचा ‘मास्टरमाइंड’ कोण होता याचे गूढ अद्याप कायम आहे. (ST Strike)

पोलीस त्यादृष्टीने तपास करतीलच मात्र हा मोर्चा आधी जाहीर झाला असतानाही पवारांच्या घरावरील हल्ला रोखण्यास पोलीस यंत्रणा कमी पडली हेही तेवढंच खरं आहे.

या घटनेमुळे गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप समाप्त होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण पवारांच्या घरावरील हल्ल्याचे निमित्त साधून पोलिसांनी आंदोलनकारी एसटी कर्मचाऱ्यांचे नेते गुणवंत सदावर्ते यांना तातडीने अटक तर केलीच, शिवाय गेल्या काही महिन्यापासून आझाद मैदानावर ठाण मांडून बसलेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनाही तेथून हुसकावून काढले. आता या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आश्रय घेतला आहे. परंतु तेथेही त्यांना फार काळ राहता येणार नाही अशी परिस्थिती दिसते.

वास्तविक एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्याचे यापूर्वीही राज्यसरकारकडून बरेच प्रयत्न झाले. मात्र त्यामध्ये सरकारला सपशेल अपयश आले. संपकरी नेत्यांचा आडमुठेपणाही त्याला कारणीभूत होता. एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम होते.

या दरम्यान काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्याही केल्या. त्यामुळे संप चिघळण्यास मदत झाली आणि संप ताणला गेला. सुरुवातीला सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या भाजप नेत्यांनाही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र त्यांनी नंतर माघार घेतल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील गुणवंत सदावर्ते यांनीच आपण या आंदोलनाचे तारणहार आहोत, असे दाखवून आंदोलनाची सूत्रे हाती घेतली आणि या आंदोलनाच्या निमित्ताने आपली ‘नेता’गिरीची हौस भागवून घेत उठसुठ बेलगाम विधाने करून संप चिघळविण्याचे महत्कार्य केले.

सदावर्ते वकील असूनही आणि उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत (विलीनीकरणाचा मुद्दा वगळता) अनुकूल निर्णय देऊनही ते संप मिटविण्याची भाषा करीत नाहीत याचा अर्थच त्यांचा बोलविता धनी वेगळाच कोणीतरी असावा अशी शंका येते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा खरा वाली कोण? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यासंदर्भात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चुकीच्या नेतृत्वाकडून केले जात आहे, अशी शरद पवार यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी वाटते. (ST Strike)

Transport workers protest outside Sharad Pawar's residence, over 100 taken  into custody | Mumbai news - Hindustan Times

====

हे देखील वाचा: सरकारचे ‘अच्छे दिन’चे आश्वासन म्हणजे ‘एप्रिल फूल’ – संजय राऊत

====

राज्याच्या ग्रामीण भागात एसटी ही जीवनवाहिनी समजली जाते. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून चालू असलेल्या एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागातील शाळकरी मुले तसेच सर्वसामान्य प्रवासी यांचे अतोनात हाल होत आहेत याचा मात्र सर्वांनाच विसर पडलेला दिसून येत आहे. (ST Strike)

एसटी संपाचे वादळ आता खुद्द पवारांच्या घरातच शिरल्यामुळे हा संप चिघळण्यास आणखी मदत झाली आहे. त्यामुळे आता कोणताही मुद्दा प्रतिष्ठेचा न करता सर्व बाजूने सारासार विचार करूनच एसटीचा संप मिटविण्यासाठी या प्रश्नावर तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यातच राज्यातील जनतेचे हित आहे.

  • श्रीकांत नारायण
    (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.