Home » सह्याद्रीत अपघातांची मालिका का वाढलीये ?

सह्याद्रीत अपघातांची मालिका का वाढलीये ?

by Team Gajawaja
0 comment
Sahyadri Accidents
Share

नुकताच 27 वर्षीय ट्रॅव्हल व्लॉगर आनवी कामदारचा मानगावच्या धबधब्याजवळ खोल दरीत पडून मृत्यू झाला. यावरून पुन्हा एकदा सह्याद्रीचे पर्वत, किल्ले आणि धबधबे चर्चेत आले आहेत. पावसाळा आला की, सह्याद्रीत गर्दी सुरू होते, परिणामी अपघात घडतात आणि गेल्या 4-5 वर्षात अपघातांची संख्या खूपच वाढली आहे, त्यामुळे सह्याद्री मृत्यूचा सापळा ठरतोय का ?मानगावचा प्रसिद्ध कुंभे धबधबा इथे 27 वर्षीय ट्रॅव्हल सेंसेशन असलेली व्लॉगर आनवी कामदारचा एका कड्यावरून पडून मृत्यू झाला. (Sahyadri Accidents)

यानंतर सोशल मिडियावर याबाबत बरीच चर्चा झाली. रील बनवण्याचा नादात तिने जीव गमावला, अशा आशयाचे अनेक मेसेज सोशल मिडियावर यायला लागले. त्यामुळे सह्याद्रीत होणारे अपघात हा सर्वात जास्त चिंतेचा विषय ठरला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सह्याद्रीत अनेक अपघात घडले. हौशी ट्रेकर्सची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. लोणावळ्यात कुटुंब वाहून गेल्याच्या घटनेपासून ते आनवी कामदारचा दुर्दैवी मृत्यू यामुळे राज्य प्रशासन नेमकं काय करतय, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. याशिवाय रेस्क्यू टिम्स आणि सह्याद्रीप्रेमी यांचाही भार वाढला आहे. हे अपघात का घडत आहेत?

सह्याद्री तशी सर्वात खडतर अशी डोंगररांग ! अनेक ट्रेकर्स म्हणतात की हिमालयापेक्षा जास्त थकवणारी डोंगररांग म्हणजे सह्याद्रीच याचं सौंदर्य, इथले गडकिल्ले, इथला इतिहास पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येताच असतात, त्यात महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी तर सह्याद्री म्हणजे पवित्रच जागा ! काही गडकिल्ले पायी करता येतात, तर काही कठीण श्रेणीतल्या गडकिल्ल्यांसाठी इक्विपमेंट्सची गरज असते. मात्र अशाही ठिकाणी कोणत्याही माहितीशिवाय आणि सामग्रीशिवाय जाणं, नवख्या पर्यटकांच्याच अंगलट येत आहे. (Sahyadri Accidents)

पावसाळ्यात लोणावळा, माळशेज घाट, आंबोली घाट अशा ठिकाणी गर्दीचा प्रचंड रेटा असतो. आतापर्यंत सह्याद्रीत, पर्यटन स्थळांवर, ओढे, तलाव, धरणे इत्यादी ठिकाणी अनेक दुर्घटना झाल्याची नोंदी आहेतच. धबधब्याखाली खळग्यात बुडालेल्यांची संख्या मोठी आहे. हीच संख्या गेल्या 4-5 वर्षांमध्ये प्रचंड वाढली आहे. पावसाच्या सरी कोसळायला लागल्या गिरीपर्यटक, पर्यटक, हौशे-नवशे अशा सर्वांची एकच झुंबड उडते. राजमाची, सिंहगड, लोहगड, कळसुबाई, हरिश्चंद्रगड अशा अनेक ठिकाणी तर पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने ट्रेकर्सबरोबर पर्यटक देखील येतात. मात्र, सोशल मिडियावर फोटो टाकण्यासाठी किंवा रील बनविण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याशिवाय गर्दीवर नियंत्रण मिळवणंसुद्धा कठीण होऊन बसलं आहे. (Sahyadri Accidents)

====================

हे देखील वाचा : भारतातील या ठिकाणी फिरण्यासह खाण्यापिण्याची व्यवस्था होते फुकटात

====================

आतातर अनेक ग्रुप्स देखील मोठ्या प्रमाणात ट्रेक ऑर्गनाईज करायला लागले आहेत. त्यामुळे सेफ्टी आणि इतर गोष्टींचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. मुळात जे नवखे ट्रेकर्स आहेत, ते कोणत्याही जागेच्या किंवा किल्ल्याच्या माहितीशिवाय, गावकऱ्यांच्या संपर्काशिवाय, हेल्पलाइन नंबरशिवाय त्या ठिकाणी जातात आणि याचवेळी त्यांचा अपघात घडतो किंवा ते जंगलात भटकतात. यंदा जून आणि जुलै महिन्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक अपघात घडले आहेत. कोणताही अंदाज न घेता कड्यांवर चढणं, पाण्यात उतरण, धबधब्यांमध्ये जाणं, यामुळेच दुर्घटना घडत आहेत. मुळात याबाबत अनेक जण जनजागृती करत असतानाही सह्याद्रीमध्ये अपघात थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

मुळात अशा गोष्टींना आपणसुद्धा कारणीभूत आहोत. निसर्ग हा फिजिक्सच्या नियमांनी चालतो, आपल्या भावनांना तो किंमत देत नाही. भीती वाटणं हे आपलं जीव वाचवणारं नैसर्गिक डीफेन्स तंत्र आहे. मुळात भीती वाटणं यात कोणतीही शरमेची बाब नाही. निसर्गाच्या बाबतीत डर के आगे जीत नसते तर मृत्यू असतो. त्यामुळे आपण निसर्गाचा आदर करून लोकांना याबाबत चार गोष्टी सांगाव्यात. यासोबतच प्रशासनाने आतातरी काही पाऊल उचललं नाही, तर आगामी काळात महाराष्ट्रातील अशा ठिकाणी जाण्यास पूर्णपणे बंदीच येईल, एवढं नक्की ! (Sahyadri Accidents)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.