सप्तश्रुंगीला या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या शक्तीपिठाचा मान मिळाला आहे. येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही हे एकच रूप आहे, असे मानले जाते.
या पृथ्वीवर जगदंबेची वेगवेगळी रूपे आहेत. त्यापैकी सप्तशृंगीदेवीचे (Saptashrungi) रूप या तीन देवींचे एक रूप आहे.
सप्तश्रृंगीची अख्यायिका
एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे.
दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचा उल्लेख पौराणिक ग्रंथात आहे. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय.
नाथ संप्रदाय मध्ये नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन असे आहे की दत्त गुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानक पणे महादेव यांना कळत की कोणी तरी तपश्चर्या करत आहे ते बघण्या करिता ते दत्तगुरूंना पाठवतात व दत्तगुरु त्यांना घेऊन महादेव कडे येतात आणि महादेव व दत्तगुरु म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तश्रृंगी देवी पूर्ण करेल. ”शाबरी विद्या” ची खरी सुरुवात सप्तश्रृंगी गडावरून होते.
भौगोलिक वैशिष्टय
येथील निसर्गाचे रूप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. या उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येथे सात उंच शिखरे आहेत, त्यावरूनच या ठिकाणाचे नाव सप्तशृंगी गड पडले आहे. सप्तशृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचीवरील सप्तशृंगगडावर वसलेली आहे.
पुजा व उत्सव
पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात.
कसे पोहोचाल
गडावर जाण्यासाठी बसगाड्या नाशिकचे जुने मध्यवर्ती बस स्थानक येथून व दिंडोरी नाका येथून मिळतात. उत्सव काळात जास्तीच्या एस. टी. बसेसची सोय करण्यात आलेली असते. गडावर जाण्यासाठी फेनिक्युलर बस आहे.
शब्दांकन – शामल भंडारे.
हे देखील वाचा: रेणुकादेवी – माहूर
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.