Home » Marathi Bhasha : सावरकरांनी मराठी भाषेला कित्येक पर्यायी शब्द दिले !

Marathi Bhasha : सावरकरांनी मराठी भाषेला कित्येक पर्यायी शब्द दिले !

by Team Gajawaja
0 comment
Marathi Bhasha
Share

३ ऑक्टोबर २०२४ हा दिवस महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वात ऐतिहासिक दिवस ठरला. याच दिवशी माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तसा मराठी भाषेचा इतिहास हजारो वर्ष मागे जातो. अगदीच सातवाहन साम्राज्याचा काळातही मराठी भाषा महाराष्ट्री या नावाने अस्तित्वात होती. त्यानंतर अनेक संत-महात्यांनी विविध ग्रंथ रचले. मराठी भाषेला उभारी मिळाली. त्यानंतर मध्ययुगीन काळात मराठी भाषेवर इतर भाषांचाही प्रभाव पडला, पण ती तग धरून उभी राहिली आणि आज जगातल्या सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आपली मराठी आहे. याच मराठी भाषेसाठी अनेकांनी योगदान दिलं, यापैकीच एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर ! आता तुम्हाला वाटेल, स्वातंत्र्यलढ्यातील व्यक्तीमत्त्वाचं मराठी भाषेला काय योगदान असेल ? पण सावरकर हे एक उत्तम साहित्यिकसुद्धा होते आणि मराठी भाषाशुद्धी करून आजची आधुनिक मराठी आपल्यासमोर ठेवली. आज आपण त्यांचच योगदान जाणून घेणार आहोत. (Marathi Bhasha)

सावरकरांनी आपला साहित्याचा वसा स्वातंत्र्यलढयासोबतच जपला. त्यांचं ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक कित्येक क्रांतीकारकांसाठी प्रेरणादायी ठरलं. भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, चापेकर बंधू असे कित्येक क्रांतीकारकांना या पुस्तकातून बळ मिळालं. भगत सिंग आणि सुखदेव यांनी तर त्यांचे द्वारकादास लायब्ररीचे साथीदार राजाराम शास्त्री यांच्या सहाय्याने या पुस्तकाचं भाषांतर करून त्याचं वाटप केलं होतं. इतका सावरकरांच्या साहित्याचा प्रभाव होता. या व्यतिरिक्त त्यांनी हिंदुपदपातशाही, सहा सोनेरी पाने, शिखांचा इतिहास, माझी जन्मठेप, ही पुस्तके आणि विविध नाटके, कादंबरी आणि ग्रंथ मराठी भाषेत लिहिले. त्यांच्या ‘सागरा प्राण तळमळला’, ‘जयोस्तुते’ अशा अनेक कविता आजही देशवासीयांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. (Marathi News)

हजारो वर्ष देवनागरी असलेल्या आपल्या मराठी भाषेत अनेक बदल होत राहिले. पण मराठीवर सर्वात जास्त परिणाम झाला मध्ययुगीन काळात देशावर इस्लामिक राज्य होतं. त्यामुळे मराठीमध्ये उर्दू आणि फारसी भाषेचे अनेक शब्द मिसळले. आजही नकळत आपण असे काही शब्द उच्चारतो जे मुळात फारसी आहेत पण आपल्याला ते मराठीच वाटतात. उदा. खुर्ची, नाच, बाजार, सावकार, जबाबदारी, बक्षीस, जमीन, बटाटा, दालन, दरबार, नोकरी, खुलासा, किल्ला, इमारत, अक्कल, डावपेच आणि असे बरेच शब्द फारसीच आहेत. एक काळ असा होता की, मराठी भाषा पूर्णपणे नाहीशी होण्याच्या उंबरठ्यावर होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर मराठी भाषेला तारण्यासाठी एक भाषाशुद्धीचा कोश तयार करून घेतला. (Marathi Bhasha)

हा राज्यव्यवहार कोश शिवरायांनी पंडित रघुनाथ हनुमंते यांच्याकडून करवून घेतला होता. काही ठिकाणी मात्र हा कोश तंजावरच्या ढुंढिराज व्यास यांनी केला, असाही उल्लेख आहे. स्वराज्याच्या शासकीय वापरात येणाऱ्या फारसी शब्दांसाठी संस्कृत शब्द पर्याय म्हणून वापरावे, हाच या कोशाचा उद्देश होता. उदाहरण द्यायचं झालं तर वजीरच्या जागी प्रधान, दिवाणच्या जागी सचिव याशिवाय सेनापती, सुमंत, अमात्य, न्यायाधीश, अश्व, स्वामी असे अनेक शब्द या कोशाने दिलेले आहेत. मात्र तरीही फारशी भाषेचा प्रभाव फारसा बदलला नाही, पण तो थोडाफार कमी झाला. यानंतर मराठी भाषेत काहीतरी बदल करावेत, यासाठी पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर ! (Marathi News)

रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना समाजकार्यासोबतच सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ जोमाने चालवली. १९२५ पासून भाषाशुद्धीचा आग्रह धरत केसरी वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी ही चळवळ चालवली. यावेळी त्यांना अनेक साहित्यिकांनी विरोधसुद्धा केला होता. यानंतर जळगावमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद झाली. याठिकाणी सावरकरांचं भाषाशुद्धीचं तत्व मान्य करण्यात आलं. भाषाशुद्धी चळवळीत प्रमाण भाषाविरुद्ध बोलीभाषा असा वाद अपेक्षितच नाही. तिथे वाद आहे तो स्वकीय भाषा की परकीय भाषा इतकाच. तसं मराठीमध्ये एकूण ५२ बोली भाषा आहेत. त्या सर्वांच्या मदतीने परकीय शब्दांना वेगळे मराठी शब्द द्यायला हवेत, असं त्यांना सुचलं. त्यामुळे त्यांनी असे पर्यायी शब्द शोधण्यास सुरुवात केली आणि यावर अनेक लेखसुद्धा लिहिले. (Marathi Bhasha)

आता सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले पर्यायी शब्द जाणून घेऊया.
स्कूल – शाळा
कॉलेज – महाविद्यालय
हेडमास्टर – मुख्याध्यापक
प्रोफेसर – प्राध्यापक
हेअरकटिंग सलून – केशकर्तनालय
वकील – विधीज्ञ
वॉर – युद्ध
मोहीम – अभियान
फौज, लष्कर – सेना, सैन्य
सबमरीन – पाणबुडी
एअर फोर्स – वायूदल, किंवा नभोदल
नेव्ही – नौदल किंवा जलसेना
टाईप रायटर – टंकलेखक
पोस्ट – टपाल
रिपोर्ट – अहवाल
लेजीस्लेटर – विधिमंडळ
बजेट – अर्थसंकल्प
खाते – विभाग
थिएअर – चित्रपटगृह

===============

हे देखील वाचा :  Maratha History : मोघलाई की पेशवाई पहिली आली ? नेमकं सत्य काय ?

Artificial Intelligence : AI सुरू करणार तिसरं महायुद्ध ?

===============

याशिवाय महापौर, दिनांक, विधानसभा, हुतात्मा, दिग्दर्शक, न्यायालय, कार्यालय, दूरध्वनी असे कित्येक शब्द सावकारांनीच मराठी भाषेला दिलेले आहेत. आजही आपण मराठी बोलताना इंग्रजी किंवा इतर भाषांचे शब्द बोलतोच ओके, सॉरी, प्लीज, thanks असे कितीतरी शब्द आपण सर्रास वापरतो. मुळात ते वापरण्यात काहीही गैर नाही. पण आपल्या मराठी भाषेचा गौरव व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आज २६ फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आत्मार्पण दिन म्हणजेच पुण्यतिथी याशिवाय २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन ! त्यामुळे मातृभाषा जतनाचा वसा, आपण आतातरी हाती घ्यायला हवा. (Marathi News)

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.