विशाखापट्टणममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांनी आंध्रप्रदेशमधील पुरातन सिंहनचलम मंदिराला भेट दिली. भगवान विष्णूचा रुद्र अवतार असलेल्या भगवान नरसिंह देव यांची सिंहचलम मंदिरात पूजा केली जाते. हे प्राचीन मंदिर लक्ष्मी नरसिंहाला समर्पित असून दक्षिण भारतातील मुख्य तीर्थस्थळांपैकी एक आहे. या मंदिराचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, भगवान नरसिंहाच्या मूर्तीला होणारा चंदनलेप. या मंदिरातील भगवान नरसिंहाची मूर्ती वर्षातून फक्त एकदाच दर्शनासाठी खुली करण्यात येते. वर्षातील उर्वरित दिवस या मूर्तीवर चंदनाचा लेप लावला जातो. या परंपरेमागे एक कथा सांगण्यात आली आहे. अशा मंदिराला विराट कोहली यांनी भेट दिल्यावर मंदिराबाबत अधिक जाणण्यासाठी सोशल मिडियावर मंदिराबाबत अधिकाधिक माहिती जाणून घेण्यात येत आहे. (Simhachalam Temple)

सिंहचलम श्री वराह लक्ष्मी नरसिंह मंदिर, हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरातील समुद्रसपाटीपासून ३०० मीटर उंचीवर असलेल्या सिंहचलम पर्वतरांगांवर आहे. भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या या मंदिरामध्ये वराह नरसिंह रुपात पूजा केली जाते. याबाबत सांगितलेल्या आख्यायिकेनुसार भगवान विष्णू यांनी आपला परम भक्त प्रल्हाद याला त्याचे वडील हिरण्यकश्यपू यांच्यापासून वाचवल्यानंतर सिंहाचे डोके आणि मानवी शरीर याच रुपात दर्शन दिले. त्याच रुपात या सिंहचलम मंदिरात मंदिरात भगवान विष्णुची पूजा होते. मंदिरात अक्षय तृतीया वगळता, वराह नरसिंहाची मूर्ती वर्षभर चंदनाच्या लेपानं झाकून ठेवण्यात येते. (Social News)
याबाबतही स्थानिक आख्यायिका सांगतात. वर्षभर मूर्ती चंदनाच्या लेपनाच्या जाड थराने झाकलेली असल्यामुळे मूर्तीला गुळगुळीत, शिवलिंगासारखे स्वरूप मिळते. वर्षातून फक्त एकदाच, चांदनोत्सवाच्या दिवशी, चंदनाच्या लाकडाचा हा थर काढून टाकला जातो. त्या दिवशी, भाविकांना भगवानांचे भयंकर नरसिंह रूप पाहता येते. हा सोहळा पाहण्यासाठी आणि भगवान विष्णुचे रुप डोळ्यात साठवण्यासाठी जगभरातील भगवान विष्णुचे भाविक या मंदिरात गर्दी करतात. या सोहळ्याची तयारी महिनाभर होते. यासाठी संपूर्ण मंदिर आणि परिसर सजवला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी हा सोहळा होतो. त्याला ‘चंदनोत्सव’ म्हणून ओळखले जाते. या दिवशी, भक्तांना वर्षातील भगवानांच्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन दिले जाते. त्यानंतर नवीन चंदनाचा लेप भगवानाच्या मूर्तीवर लावला जातो. असे मानले जाते की, हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर भगवान नरसिंहांचे उग्र रुप पाहून सर्वांनाच भीती वाटली. (Simhachalam Temple)
भगवान नरसिंहाचे हे उग्र रुप शांत करण्यासाठी आणि त्यांच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी मग त्यांना चंदनाचा लेप लावण्यात आला. तेव्हापासून ही चंदनाचा लेप लावण्याची परंपरा सुरु झाली. भगवान नरसिंहावरुन चंदनाचा लेप जेव्हा काढून टाकला जातो, तेव्हा त्या रुपाला ‘निजारूप दर्शन’ म्हणतात. या संपूर्ण मंदिराची रचनाही वैशिष्टपूर्ण आहे. कलिंगन वास्तुकला शैलीत मंदिर उभारण्यात आले आहे. पूर्व गंगा राजवंशाचे राजा नरसिंह देव प्रथम यांनी १३ व्या शतकात हे मंदिर बांधले. १२६८ मध्ये त्यांचा मुलगा भानुदेव प्रथम याने मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदिर सिंहचलम नावाच्या टेकडीवर बांधलेले आहे. मंदिराच्या भोवती मोठी वृक्षसंपदा आहे. त्यामुळे या सर्व भागात कायम गारवा आणि शांतता असते. “सिंहचलम” नावाचा अर्थ “सिंहांचा टेकडी” असा आहे. (Social News)

हे मंदिर भारतातील वैष्णव मंदिरांपैकी एक प्रमुख मंदिर असल्यामुळे देशभरातील भाविक येथे भेट देण्यासाठी येतात. सिंहचलम मंदिरात दर्शनाच्या वेळा सामान्यतः दोन भागात विभागण्यात आल्या आहेत. मंदिरात भाविकांना भगवान नरसिंहाचे दर्शन सकाळी सात ते साडेअकराच्या दरम्यान देण्यात येते. त्यानंतर मंदिर बंद होते, आणि दुपारी तीन ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पुन्हा मंदिर भाविकांसाठी खुले होते. अलिकडे या मंदिरात जाण्यापूर्वी ऑनलाईन बुकींग करण्याची सोय करण्यात आली आहे. १९४९ पासून हे मंदिर राज्य सरकारच्या देणगी मंत्रालयाच्या अखत्यारीत आले आहे. विजयनगरमच्या रियासत राज्यातील पुष्पती गजपती कुटुंबातील सदस्य मंदिराचे सध्याचे वंशपरंपरागत विश्वस्त आहेत. या कुटुंबातील सदस्य गेल्या तीन शतकांपासून मंदिराची सेवा करत आहेत. (Simhachalam Temple)
========
हे देखील वाचा : Thailand VS Cambodia : शिवमंदिरावरुन पुन्हा या दोन देशात संघर्ष !
========
या मंदिराच्या वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी मंदिराला भेट देतात. मंदिराच्या कल्याण मंडपातील शिल्पे आणि खांबांचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले आहे की, या मंदिराच्या बांधकामात बेसाल्ट आणि शिस्टचा वापर करण्यात आला होता. मंदिराच्या देवतेसह नरसिंहाच्या बत्तीस मूर्ती, कल्याण मंडपाच्या खांबांवर कोरलेल्या आहेत. मुख मंडपात कप्पम स्तंभम नावाचा एक खांब आहे ज्याला उपचारात्मक शक्ती असल्याचे मानले जाते. याच पवित्र खांबाला विराट कोहली नमन करत असलेला व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. (Social News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
