दुनियादारी, तू हि रे, चेकमेट, रिंगा रिंगा, डोंबिवली फास्ट अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांची नावं समोर आली की, सर्वात आधी डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे संजय जाधव!
संजय जाधव हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर म्हणून सुपरिचित आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दिगदर्शक म्हणून ते लोकप्रिय आणि यशस्वी आहेतच. शिवाय, मराठी, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ते उत्तम ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून प्रसिद्ध आहेत.
‘सावरखेड – एक गाव’ या २००४ साली आलेल्या रहस्यमय मराठी चित्रपटापासून संजय जाधव यांचा ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून प्रवास सुरु झाला. तर, त्यांनतर २००८ सालच्या ‘चेकमेट’ या रहस्यमय चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम सुरु केले. वेगळ्या वळणावरच्या उत्तोमोत्तम मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन आणि एकापेक्षा एक सरस चित्रपटांच्या छायांकनाची जबाबदारी निभावल्यानंतर संजय जाधव आता पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटाचे छायांकन करणार आहेत.
अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ या चित्रपटाचे छायांकन संजय जाधव करत आहेत. काही दिवसांपूर्वीच कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. ‘रावरंभा’ या चित्रपटाची निर्मिती शशिकांत शीला भाऊसाहेब पवार करत आहेत, तर बेभान, झाला बोभाटा, भिरकीट अशा दर्जेदार मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक अनुप अशोक जगदाळे हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.
‘रावरंभा’ या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी या चित्रपटाचे लेखन केलं आहे. ‘रावरंभा’ हा चित्रपट जरी ऐतिहासिक चित्रपट असला तरी त्यामध्ये दाखवण्यात येणार आहे, सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांमधील एक अनोखी प्रेमकहाणी!
ही प्रेमकहाणी ‘रावरंभा’ या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. त्यामुळे इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली ही प्रेमकहाणी पाहणं प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव असू शकेल. या चित्रपटाचे चित्रीकरण निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात होणार आहे.
हे ही वाचा: डोकं चक्रावून टाकणारे जगातील ५ विरोधाभास! बघा तुम्हाला काही सुचतंय का?
कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारी हस्तक्षेप आणि पेंग ताखॉन (Paing Takhon)
संजय जाधव हे प्रयोगशील सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यामुळे आता ‘रावरंभा’ या सह्याद्रीच्या कुशीतल्या ऐतिहासिक प्रेमकहाणीचे छायांकन करताना ते नक्कीच काहीतरी वेगळा प्रयोग करणार. या चित्रपटामधून त्यांच्या प्रयोगशीलतेचा प्रत्यय प्रेक्षकांना येणार यात काही शंकाच नाही. ऐतिहासिक प्रेमकहाणी असा वेगळ्या वळणावरच विषय एका अनुभवी आणि समर्थ सिनेमॅटोग्राफरच्या दृष्टिकोनातून चित्रीत होत आहे. त्यामुळे ‘रावरंभा’ हा चित्रपट त्यांच्या इतर चित्रपटांसारखाच हिट चित्रपटांच्या रांगेत जाऊन बसू शकतो.