Home » Donald Trump : अमेरिकेत का लागू झालेय शटडाऊन !

Donald Trump : अमेरिकेत का लागू झालेय शटडाऊन !

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

अमेरिकेत सरकारी शटडाऊन सुरु झालं आहे. यामुळे तेथील सरकारी कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांना सिनेटमध्ये निधी विधेयक मंजूर करण्यात अपयश आल्यानं हा शटडाऊन सुरु झाला आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळातला हा तिसरा सरकारी शटडाऊन आहे. सिनेटने निधी विधेयक नाकारल्यानंतर अमेरिकेत सरकारी शटडाऊन लागू करण्यात आला आहे. याचा फटका हजारो संघीय कर्मचा-यांना बसणार असून हे कर्मचारी पगारापासून वंचित रहाणार आहेत. शिवाय येथील अनेक आवश्यक सेवाही विस्कळीत होणार आहेत. त्यामध्ये आरोग्यसेवेचाही समावेश आहे. या शटडाऊनमुळे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट सदस्य एकमेकांवर दोषारोप करत असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमर्जीपणाचे हे आणखी एक उदाहरण जगासमोर आले आहे. (Donald Trump)

अमेरिकेत एक मोठे संकट निर्माण झाले आहे. अमेरिकेत सरकारी शटडाऊन लागू झाला आहे. सिनेटमध्ये सरकारी खर्चासाठी आवश्यक निधी विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे ही वेळ आली आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन प्रस्तावित बिग ब्युटीफुल विधेयकातील मेडिकेड कपात हा वादाचा मुद्दा ठरला आणि विधेयक नामंजूर झाले. अमेरिकेत सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरी स्वभावानुसार सर्व कारभार चालू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्ट आहे की, आरोग्य योजना या निधी विधेयकातून वगळल्या पाहिजेत. मात्र डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य, आरोग्य विम्यावरील कर सूट वाढवल्याशिवाय ते विधेयक मंजूर करणार नाहीत, या अटीवर ठाम राहिले. जर हा लाभ काढून टाकला गेला तर लाखो लोकांसाठी उपचार आणि औषधे अधिक महाग होतील. यामुळे गरीब कुटुंबांसाठी अडचणी निर्माण होतील, अशी डेमोक्रॅटिक पक्षानी भूमिका स्पष्ट केली. मात्र हा संघर्ष तीव्र झाला आणि सरकारी कामकाज बंद पडले. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या दोन्ही अध्यक्षीय कार्यकाळातील हे तिसरे शटडाऊन आहे. (International News)

अमेरिकेच्या संघीय सरकारला 7 वर्षांनंतर पुन्हा शटडाऊनचा सामना करावा लागणार आहे. यामुळे 900000 कर्मचाऱ्यांना रजेवर जाण्यास भाग पाडले जाण्याचा धोकाही वाढला आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील पहिले शटडाऊन 22 डिसेंबर 2018 ते 25 जानेवारी 2019 पर्यंत होते. हे शटडाऊन 35 दिवसांचे होते. त्यावेळी ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी काँग्रेसकडून 5.7 अब्ज डॉलर्सची मागणी केली होती. परंतु डेमोक्रॅट्सनी ती मंजूर करण्यास नकार दिला, आणि सरकारी शटडाऊन लागू झाले. दुसरे शटडाऊन 14 फेब्रुवारी 2019 रोजी झाले आणि सुमारे तीन दिवस चालले. (Donald Trump)

आता हे तिसरे शटडाऊन ट्रम्प किती दिवस चालू ठेवतात याकडे लक्ष आहे. शटडाऊन म्हणजे काय आणि त्याचा अमेरिकेच्या सरकारी कामकाजावर कसा परिणाम होतो, हे जाणून घेऊयात. 1 ऑक्टोबर ही तारीख अमेरिकेच्या आर्थिक वर्षाची किंवा खर्चाच्या वर्षाची सुरुवात आहे. हे सरकारचे आर्थिक वर्ष असते, यात सरकार आपले पैसे खर्च करण्याची आणि बजेट तयार करण्याची योजना आखते. या काळात, सरकार कुठे गुंतवणूक करायची हे निश्चित करते. म्हणून, जर या तारखेपर्यंत नवीन बजेट मंजूर झाले नाही, तर सरकारी कामकाज थांबते आणि शटडाऊन लागू केला जातो. अमेरिकन संसद सरकारी खर्चासाठी बजेट किंवा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी ठरते, तेव्हा अनेक सरकारी विभागांचे कामकाज थांबते. हजारो संघीय कर्मचाऱ्यांना वेतनाशिवाय रजेवर पाठवले जाते. त्याचा अनेक सरकारी सेवांवर परिणाम होतो. फक्त राष्ट्रीय सुरक्षा संबधित कामकाज सुरू रहाते. त्यात सैन्य, हवाई वाहतूक नियंत्रण, सीमा सुरक्षा आणि पेन्शन पेमेंट यांचा समावेश असतो. मात्र या कामांमध्ये गुंतलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना पगाराशिवायही काम करावे लागू शकते. (International News)

=======

हे देखील वाचा :

Donald Trump : नोबेल शांतता पुरस्कारासाठी तब्बल 338 दावेदार !

=======

मुख्यतः पासपोर्ट आणि व्हिसाशी संबंधित अनेक सरकारी प्रक्रिया यामुळे थांबवल्या जातात. त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसतो. आता अमेरिकेत शटडाऊन चालू झाल्यावर हे शटडाऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी जाणूनबुजून केल्याची चर्चाही सुरु झाली आहे. कारण यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांना काढून टाकण्यात येणार आहे. ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून अशीच धमकी देत होते. यात कृषी विभागातील जवळपास अर्ध्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. तर शिक्षण विभागातील सुमारे 87% कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या कामकाजावरही या सरकारी शटडाऊनचा परिणाम होणार आहे. हा सरकारी शटडाऊन किती दिवस चालणार यावरही त्याची तीव्रता अवलंबून असते. त्यामुळे आता ट्रम्प याबाबत काय निर्णय घेणार याकडे अमेरिकेच्या सरकारी सेवेतील हजारो कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे. (Donald Trump)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.