अमेरिका चीनमधील तणावामध्ये सध्या एक तरुणी चर्चेत आली आहे. शी मिंगझे नावाची ही तरुणी हार्वर्ड विद्यापीठात शिकत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठावर अनेक नियम लादण्यास सुरुवात केली. शिवाय त्यामधील विद्यार्थ्यांचीही कडक तपासणी करण्याचे जाहीर केले आणि ही शी मिंगझे एकदम प्रकाश झोतात आली. (Shi Mingze)
अर्थात हार्वर्डमध्येही शी मिंगझे बरीच लोकप्रिय आहे. कारण तिच्याभोवती असलेली सुरक्षा व्यवस्था. मॅसॅच्युसेट्समध्ये उच्च सुरक्षा यंत्रणेच्या घे-यात राहणा-या या विद्यार्थिनींने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र तिची ओळख उघड होत नव्हती. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत रहात असलेल्या चीनी विद्यार्थ्यांबाबत कडक भूमिका घेतली आणि त्यात या चीनी तरुणीची ओळखही उघड झाली. ही तरुणी म्हणजे, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी शी मिंगझे असल्यानं सर्वत्र खळबळ उडाली. शी मिंगझे हार्वर्डमध्ये काही वर्ष शिक्षण घेत आहे. अमेरिकेत असलेले चीनी विद्यार्थी, अमेरिकेचे तंत्रज्ञान चोरत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केल्यावर आता या शी मिंगझे हिचीही अमेरिकेतून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. (International News)
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाबाबत कडक भूमिका स्विकारली आहे. या विद्यापीठात देशविघातक विचारांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आक्षेप ट्रम्प यांनी करुन हार्वर्ड विद्यापीठाला देण्यात येणारी मदत थांबवण्याचा निर्णय घेतला. अर्थात यावर कोर्टात एक वेगळाच ड्रामा खेळला गेला. पण त्याआधी ट्रम्प यांनी चीनी विद्यार्थी अमेरिकेतील तंत्रज्ञान चोरत असल्याचा आरोप करत चीनी विद्यार्थ्यांना देशाबाहेर काढणार, अशी भूमिका घेतली आणि अधिक खळबळ उडाली. त्यात शी मिंगझे या तरुणीचे नाव पुढे आले. शी मिंगझे ही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची मुलगी असल्याची माहितीही जाहीर झाली. तेव्हापासून शी जिनपिंग यांच्या मुलीला हद्दपार करण्याची मागणी अमेरिकेतील काही गटाकंडून करण्यात येऊ लागली आहे. (Shi Mingze)
या सर्वात आता अमेरिकेच्या सोशल मिडियामध्ये शी मिंगझे हिचे फोटो मोठ्या प्रमाणत उपलब्ध झाले आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी असलेली शी मिंगझे मॅसॅच्युसेट्समध्ये उच्च सुरक्षेत राहत आहे. ती ज्या घरात रहाते, त्या घराभोवती बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसांची किमान सात फेरे आहेत. शी मिंगझे या सर्व सुरक्षारक्षकांमुळे आधीही अनेकांच्या टिकेची धनी झाली आहे. शी जिनपिंग यांनी नेहमी आपल्या या लाडक्या लेकीला स्वतःपासून दूर ठेवले आहे. शी मिंगझे हिची आई, प्रसिद्ध गायिका पेंग लियुआन या कायम आपल्या मुलीसोबत असल्याचे सांगण्यात येते. मिंगझे हिचा जन्म 27 जून 1992 रोजी झाला. तिनं चीनमधील हांगझोऊ फॉरेन लँग्वेज स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. तिथेच तिनं फ्रेंच भाषेचेही धडे गिरवले आहेत. मिंगझेवर तिचे आजोबा, शी झोंगशुन यांचा खूप प्रभाव आहे. कम्युनिस्ट क्रांतिकारक असलेले झोंगशुन हे मिंगझे हिला “शियाओ मुझी” असे म्हणत असत. म्हणजेच स्थानिक भाषेत, समाजासाठी काम करणारी उपयुक्त मुलगी असा होतो. (International News)

मिंगझेचे उच्च शिक्षण 2010-2014 या काळात अमेरिकेतील हार्वर्डमध्ये झाले. तिथे तिनं मानसशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर ती काहीकाळ चीनमध्ये परतली. तिनं चीनमधील झेजियांग विद्यापीठ आणि हांगझोऊ फॉरेन लँग्वेज स्कूलमध्ये फ्रेंच भाषेचा अधिक अभ्यास केला. त्यानंतर मिंगझे पुन्हा 2019 मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला गेली आणि हार्वर्डमध्ये शिकू लागली. तेव्हापासून ती अमेरिकेतच रहात असल्याची माहिती आहे. तिथे तिचे नाव बदलण्यात आले असून एका सामान्य विद्यार्थ्यासारखी तिचे जीवन आहे. अभ्यासू, शांत आणि राजकीय बाबींमध्ये रस घेणारी अशी तिची ओळख आहे. मिंगझे भोवती चिनी सुरक्षा यंत्रणेचे कडक सुरक्षा कडे असते. तरीही 2019 मध्ये तिची माहिती उघड केल्याबद्दल न्यू टेंग्यू नावाच्या तंत्रज्ञाला दोषी ठरवण्यातच आले. त्याला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. एवढ्या वर्षात मिंगझेची खरी ओळख दिली गेली नव्हती. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यावर मिंगझेची खऱी ओळख जाहीर करण्यात आली आहे. (Shi Mingze)
===========
हे देखील वाचा : America : भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या विद्यापीठापर्यंतचा प्रवास अडचणीचा !
Panchen Lama : 30 वर्ष बेपत्ता आहेत पंचेन लामा !
===========
सरकारनं, चीन आपल्या विद्यार्थ्यांद्वारे अमेरिकन तंत्रज्ञान आणि संशोधन चोरत असल्याचा आरोप केला. विज्ञान, तंत्रज्ञान विषयक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येनं चिनी विद्यार्थी उपस्थित असतात, हेच विद्यार्थी आपल्या देशाला तंत्रज्ञान पुरवत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे चीन सरकरानं कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. याचाच फायदा घेत ट्रम्प यांनी मिंगझेची ओळख जाहीर केली आहे. अमेरिकेत सध्या 2.8 लाख चिनी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण परदेशी विद्यार्थ्यांच्या हे प्रमाण सुमारे एक चतुर्थांश आहे. ट्रम्प यांनी त्यांचे धोरण काटेकोरपणे अंमलात आणले तर यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून पुन्हा आपल्या देशात जावे लागणार आहे. त्यातच शी मिंगझे हिचाही समावेश असेल. (International News)
सई बने
