Home » गुजरातच्या जुना खाटियाचे रहस्य

गुजरातच्या जुना खाटियाचे रहस्य

by Team Gajawaja
0 comment
Dholavira
Share

गुजरातच्या जुना खाटिया गावामध्ये अनेक संशोधकांनी गर्दी केली आहे.  कच्छ जवळील या गावातील स्मशानभूमीचे उत्खनन झाले, आणि या संशोधकांना येथे पुरातन खजिनाच सापडला.  या उत्खननात मातीची भांडी, मणी असलेले दागिने, मौल्यवान वस्तू असलेल्या थडग्यांच्या रांगा आढळून आल्या आहेत.  कच्छ जिल्ह्यातील लखपतपासून ३० किमी अंतरावर असलेल्या या गावातून वर्षापूर्वी अशी ५०० थडगी आढळून आल्यावर एकच खळबळ उडाली. (Gujarat)

या सर्व भागाला त्यानंतर सील करण्यात आले, आणि त्याचे उत्खनन सुरु झाले.  यातून हडप्पा सारख्या संस्कृतीच्या खुणा मिळाल्या आहेत.  यातील थडग्यांच्या परिसरात मौल्यवान मणी असलेले दागिने आणि संरक्षणासाठी प्राण्यांची हाडे असलेल्या वस्तू सापडल्या आहेत.  जुना खाटियामधील ही थडगी नेमकी कोणाची होती, ते कोणी लढवले होते का ? हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न आता संशोधक करीत आहेत.  जुना खाटियामधील सापडलेली थडगी ही  ३२०० BCE ते २६०० BCE पर्यंतची आहेत.  गुजरातमध्ये धोलाविरा हे स्थान आहे.  धोलविरामधूनही याच काळातील भूमीगत झालेले शहर शोधून काढण्यात आले आहे.  धोलाविरा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. 

आता त्यालाच साधर्म्य असलेल्या काळातील ही थडगी मिळल्यामुळे संशोधक चक्रावले आहेत.  कारण धोलाविरा शहरात स्मशानभूमी होती, त्याचे उत्खनन झाले आहे. परंतु जुना खाटियाजवळ कोणतेही मोठे शहर वा वस्ती आढळलेली नाही.  त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेली थडगी कोणाची आहेत, हा प्रश्न संशोधकांना आता पडला आहे.  त्यातही येथील मिळालेली मातीच्या भांड्यांची शैली सिंध आणि बलुचिस्तानमधील उत्खननात मिळालेल्या वस्तूंसारखीच आहे.  केरळ विद्यापीठ आणि कच्छ विद्यापीठाचे पुरातत्व शास्त्रज्ञ याबाबत संशोधन करीत आहेत. (Gujarat)

कच्छ जवळील या जुना खाटिया गावाला वर्षभरापूर्वी प्रसिद्ध मिळाली.  येथे  पुरातत्व खात्यानं केलेल्या उत्खननात ५२०० वर्षे जुनी हडप्पा संस्कृतीशी साधर्म्य असलेल्या वास्तु शोधण्यात आल्या.  त्यात जवळपास ५०० थडगी असल्याचे नंतर स्पष्ट झाले.  त्यांच्या उत्खननादरम्यान सांगाडे, मातीची भांडी आणि काही प्राण्यांची हाडे सापडली. या हाडांचा शस्त्र म्हणून वापर होत असल्याचे स्पष्ट झाले.  ही सर्व मोठी स्मशानभूमी असल्याचा संशोधकांचा अंदाज होता.  त्यामुळे जुना खाटिया गावाच्या आसपास तेव्हा मोठी वस्ती असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.  त्यादरम्यान अत्यंत संपन्न असे शहर येथे होते.  कारण या थडग्यात जे सामान मिळाले आहे, ते अतिशय मौल्यवान आहे.  मृतांजवळ दागिने ठेवण्यात आले होते, तसेच सिरॅमिकची नक्षीदार भांडीही ठेवण्यात आली होती, तसेच प्राण्याची हाडेही होती.  त्यावरुन ही सर्व मंडळी लढवय्यी किंवा राजवंशातील असावीत असाही अंदाज संशोधकांचा आहे.  

संशोधकांचा अंदाज आहे की, कदाचित एखाद्या भागाची लोकसंख्या वाढल्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे एक गाव सोडून लोकांनी दुस-या गावी स्थलांतर केले असेल.  ३२०० ईसापूर्व ते १७०० ईसापूर्व, म्हणजे हडप्पाच्या सुरुवातीच्या काळात हे स्थलांतर झाले होते.  या उत्तरार्धापर्यंत इथे वस्ती होती.  हा सर्व काळ हडप्पा संस्कृतीचा काळ म्हणून ओळखला जातो.  आता या थडग्यात सापडलेल्या मातीच्या भांड्यांवरून स्पष्ट झाले आहे की, हडप्पा संस्कृतीचेही तीन टप्प्यात विभाजन झाले होते.   सुरुवातीची हडप्पा संस्कृती,  मग प्रगत हडप्पा संस्कृती आणि उत्तरार्धातील हडप्पा संस्कृती.  या तीनही काळातील भांडी जुना खाटिया येथे सापडली आहेत. (Gujarat)

यातील बरीचशी भांडी ही आता तुटलेली असली तरी त्यावरील नक्षीकाम पहाता येते.  त्यांची बनवण्याची पद्धतीही वेगळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.  येथे सापडलेली भांडी ही छोट्या स्वरुपाची होती.  वाट्या, प्लेट्स, पाण्याचे भांडे यांचे छोटे स्वरुप येथे मिळाले आहे.  याशिवाय या उत्खननात मौल्यवान दगडांपासून बनवलेले मणी, टेराकोटा स्पिंडल व्हॉर्ल,  म्हणजेच धागा फिरवण्याचे साधन, तांबे, दगडाची हत्यारे, दळण्याचे दगड आणि हातोडे सापडले आहेत.  सोबतच प्राण्यांची हाडे मिळाली आहेत. (Gujarat)

============

हे देखील वाचा : मानवी अस्तित्वापेक्षा या देशांना वर्चस्वाची चिंता

============

तसेच गाय, मेंढ्या यांचीही हाडे मिळाली आहेत.  याशिवाय शिंपल्यांचे तुकडेही मिळाले आहेत.  या सर्व भागाचे आता मोठ्याप्रमाणात संशोधन करण्यात येत आहे.  केरळ विद्यापीठ आणि कच्छ विद्यापीठाशिवाय इतर अनेक संस्था या संशोधनात एकत्र काम करत आहेत. यामध्ये कॅटलान इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल आर्किओलॉजी (स्पेन), स्पॅनिश नॅशनल रिसर्च कौन्सिल (स्पेन), ला लागुना विद्यापीठ (स्पेन), अल्बियन कॉलेज आणि टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी (युनायटेड स्टेट्स), डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (पुणे) यांचा समावेश आहे. 

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.