Home » Lahore : चक्क लाहोर विद्यापीठात संस्कृत शिकवणार !

Lahore : चक्क लाहोर विद्यापीठात संस्कृत शिकवणार !

by Team Gajawaja
0 comment
Share

आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमधून रोज कुठली ना कुठली ब्रेकींग न्यूज येते. कधी बॉम्बस्फोट तर कधी बलुच सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार केला. पाकिस्तानमधील महागाई आणि तिथे हिंदूंवर होणारे अत्याचार, या अशा बातम्या कायम येत असतात. मात्र अशा बातम्यांमधूनच एक सकारात्मक बातमी आपल्या शेजारील देशाकडून आली आहे. ती म्हणजे, पाकिस्तानच्या लाहोर विद्यापीठात चक्क संस्कृत भाषा शिकवली जाणार आहे. संस्कृत ही एक प्राचीन, अभिजात आणि शास्त्रीय भाषा आहे. हिंदू धर्मातील सर्व धर्मग्रंथ याच भाषेमधून आहेत. जगातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक मानली जाणारी संस्कृत भाषा ही भारतीय ज्ञान-परंपरेचा आधार आहे. आता तिच संस्कृत भाषा पाकिस्तानमधील विद्यापीठात शिकवली जाणार, ही बातमी आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फक्त तिथे संस्कृत भाषा शिकवली जाणार नाही तर गीता आणि रामायणाचे वर्गही घेतले जाणार आहेत. (Lahore)

भारताबरोबर कायम वैर राखणा-या पाकिस्तानमधून एक चांगली बातमी आली आहे. तेथील लाहोर विद्यापीठात आता संस्कृतचे वर्ग होणार आहेत. हा उपक्रम लाहोर विद्यापीठातील व्यवस्थापन विज्ञान विभागाने सुरू केला आहे. या विभागाने संस्कृतमध्ये ४ पातळ्यांवरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. त्यासोबतच एक डिप्लोमा अभ्यासक्रमही सुरु करण्यात येणार आहे. १९४७ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानने हिंदू धर्मग्रंथांबद्दल एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. यामुळेच सर्वत्र आश्चर्य व्यक्त कऱण्यात येत आहे. कारण पाकिस्तानमध्ये हिंदू लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे २ टक्क्यांपर्यंत आहेत. त्यातही बहुतांश हिंदू सिंध प्रांतात रहात आहेत. पाकिस्तानमधील सर्वात अल्पसंख्यांक म्हणून हिंदूंची गणना होते. (International News)

जे हिंदू पाकिस्तानमध्ये रहात आहेत, त्यांचे हाल सर्व जगासमोर आहेत. त्यांच्या मुलींवर अत्याचार होत आहेत, या हिंदू अल्पवयीन मुलींना पळवून त्यांचे जबरदस्तीने मुस्लिम तरुणांबरोबर लग्न लावून देण्यात येत आहे. शिवाय हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात येत आहे. हे ज्या देशात खुलेपणानं होत आहे, तिथेच आता संस्कृत सारखी हिंदू धर्मग्रंथांची मुळ असलेली भाषा शिकवली जाणर आहे. फक्त संस्कृत शिकवली जाणार असे नाही, तर काही हिंदू धर्मग्रंथांचाही या अभ्यासक्रमात समावेश कऱण्यात आला आहे. हा संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम जिथे शिकवला जाणार आहे, ते लाहोर विद्यापीठ पाकिस्तानमधील सर्वात मोठे खाजगी विद्यापीठ आहे. १९९९ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठात वैद्यक, अभियांत्रिकी, कला आणि विज्ञान यासारख्या क्षेत्रातील अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. हे विद्यापीठ त्यामधील दर्जेदार शिक्षणासाठी ओळखले जाते. पाकिस्तानमधील विविध क्षेत्रातील मान्यवर, नेते आणि उद्योजक तयार करणारे विद्यापीठ अशीही या लाहोर विद्यापीठाची ख्याती आहे. (Lahore)

८० हजाराहून अधिक विद्यार्थी या विद्यापीठाचे आहेत, असे सांगण्यात येते. यासोबत आधुनिक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, आयटी सुविधा यासाठीही हे विद्यापीठ ओळखले जाते. याच विद्यापीठाच्या लाहोर विद्यापीठ ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस या विभागातर्फे आता संस्कृत भाषेचा वर्ग घेण्यात येणार आहे. संस्कृत आणि प्राचीन भारतीय साहित्य यांच्या या अभ्यासक्रमात गीता आणि महाभारत यावरही संशोधन करण्यात येणार आहे. हा वर्ग भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणाव कमी करण्यासाठी उपयोगी होईल, अशी आशाही व्यक्त करण्यात येत आहे. लाहोर विद्यापीठातील या संस्कृत अभ्यासक्रमासाठी केंद्राचे संचालक डॉ. अली उस्मान कासमी आणि एफसी कॉलेजमधील सहयोगी प्राध्यापक डॉ. शाहीद रशीद यांनी पुढाकार घेतला आहे. (International News)

=======

हे देखील वाचा :  Saudi Arabia : सौदीचे वाळवंट जलमय !

=======

डॉ. रशीद प्रामुख्याने संस्कृत व्याकरण आणि शास्त्रीय साहित्य शिकवतात. डॉ. कासमी आणि डॉ. रशीद यांचा असा विश्वास आहे की, संस्कृत, हिंदी, उर्दू आणि इतर भाषांमध्ये एक समान धागा आहे. याच धाग्यामुळे दक्षिण आशियात सांस्कृतिक पूल तयार होईल, अशी आशा डॉ. कासमी आणि डॉ. रशीद यांनी व्यक्त केली आहे. हा अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थी महाभारत आणि भगवद्गीता यासारख्या ग्रंथांचा अभ्यास करणार आहेत. या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांना महाभारत टेलिव्हिजन मालिकेतील प्रसिद्ध गाणे “है कथा संग्राम की” च्या उर्दू आवृत्तीची ओळख करून दिली जात आहे. सद्यस्थितीत लाहोर विद्यापीठामध्ये पंजाबी, पश्तो, सिंधी, बलुची, अरबी आणि फारसी या भाषा शिकवल्या जात आहेत. (Lahore)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.