कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात किंवा कोणतीही चांगली गोष्ट करताना सर्वात आधी आपण गणपती बाप्पाचे नाव घेतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच गणपती हे आराध्य दैवत आहे. अनेक लोकं तर दर मंगळवारी गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेत दिवसाची सुरुवात करतात. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला उपवास करतात. (Sankashti Chaturthi Vrat)
आज संकष्टी चतुर्थी आहे. अनेक लोकांसाठी हा दिवस महत्वाचा असतो. उपवास करत बाप्पाचे नाव घेत दिवस व्यतीत करतात. संध्याकाळी पूजा करून मग उपवास सोडतात. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की नक्की संकष्टी का साजरी करतात आणि कधी करतात? सगळे करतात, बाप्पाचा दिवस आहे म्हणून आपण पण करू, कॅलेंडरमध्ये आहे म्हणून करू असा विचार तुम्ही करता का? चला जाणून घेऊया या संकष्टीबद्दल सर्व माहिती.
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. सामान्यपणे एका वर्षात १२ चतुर्थी येतात. अधिकमास आल्यास १३ संकष्ट चतुर्थी येतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत महिला आणि पुरुष दोघेही करू शकतात. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे.
त्यामुळेच या दिवशी प्रामुख्याने विविध मंदिरांमध्ये, टीव्हीवर, वृत्तपत्रांमध्ये चंद्रोदय कधी होणार आहे याची माहिती दिलेली असते. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला नैवेद्य दाखवेला जातो. यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे. त्यानंतर भोजन करावे. या व्रताचा कालावधी आमरण, एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा असतो.
संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी अशी एकादशी असा याचा अर्थ आहे. संकटाचा नाश करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संस्कृत भाषेत संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण काळातून सुटका होणे असा आहे. कोणत्याही प्रकारचे दु:ख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केली जाते.
======
हे देखील वाचा : जाणून घ्या मंगळसूत्राबद्दलची खास माहिती
======
अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेनंतर येणार्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते. संकष्टी करणार्यांनी उपवास सोड्ण्यापूर्वी “संकष्टी चतुर्थी महात्म्य” वाचावे असे सांगितले जाते.