सणांचा राजा म्हणून श्रावण महिन्याला ओळखले जाते. श्रावण सुरु झाला की एकामागोमाग एक सणाची जणू मालिकाच लागते. या महिन्यात प्रत्येक दिवस एक सणच असतो आणि तो तसाच साजरा देखील केला जातो. श्रावण महिना म्हटले की, लगेच आपल्या डोक्यात येतो तो श्रावणी सोमवार. श्रावण महिना लागला की श्रावणी सोमवारांना सुरुवात होते. या महिन्यातले सोमवार खूपच महत्वाचे आणि फलदायी, लाभदायी असतात.
संपूर्ण श्रावणात भगवान शंकराची पूजा तर केलीच जाते, मात्र सोमवारी या पूजेला जरा जास्तच महत्व असते. चला तर जाणून घेऊया या पूजेच्या महत्वाबद्दल आणि सोमवारी शंकराला वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीबद्दल.
यावर्षीचा श्रावण आणि त्याचे महत्व हे जरा जास्तच आहे. त्याचे कारणही अतिशय खास, विशेष आहे. यावर्षीच्या श्रावणाची सुरुवात ही सोमवारपासून झाली आहे. हा एक शुभ संकेत मानला जात आहे. भगवान शंकराचा वार हा सोमवार असतो आणि योगायोगाने श्रावणाचा पहिला दिवस हा सोमवारीच आहे. मुख्य म्हणजे या वर्षी श्रावणाची समाप्तीही सोमवारीच होणार आहे. यंदाच्या श्रावणात पाच सोमवार आले असून, या ५ सोमवारांचा योगायोग बऱ्याच वर्षांनी आला आहे.
श्रावण हा भगवान शंकराचा महिना समजला जातो. या संपूर्ण महिन्यात शंकराची आराधना केली जाते. अनेकजण यादरम्यान व्रतं उपवास करतात. या महिन्यात केलेले उपवास, व्रतं, शंकराची पूजा ही नक्कीच भगवान शंकरांपर्यंत पोहचते आणि आपले इच्छित पूर्ण होते अशी मान्यता आहे. त्यामुळेच हा महिना हिंदू धर्मात अतिशय महत्वाचा मानला जातो.
श्रावणी सोमवारची पूजा करताना सर्वप्रथम शुचिर्भूत होऊन स्वच्छ कपडे परिधान करावे. जिथे पूजा करायची आहे तिथे किंवा शंकराच्या मंदिरात जाऊन आधी भगवान शंकराला नमस्कार करत पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र, आघाडा, पांढरे फुल आणि सर्व पूजेचे साहित्य अर्पण करावे. नंतर दिवा, अगरबत्ती आणि कापूर लावून देवाची आरती करावी. शांत मनाने हात जोडून शिव मंत्राचा जप करा. पूजेनंतर दिवसभर उपवास करून फराळ करावा आणि रात्री सात्विक भोजन करत उपवास सोडावा.
या दिवशी शिवाचे मंत्र, चालीसा, आरती, स्तुती, कथा इत्यादींचे अधिकाधिक पठण किंवा श्रवण करावे. या दिवशी शिवाचा ‘ॐ नम: शिवाय’ असा नामजप अधिकाधिक करावा. सोबतच जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ वापरल्यास त्याचा अधिक लाभ होतो.
श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. या दिवशी शंकराला एक मूठभर धान्य वाहिले जाते. यालाच शिवामूठ म्हणतात. विवाहानंतर नववधू पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ वाहण्याचे व्रत आचरतात. घरी, मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर ही शिवामूठ वाहिली जाते. घरी शिवामूठ वाहिली की त्यात थोडी भर घालून ते धान्य गरजू व्यक्तीला दान दिले जाते, तर मंदिरात वाहिली शिवामूठ पुजाऱ्याला दिली जाते.
कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी जाणून घेऊया.
05 ऑगस्ट, पहिला सोमवार – शिवामूठ तांदूळ वाहावी.
12 ऑगस्ट, दुसरा सोमवार – शिवामूठ तीळ वाहावी.
19 ऑगस्ट, तिसरा सोमवार – शिवामूठ मूग वाहावी.
26 ऑगस्ट, चौथा सोमवार – शिवामूठ जव वाहावी.
02 सप्टेंबर, पाचवा सोमवार – शिवामूठ हरभरा वाहावी.
शिवामूठ वाहताना “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा” असे तीन वेळा म्हणावे आणि शिवामूठ वाहावी.
श्रावणी सोमवारची कथा
आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता, त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या एक नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगटं,नेसायला जाडें भरडे,राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावणमास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली, ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूठ वाहायला जात आहेत. नावडतीने विचारलं त्याने काय होतं ? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं,मुलबाळ होतं,नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण ? नावडतीने सांगितले राजाची सून, मी देखील तुमच्या सोबत येते.नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली.
नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या, नावडतीने विचारलं काय बोलताय, तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामूठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं ? मूठ चिमूट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी. गंध फूल घ्यावं, दोन बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरादेवा, सासूसासऱ्या, दिराभावा,नणंदाजावा,भ्रतरा,नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा.पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग,चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू शिवमूठीकरीता घ्यावे.
पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावानणंदानीं उष्टं माष्टं पान दिलं ते तीनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला , नावडतीने घरातून सर्व सामान घेतला, पूढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली, आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासूसासऱ्या,दिराभावा, नणंदाजावा,नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून तिळ वाहिले.
संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं,दूध पिऊन निजून राहिली, संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे. नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत कांटे कुटे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला, पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली,घरची माणसं मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे.
नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करूणा आली. नागकन्या, देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं, नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा,सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा,नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतिची पूजा झाली.
======
हे देखील वाचा : सुरेखा कुडचींचा वर्षा उसगावकरांना पाठिंबा
======
पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला, माझं पागोटं देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं ? सूनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव, मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.