एकीकडे मनोरंजनविश्वात अनेक सुखद गोष्टी घडताना दिसत आहे, तर दुसरीकडे अनेक कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. २०२२ या वर्षात अनेक दिग्गज आणि मोठ्या कलाकारांनी त्यांच्या निधनामुळे आपल्याला दुःखात लोटले आहे. नुकतेच प्रसिद्ध अभिनेते असलेल्या सलीम घोष यांनी वयाच्या ७०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मालिका आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सलीम घोष (Salim Ghouse) यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या भूमिका साकारल्या.
‘भारत एक खोज’ या मालिकेतून सलीम घोष (Salim Ghouse) यांनी तुफान ओळख मिळवली. सलीम घोष यांच्या निधनाची बातमी अभिनेते शारिब हाश्मी यांनी सोशल मीडियावर दिली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीसोबतच सलीम यांचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. शारिब हाश्मी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “सर्वात आधी सलीम घोष साहेबांना ‘सुबह’ या मालिकेत पाहिले होते. त्यांचे काम अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावशाली होते. त्यांचा आवाज तर…” या पोस्टसोबतच शारिब हाश्मी यांनी लाल रंगाचे हार्ट ईमोजी देखील पोस्ट केले आहे.
सलीम घोष (Salim Ghouse) यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच सलीम चांगले दिग्दर्शक देखील होते. त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली. याशिवाय त्यांनी अनेक भाषांमध्ये टीव्ही शो आणि डबिंगचे काम केले. सलीम (Salim Ghouse) यांनी १९७८ मध्ये ‘स्वर्ग नरक’ या सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘चक्र’, ‘सारांश’, ‘मोहन जोशी हाजीर हो’, ‘मंथन’, ‘कलयुग’, ‘त्रिकाल’, ‘आघात’, ‘द्रोही’, ‘थिरुदा’, ‘सरदारी बेगम’, ‘कोयला’, ‘सोल्जर’, आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ते त्यांच्या नकारात्मक भूमिकांमुळे विशेष गाजले. यासोबतच सलीम यांनी ‘भारत एक खोज’, ‘टिपू सुल्तान’, ‘कृष्णा’, ‘वागळे की दुनिया’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले.
====
हे देखील वाचा – तापसीचा ‘शाबास मिथू’ झळकणार ‘या’ दिवशी रुपेरी पडद्यावर
====
सलीम घोष (Salim Ghouse) यांनी काही आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्ये देखील काम केले होते. ज्यात ‘द परफेक्ट मर्डर’, ‘द डिसीवर्स’, ‘किम’, ‘गेटिंग पर्सनल’, ‘द महाराजा डॉक्टर’ आदी चित्रपटांचा समावेश आहे. सलीम घोष यांना शेवटचे तामिळ सिनेमा असलेल्या ‘का’ मध्ये पाहिले गेले. सलीम यांची एक विशेषतः होती ते जितक्या सहजपणे हिंदी संवाद म्हणायचे तितक्याच सहजपणे ते तामिळ, तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषेतील संवाद म्हणायचे. सलीम यांच्या निधनावर मनोरंजन आणि टेलिव्हिजनविश्वातील अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केले आहे.