अरुणाचलेश्वर किंवा अरुल्मिगुचे मंदिर तामिळनाडू राज्यामधील तिरुवन्नमलाई या शहरात आहे. हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या शिव मंदिरांपैकी एक आहे. अरुणाचल पर्वताच्या पायथ्याशी वसलेले हे मंदिर भव्य वास्तू आणि अप्रतिम वास्तुकलेसह एखाद्या किल्ल्यासारखे आहे. किल्ल्याइतकेच या मंदिराची वास्तू भक्कम आहे. हजारो वर्षापूर्वी बांधलेले हे अरुणाचलेश्वर मंदिर आजही त्याच्या स्थापत्यशास्त्रामुळे भाविकांना आश्चर्यचकीत करते. या मंदिरात भगवान शंकराची अग्नी तत्वाच्या स्वरुपात पुजा करण्यात येते. (Shiva temple)
या मंदिराचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. मंदिराच्या वैभवाचा उल्लेख पुराणात आणि थेवरम आणि तिरुवासगम यांसारख्या तमिळ साहित्यिकांमध्येही आहे. अतिशय मोठ्या भागात असलेले हे मंदिर म्हणजे, भारतीय वैभवाचेही प्रतिक मानले गेले आहे. या मंदिर परिसरात आठ शिवलिंग आहेत. त्यांना अष्टलिंगम म्हणून ओळखले जाते. इंद्रलिंगम, अग्निलिंगम, यमलिंगम, निरुथिलिंगम, वरुणलिंगम, वायुलिंगम, कुबेरलिंगम आणि एसन्यालिंगम अशी या शिवलिंगाची नावे आहेत. यातील प्रत्येक शिवलिंग हे पृथ्वीच्या वेगवेगळ्या दिशांचे प्रतीक आहे. अरुणाचल पर्वताभोवती अनेक भक्त प्रदक्षिणा करतात. या अष्टलिंगम स्वरुपात असलेले भगवान शंकर अशी गिरिपरिक्रमा करणाऱ्या भक्तांना आठही बाजुंनी बघतात, भक्तांना आशीर्वाद देतात. (Shiva temple)
हे मंदिर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजवटींच्या अधिपत्याखाली राहिले आहे. चोल, होयसाळ, संगम, सलुवा, तुलुवा आणि विजयनगर राजांनी या मंदिराच्या भव्यतेसाठी प्रयत्न केले. राजांनी मंदिराला जमीन, रोख रक्कम, गायी आणि दागदागिने, सोन्या चांदिची भांडी ही भेटस्वरुपात दिली. या सर्वांचा मंदिरातील शिलालेखांमध्ये उल्लेख आढळतो. वैभवशाली असलेल्या या मंदिरावर काही काळ मुघल राजवटीतील शासकांचीही छाया होती. या मुघल शासकांनी अनेकवेळा मंदिर लुटण्याचा प्रयत्न केला. मंदिरातील संपत्ती त्यांनी आपल्या खजिन्यात जमा केली. तरीही मंदिराची वास्तुकला ही मंदिराचे खरे वैभव ठरले. आजही हे मंदिर भक्कमपणे उभे असून रोज हजारो भाविक भगवान शंकराचे अनोखे रुप बघण्यासाठी मंदिरात गर्दी करतात.
अरुणाचलेश्वर मंदिर 25 एकर परिसरात पसरले आहे. या भव्य मंदिराच्या उभारणीत अनेक वर्ष गेली आहेत. तत्कालीन राजांनी मंदिराची भव्यता अधिक व्यापक केली. त्यानुसारच मंदिराचे वास्तुशास्त्र हे ठराविक काळापुरते मर्यादित नाही. त्यात अनेक शैली समाविष्ठ झाल्या आहेत. अरुणाचल पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर हे द्रविडीयन वास्तुशैलीमध्ये बांधले गेलेले मंदिर काळाप्रमाणे बदलत गेले आहे. (Shiva temple)
अरुणाचलेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या चार दिशांनाही प्रवेशद्वारासाठी गोपुरम आहेत. पूर्वेकडील सर्वात उंच गोपुरम हे राजगोपुरम म्हणूनही ओळखले जाते. या गोपुरमचे वैशिष्ट म्हणजे हे संपूर्ण गोपुरम ग्रॅनाइटचे बनलेले आहे. त्याची उंची सुमारे 217 फूट आहे. ज्या काळी हे गोपुरम बांधले, तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रॅनाइट कसा काढला होता, हा प्रश्नही आता स्थापत्यशास्त्रज्ञांना आहे. मंदिराची चारही गोपुरम विविध शिल्पांनी सजवलेली आहेत. मंदिराच्या अन्य गोपुरमना थिरुमंजनागोपुरम (दक्षिण), पैगोपुरम (पश्चिम) आणि अम्मानी अम्मान गोपुरम (उत्तर) अशी नावे आहेत.
या मंदिराची परिक्रमा करण्याचे मोठे महत्त्व आहे. या मंदिरात विजयनगर साम्राज्याच्या कृष्णदेवरायाच्या काळात एक भव्य सभा मंडप बांधण्यात आला. या मंडपात एक हजार खांब आहेत. हे सर्व खांब विविध देवी-देवतांच्या शिल्पांनी सजलेले आहेत. अत्यंत कलात्मक अशा या खांबांना बघण्यासाठी फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकही मोठ्या संख्येनं गर्दी करतात. या मंडपांमधून आता भगवान शंकराची भव्य पुजा मांडण्यात येते. अशावेळी एकाच दिवशी हजारो भाविक एकत्र बसून श्री अरुणाचलेश्वराची पूजा करतात. हे दृश्यही अत्यंत विलोभनीय असते. याशिवायही मंदिर परिसरात अन्य भव्य असे सभामंडप आहेत. या सर्वांचे बांधकाम हे दगडी आहे. (Shiva temple)
==============
हे देखील वाचा : इंस्टाग्रामसाठी ट्रेंडिंग हॅशटॅग वापरण्याची सोप्पी ट्रिक
==============
9 व्या शतकात चोल राजवंशाच्या काळात हे बांधकाम झाल्याची माहिती आहे. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक सोहळे होत असतात. पण या सर्वात मोठा सोहळा हा दिवाळीला होतो. कार्तिकाई दीपम उत्सव नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सोहळा बघण्यासाठी या भागातील नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करतात. यावेळी टेकडीवरील एक विशाल दीपगृह प्रकाशित केले जाते. दूरवरुन हे प्रकाशीत होणारे दीपगृह बघता येते. याला अग्नीच्या शिवलिंगाचे प्रतीक मानण्यात येते. लाखो भाविक हा सोहळा बघण्यासाठी गर्दी करतात. या सोहळ्याच्या आदल्या दिवशी अरुणाचल पर्वतांची प्रदक्षिणा करतात. यावेळीही लाखो भाविक असतात. आता येत्या दिवाळीलाही हा सोहळा भव्य स्वरुपात होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु करण्यात आली आहे.
सई बने