Home » अमेरिकेवर मात करण्यासाठी चीनची पूर्वतयारी; कंबोडिया देशात उभा राहतोय नौसेनेचा तळ… 

अमेरिकेवर मात करण्यासाठी चीनची पूर्वतयारी; कंबोडिया देशात उभा राहतोय नौसेनेचा तळ… 

by Team Gajawaja
0 comment
Ream Naval Base
Share

हळूहळू चीन सगळ्या जगाची डोकेदुखी बनत चालला आहे. कोरोना देखील सध्याच्या आधुनिक जगाला चीनची दिलेली देणगी, पण चीन हे मान्य करत नाही. चीन इतर देशांना कर्ज देतो हे जरी खरं असलं तरीसुद्धा त्याची वसुलीसुद्धा व्यवस्थित करून घेतो. पण काही वेळा तर ज्या देशांना मदत करायची त्या देशांना वाऱ्यावर सोडून देतो. याचं चांगलं आणि ताजं उदाहरण म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंकेची आर्थिक अवस्था! 

या दोन्हीही देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे आणि दोन्ही देशांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्याबद्दल रोज बातम्या येत आहेत. दोन्हीही देशांमध्ये सरकारला देशातील जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. लोक सरकारविरुद्ध निदर्शन करत आहेत आणि मोर्चे काढत आहेत. हे झालं आर्थिक घटकांच्या बाबतीत. चीन जगात स्वतःचा दबदबा वाढावा आणि अमेरिकेची जागा आपण घ्यावी याबद्दल स्वप्न पाहत आहे. ज्यात काही गैर नाही. 

अमेरिकेप्रमाणे जगामध्ये आपले परकीय जमिनीवर तळ उभे करावे अशी चीनची सुप्त इछा आहे. दक्षिण चीनी समुद्रात आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये अमेरिकेला शह देण्यासाठी म्हणून चीन पावलं उचलत आहे. त्यासाठी चीनने कंबोडियाला हाताशी धरलं आहे आणि चीन तीथे आपल्या नौसेनेचा तळ उभं करत आहे.     

एकविसावं शतक हे आशियाचं असेल, असा दावा नेहमी केला जातो. म्हणजे आशिया खंडातले देश जगाचं नेतृत्व करतील हे सांगण्याचा त्यामागचा उद्देश. अर्थात आशियातले देश म्हणजे चीन आणि भारत हे तर प्रादेशिक सत्ता म्हणून उदयाला येत आहेत. विसाव्या शतकापर्यंत रणभूमीवर समोरा समोर येऊन युद्ध खेळली जात. पण आता आर्थिक ताकद ज्या देशाकडे आहे तो देश महासत्ता बनेल, हे उघडउघड दिसतंय. 

चीनरूपी महाकाय ड्रॅगन आपल्या अर्थव्यवस्थेच्या जोरावर स्वतःची सैनिकी शक्ती वाढवत आहे. म्हणजे अगदी कालपर्यंत ज्या देशाची सैनिकी क्षमता मोठी आणि आर्थिक स्थिति दुय्यम तो देश महासत्ता म्हणण्यास पात्र होता. आज परिस्थिति  बदलली आहे आणि ज्या देशाची आर्थिक स्थिती उत्तम आणि सैनिकी क्षमता जरी अफाट नसली तरीसुद्धा तो देश महासत्ता बनू शकतो. म्हणून एक गोष्ट नमूद करायची म्हणजे वर दिलेल्या पहिल्या कॅटॅगरीतला देश म्हणजे अमेरिका, तर दुसऱ्या कॅटॅगरीतला देश हा जगातला ताकदवान देश, म्हणजे चीनचं नाव आपण या प्रसंगी घेऊ शकतो. 

प्लॅनेट लॅब पिबीएस यांच्या आणि अमेरिकी सरकारने सॅटेलाइटने घेतलेल्या फोटोमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, चीन थायलंडच्या आखातात, कंबोडियाच्या दक्षिण प्रांत असलेल्या ठिकाणी म्हणजे ‘रिम’ (Ream) मध्ये एक नौसेनेचा एक गुप्त तळ उभारतो आहे. पण याबद्दल कंबोडिया सरकारला आणि अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं त्यावेळेस या संबंधित लष्करी अधिकाऱ्यांनी असं काहीही नसल्याचा दावा केला आहे. तसंच हे सुद्धा सांगितलं की, हा कुठलाही तळ नसून इथे फक्त बंदराच्या विस्ताराचं काम चालू आहे. (Ream Naval Base)

====

हे देखील वाचा – अमेरिकेच्या ‘या’ शहरात अनेकदा पडतो माशांचा पाऊस, जाणून घ्या विचित्र कारण

====

वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार कंबोडियाचा रिम तळ हा केवळ आणि केवळ चीनच्या नौसेनेकरीताचा तळ आहे, असं सांगितलं आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्यानुसार रिमचा नौसेना तळ हा तीस वर्षाकरीता कंबोडियाने चीनला वापरायला दिला आहे. अशाप्रकारचा एक गुप्त करार कंबोडिया आणि चीन यांच्यामध्ये झाला आहे. (Ream Naval Base)

अमेरिकेचं पॅसिफिक आरमार अति पूर्वेकडच्या देशांबरोबर एका दशकापूर्वीपर्यंत नियमितपणे नौदल सराव करायचा. अमेरिकेने तर रिम तळावर कंबोडिया आणि अमेरिकेचा जॉइंट बेस बनवला होता. या गोष्टीला एक दशक झालं. अमेरिकेने वेळोवेळी कंबोडियन सरकारला या तळाच्या देखभालीसाठी आम्ही उत्सुक आहोत असं सांगितलं. यासंदर्भात कुठल्याही प्रस्तावाला कंबोडियन सरकारने उत्तर दिलं नाही. उलट अमेरिकेने अर्थसहाय्य दिलेल्या रिमवरच्या बिल्डिंग्स जमीनदोस्त केल्या.

जर या तळावरचं काम पूर्ण झालं, तर दक्षिण चीनी समुद्रात आणि प्रशांत महासागरात चीनला लक्ष्य ठेवण्यासाठी सोपं जाईल. रिमचा तळ हा चीनचा परकीय देशातला दूसरा नौसेनेचा तळ बनू शकतो. चीनचा एकमेव परकीय जमीनिवरचा नौसेनेचा तळ हा आफ्रिकेत ‘जिबोटी’ इथे आहे. अमेरिकेसकट ऑस्ट्रेलियानेसुद्धा याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (Ream Naval Base)

अमेरिकेचा असा आरोप आहे की, चीन आणि कंबोडिया त्यांच्यापासून गोष्टी लपवत आहेत. या सगळ्या प्रसंगामुळे अमेरिका आणि कंबोडिया यांच्यामधले संबंध बिघडले आहेत. अमेरिकेने तर असे आरोप केले आहेत की, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी प्रत्यक्षपणे रिम तळावर बांधकामाचं काम करत आहे. याचा अर्थ हा की, चीन तिथे स्वतःचा सैनिकी तळ उभा करतो आहे. (Ream Naval Base)

भविष्यात अमेरिकेप्रमाणे चीन जर स्वतःचे तळ उभारणार असेल, तर ही एक चिंता वाढवणारी बातमी आहे. यावर ‘Quad’ सदस्य देश काय भूमिका घेतात हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. भारतासारखा देश चीनच्या या रिम तळाबद्दल काय भूमिका घेतो आणि काय प्रतिक्रिया देतो घेतो हे बघावं लागेल. 

– निखिल कासखेडीकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.