Home » अत्यंत अवघड अशी श्रीखंड महादेव यात्रा

अत्यंत अवघड अशी श्रीखंड महादेव यात्रा

by Team Gajawaja
0 comment
Shrikhand Mahadev Yatra
Share

बाबा बर्फानी म्हणजेच अमरनाथ यात्रा चालू झाली आहे. त्यासाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना झाली आहे. देशभरातून अमरनाथ यात्रेला जाणा-या भाविकांची गर्दी जम्मू येथे झाली आहे. त्या भाविकांची पहिली तुकडी पवित्र गुहेकडे रवाना झाली. सतत होणारा तुफान पाऊस आणि पर्वतांची धूप यामुळे ही अमरनाथ यात्रा अत्यंत कठीण मानली जाते. मात्र शिवभक्तांची ही परीक्षा पाहणारी एकच यात्रा नसून यापेक्षा आणखी एक यात्रा कठीण मानली जाते. ती म्हणजे, श्रीखंड महादेव यात्रा. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यापासून सुरु होणारी ही श्रीखंड महादेवाची यात्रा अतिशय कठीण आहे. जवळपास 18 हजार फुटावर असणा-या या नैसर्गिक शिवलिंगाला बघण्यासाठी महादेवाचे लाखो भक्त उत्सुक असतात. पण त्यातील काही मोजक्या भक्तांनाच या यात्रेला जाता येते आणि त्यातीलही काही निवडक भक्तांना या श्रीखंड महादेवाचे दर्शन घेता येते. कारण या यात्रेत निसर्गाचे रौद्र रुप भक्तांची परीक्षा घेत असते, यात जे यशस्वी होतात. त्यांना श्रीखंड महादेवाचे दर्शन घेता येते.(Shrikhand Mahadev Yatra) 

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथे असणारे श्रीखंड महादेवाचे स्थान हे सर्वोच्च स्थानावर आहे. 18 हजार फूट उंची वर असलेल्या या पवित्र स्थानावर जाण्यासाठी सुमारे 32 किमी अंतर पायी चालावे लागते. हा संपूर्ण मार्ग अतिशय खडतर आहे. त्यामुळेच बाबा अमरनाथ यात्रेपेक्षा श्रीखंड महादेव यात्रा कठीण असल्याचे सांगण्यात येते. यावर्षी 7 ते 20 जुलै दरम्यान श्रीखंड महादेवाची यात्रा होणार आहे. यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कुल्लू येथील अनी के जाओ येथे बेस कॅम्प उभारण्यात आला आहे. यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. (Shrikhand Mahadev Yatra)

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील अनी येथून श्रीखंड महादेव धार्मिक यात्रेसाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. जुना आखाडा, हरिद्वार, काशी, बरेली, यमुनानगर येथील अनेक ऋषी-संत दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीखंड महादेव कैलासला भेट देतात. त्यामुळे प्रशासनानं तयारी सुरु केली आहे. श्रीखंड महादेवाचे दर्शन घेण्यासाठी 32 किलोमिटरची अवघड वाट पार करावी लागते. या दरम्यान निसर्गाची अनेक रुपं बघता येतात. ऑक्सीजनची कमतरता जाणवते. हिमनदी पार करावी लागते. अवघड वाटेमुळे अमरनाथ यात्रेप्रमाणे या यात्रेत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत नाहीत. कारण या मार्गात तंबू उभारण्याचीही सोय नाही. हा संपूर्ण मार्ग बर्फानं व्यापलेला असतो. या प्रवासासाठी भाविकांना पाच ते सहा दिवस लागतात. श्रीखंड महादेव यात्रेदरम्यान सिंहगड, थाचडू, नयन सरोवर, भीमद्वारी, पार्वतीबाग ही  ठिकाणे पार केल्यानंतर श्रीखंड महादेवाचे दर्शन होते. मात्र ही यात्रा सुरु करण्यापूर्वी भाविकांची आरोग्य विभागाकडून वैद्यकीय तपासणी केली जाते. यात आरोग्यविभागानं होकार दिला तरच भाविकांना यात्रेसाठी जाण्याची परवानगी देण्यात येते. (Shrikhand Mahadev Yatra) 

==========

हे देखील वाचा : Hotel आणि Motel मध्ये ‘हा’ आहे फरक

==========

श्रीखंड महादेव यात्रेसाठी (Shrikhand Mahadev Yatra) दरवर्षी हजारो भाविक येतात. त्यातील अनेकजणांना वैद्यकीय परवानगी मिळते. मात्र प्रत्यक्ष यात्रा सुरु झाल्यावर काही भाविकांची प्रकृती ढासळू लागते. काहींना श्वासोच्छवासाचा त्रास, डोकेदुखी, उलट्या होणे, अंधुक दिसणे अशा समस्या येतात. अशा भाविकांना पुन्हा बेस कॅम्पवर आणण्यात येते. दरवर्षी या यात्रेसाठी अनेक धार्मिक आणि  सामाजिक संस्थांकडून भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येते. श्रीखंड यात्रा ट्रस्टतर्फे या सर्व मार्गाची आधीपासून पाहणी करण्यात येते. 18 वर्षांखालील आणि 60 वर्षांवरील भाविकांनी या यात्रेसाठी येतांना आधीही वैद्यकीय तपासणी करावी असे आवाहन करण्यात येते. या यात्रेसाठी भाविकांनी नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणी शुल्क 250 रुपये आहे. 18 हजार फुट उंचीवर असलेल्या श्रीखंड महादेवाचे स्थान हे अत्यंत नयनरम्य असे आहे.  सभोवताली सर्वत्र पांढ-या शुभ्र बर्फाची चादर आणि त्यात उभी असलेली श्रीखंड महादेवाची भव्य शिळा, हे रुप बघण्यासाठी शिवभक्तांची गर्दी असते. पण हा मार्ग पहाता मोजक्याच भक्तांना भगवान शिवाचे हे भव्य रुप पाहता येते. पौराणिक कथेनुसार पांडवांनी येथे वास्तव्य केले होते.  भीमानं येथे मोठे दगड बसवले होते. भाविक आजही या मोठ्या शिळा येथे पाहू शकतात. माता पार्वतीच्या अश्रूंनी येथे नयन सरोवर तयार झाले आहे. येत्या सात जुलैपासून ही यात्रा सुरु होत आहे. निसर्गाच्या उग्र रुपावर मात करत भाविक श्रीखंड महादेवापुढे नतमस्तक होणार आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.